आज अखंड ‘श्रीराम जय राम जय जय राम’ जपाचे आयोजन !
मिरज – समर्थभक्त गाडगीळ मित्र परिवार, काशीविश्वेश्वर ट्रस्ट यांच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने काशी विश्वेश्वर देवालय येथे कीर्तन महोत्सव, तसेच विविध कार्यक्रम होत आहेत. ४ मार्चपासून चालू झालेले हे कार्यक्रम ८ मार्चपर्यंत काशी विश्वेश्वर मंदिराच्या पटांगणात होत आहेत. ७ मार्च या दिवशी पहाटे ५ ते सायंकाळी ६ या वेळेत सज्जनगड येथील समर्थ सेवामंडळ आणि मिरज येथील दासबोध अभ्यास मंडळ यांच्या पुढाकाराने अखंड ‘श्रीराम जय राम जय जय राम’ जपाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजक श्री. माधवराव गाडगीळ यांनी दिली.
१. ‘समर्थभक्त गाडगीळ मित्र परिवारा’च्या वतीने प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीनिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा महोत्सवाचे २२ वे वर्ष आहे. आजवर अनेक प्रसिद्ध कीर्तनकारांनी त्यांच्या सुश्राव्य कीर्तनाची सेवा शंभू महादेवाच्या चरणी अर्पण केली आहे. ७ आणि ८ मार्चला रात्री ७ वाजता बीड येथील ह.भ.प. भालचंद्रबुवा देव यांचे कीर्तन होत आहे.
२. ८ मार्च या दिवशी पहाटे ५ वाजता उद्योजक श्री. किशोर पटवर्धन यांच्या हस्ते लघुरुद्राभिषेक होणार आहे. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत विनामूल्य आरोग्य पडताळणी शिबिर होत असून यात नामांकित आधुनिक वैद्य त्यांची सेवा देणार आहेत. तरी आरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.