Goa Drugs Racket : गोव्यातील कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून भाग्यनगर येथे अमली पदार्थ पुरवल्याचे उघड !

भाग्यनगर येथे हॉटेलमध्ये अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई केल्याचे प्रकरण

भाग्यनगर, ५ मार्च : भाग्यनगर येथील ‘रेडिसन ब्ल्यू’ हॉटेल येथे सायबराबाद पोलिसांनी २५ आणि २६ फेब्रुवारी या दिवशी धाड टाकून अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई केली होती. या प्रकरणी अन्वेषण करतांना सायबराबाद पोलिसांना गोव्यातील कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून अमली पदार्थांचा पुरवठा केला गेल्याचे उघडकीस आले आहे. सायबराबाद पोलिसांनी या प्रकरणी हॉटेलचा वापर अमली पदार्थ व्यवसायासाठी केल्याने हॉटेलच्या व्यवस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

अन्वेषणासंबंधी नवीन माहिती देतांना भाग्यनगरमधील मधापूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विनिथ जी. म्हणाले,

‘‘रेडिसन ब्ल्यू’ हॉटेलमध्ये चाललेल्या पार्टीमध्ये अमली पदार्थांचा पुरवठा मिरझा वहीद बेग यांनी केला होता आणि मिरझा वहीद बेग याला अमली पदार्थांचा पुरवठा गोव्यातील कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील बंदीवान फैसल याच्याकडून झाला. सायबराबाद पोलीस तेलंगाणा अमली पदार्थविरोधी पथकाच्या साहाय्याने फैसल याला अन्वेषणासाठी कह्यात घेणार आहे.’’ (गुन्हेगारीत बहुसंख्य असलेले अल्पसंख्यांक ! – संपादक)

सायबराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ‘रेडिसन ब्ल्यू’ हॉटेलमध्ये भाजपचे नेते गज्जाला योगानंद यांचा पुत्र गज्जाला विवेकानंद यांच्या सांगण्यावरून सय्यद अब्बास अली जेफ्फरी यांनी पार्टीचे आयोजन केले होते. यामध्ये चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आदी सहभागी झाले होते.

संपादकीय भूमिका

  • हे कोलवाळ कारागृह प्रशासनाला लज्जास्पद !
  • कोलवाळ कारागृह हा अमली पदार्थांचा अड्डा बनला आहे कि कारखाना ?
  • शासनाने याची त्वरित नोंद घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !