पुण्यातील वेताळ टेकडीवर नशेत गुंग असणार्या तरुणींचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर नुकताच प्रसारित झाला आहे. या ‘व्हिडिओ’मध्ये एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत, तर दुसरी मुलगी अमली पदार्थाचे सेवन केल्यामुळे नशेत बडबड करतांना दिसत होती. या कोवळ्या वयाच्या मुलींच्या आयुष्यालाही खरे तर आरंभ झालेला नसतांना अशा प्रकारे नशेच्या धुंदीत त्या दिसणे याला काय म्हणावे ? मनुष्याला सन्मार्गापासून परावृत्त करते ती धुंदी ! योग्य काय ? अयोग्य काय ? याचा पूर्णत: विसर धुंदी चढलेल्या मनुष्याला पडतो. कुणाला पैशाची धुंदी, कुणाला श्रीमंतीचा गर्व, कुणाला सतत मिळणार्या यशाची धुंदी, राजकारण्यांना त्यांच्या पदाची किंवा अधिकाराची धुंदी, भ्रमणभाषवर सामाजिक माध्यमे हाताळण्याची धुंदी, पाश्चात्त्य जीवनप्रणालीची धुंदी, तरुण पिढीला अमली पदार्थांच्या सेवनाची धुंदी… एकूणच काय तर सांप्रतकाळी प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या नशेच्या, धुंदीच्या आहारी गेलेला दिसतो. सुग्रीवाचा बंधू वाली याला त्याच्या राजकीय आणि शारीरिक सामर्थ्याची धुंदी चढली होती. त्यामुळेच तो स्वत:च्या अंतास कारणीभूत ठरला. रावणालाही महादेवांकडून मिळालेल्या वरदानाची धुंदी चढली होती. त्यामुळेच अहंकारापोटी आपण जगन्नियंत्याशी वैर धरले आहे, हे त्याला उमगले नाही आणि अंततः