सेवा करत असतांना प्रत्येक क्षणी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची कृपा अनुभवणार्‍या अहिल्यानगर येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शैलजा केदारी (वय ६० वर्षे) !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणे

सौ. शैलजा केदारी

‘गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), तुम्ही मला ‘सनातन संस्थे’त आणून माझ्यावर कृपा केलीत’, त्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करत आहे. हे गुरुमाऊली, तुम्ही मला वेगवेगळ्या सेवा दिल्यात आणि मला सतत शिकण्याच्या स्थितीत ठेवलेत. त्या सेवांच्या माध्यमातून तुम्ही माझ्याकडून साधना करून घेतलीत. सेवा करत असतांना ‘तुम्हीच मला सहसाधकांच्या माध्यमातून शिकवत आहात’, याची जाणीव मला सतत होत होती. अहवाल बनवण्याची सेवा करतांना ‘माझ्यामुळे इतरांना त्रास होऊ नये’, असाच माझा भाव असायचा. माझ्याकडून सेवा करतांना प्रार्थना आणि कृतज्ञता होत नसत; पण ‘सेवा परिपूर्ण आणि वेळेत कशी होईल ?’, यासाठी प्रयत्न असायचे.

२. रस्त्यावर अनेकदा पडूनही तिला गुरुदेवांनी सांभाळल्यामुळे साधिकेची सेवा अखंडपणे होणे

मी सेवेला बर्‍याच वेळा एकटीच जात असे. मी सेवेला रस्त्यावरून जातांना-येतांना बर्‍याचदा भर चौकात पडायचे; पण त्या क्षणी तुम्ही (गुरुमाऊली) मला उठवून पुढे सेवेला घेऊन जात असत. त्यामुळे माझ्या सेवेत कधी खंड पडला नाही. ही तुमची कृपा मी प्रत्येक वेळी अनुभवत असे. त्यामुळे माझी श्रद्धा आणि भक्ती वाढत गेली.

३. ‘गुरुदेवांनी प्रत्येक गोष्ट वेळेतच करायला हवी’, याची जाणीव करून देऊन व्यष्टी साधनेमध्ये सातत्य निर्माण करणे

गुरुपौर्णिमेसाठी विज्ञापन घेण्याच्या सेवेला उन्हात बाहेर पडावे लागायचे; पण त्या वेळी बसथांब्यापर्यंत जातांना आपल्या कृपेने ऊन जाणवायचे नाही. विज्ञापनदात्यांकडे गेल्यावर तेही आस्थेने बोलत असत. त्या वेळी ‘त्यांच्या माध्यमातून तुम्हीच बोलत आहात’, असे मला जाणवायचे. बाहेर प्रसार करतांना जिज्ञासूंचे प्रेमही तुम्ही अनुभवायला दिले. सभोवतालच्या सृष्टीचे अवलोकन करतांना ‘जसे सृष्टीतील प्रत्येकाचे कार्य ठरलेल्या वेळीच होत असते, उदा. सूर्य प्रतिदिन वेळेवरच उगवतो, तसे आपणही ‘प्रत्येक गोष्ट वेळेतच करायला हवी’, याची जाणीव करून दिली. माझ्या व्यष्टी साधनेत सातत्य निर्माण केले. यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

४. गुरुमाऊलींनी सहसाधिकेच्या माध्यमातून घडवणे

त्यानंतर साधिका कु. श्वेता पट्टणशेट्टी (आताच्या सौ. श्वेता देशपांडे) माझ्या जीवनात आली. कु. श्वेताच्या (सौ. श्वेता यांच्या) माध्यमातून तुम्हीच मला मार्गदर्शन केले आणि माझ्या मनात येणारे अयोग्य विचार अन् अयोग्य दृष्टीकोन दूर केलेत. ‘योग्य विचार कसा करायचा आणि योग्य दृष्टीकोन कसे असले पाहिजेत ?’, हे कु. श्वेताताईने मला शिकवले. ‘तुम्हीच तिच्या माध्यमातून हे करून घेतले आणि मला घडवले.

५. गुरुदेवांचे अस्तित्व सर्वत्र अनुभवता येणे

‘तुमची माझ्यावर कृपा होती; म्हणूनच तुम्ही माझी प्रगती केलीत. माझ्यात अनंत स्वभावदोष असतांनाही तुम्ही मला जवळ केले’, यासाठी पुन्हा एकदा कृतज्ञता ! हळूहळू सर्व ठिकाणी मला तुमचे अस्तित्व अनुभवता येऊ लागले. अशा प्रकारे ‘तुम्ही माझ्या समवेत सतत आहात, माझी काळजी घेत आहात, माझी साधना आणि सेवापण तुम्हीच करून घेत आहात’, हे माझ्या लक्षात येऊ लागले आहे. या सर्व प्रसंगांतून ‘माझ्यापेक्षा माझी सेवा आणि साधना यांची काळजी तुम्हालाच अधिक होती’, हे माझ्या लक्षात आले.

६. साधिकेचा गुरुदेवांप्रती असलेला भाव

मी २ वेळा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. तेव्हा मला वाटले, ‘आश्रम पहाणे म्हणजेच गुरुदेवांचे अस्तित्व आणि गुरुदेवांचे दर्शन.’ या आश्रमात गुरुदेवांचे वास्तव्य आहे. आश्रमातील प्रत्येक ठिकाणी गुरुदेवांची दृष्टी पडलेली आहे. त्यांचा स्पर्श झाला आहे. त्यातच आपण आपल्या गुरुदेवांना अनुभवूया. काही वर्षांपूर्वी गुरुदेवांनी सांगितले होते, ‘‘माझ्या देहात तुम्ही अडकू नका.’’ त्यामुळे गुरुदेवांना सूक्ष्मातून अनुभवण्यासाठी त्यांनीच माझ्याकडून प्रयत्न करून घेतले. माझी साधनेत प्रगती होत गेली, तसे माझ्या लक्षात येत गेले. या पद्धतीने गुरुदेव मला एक एक टप्पा पुढे घेऊन जात होते.

७. आध्यात्मिक उन्नती झाल्यावर साधिकेमध्ये व्यापकता वाढणे

माझी आध्यात्मिक पातळी वाढल्यावर ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे, तर आपल्याला चराचरात गुरुदेवांना अनुभवता यायला पाहिजे’, असा विचार येऊ लागला. गुरुदेवांना केवळ भारतातीलच नाही, तर संपूर्ण विश्वातील साधक आपले वाटतात, त्याप्रमाणे आपल्यालासुद्धा सर्व साधक आपले वाटले पाहिजेत. ‘जसे गुरुदेव सर्वांवर प्रीती करतात, तशी प्रीती आपल्यालाही निर्माण करायची आहे’, असे विचार माझ्या मनात येतात.

८. साधिकेची प्रगती झाल्यावर कुटुंबियांना आनंद होणे

गुरुदेवांच्या कृपेने माझी आई, बहीण, भाऊ आणि दोन्ही मुली सत्संगाला जोडल्या गेल्या आहेत. त्यांचीसुद्धा साधना चालू आहे. माझी आई ८४ वर्षांची आहे. तीसुद्धा सर्व विचारूनच करते. जेव्हा माझी आध्यात्मिक प्रगती झाली, तेव्हा सर्वांना पुष्कळ आनंद झाला.

९. प्रार्थना

‘गुरुदेव, मी एक धुळीचा छोटासा कण आहे. तुमच्या चरणांखाली येऊन पडून रहाते. त्यामुळे तुमचे चरण सतत त्या कणावर पडून माझ्यातील स्वभावदोष आणि दुर्गुण गळून पडावेत’, असे मला वाटते. गुरुदेव, मला सतत आपल्या चरणांशी ठेवा. शेवटच्या श्वासापर्यंत या जिवाकडून सतत साधना करून घ्या. ‘सर्व साधकांमधील गुण पाहून ते माझ्यामध्ये कसे येतील ?’, यासाठी प्रयत्न करून घ्या’, हीच आपल्या पावन चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. शैलजा अशोक केदारी (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६० वर्षे), अहिल्यानगर, महाराष्ट्र. (२१.११.२०२२)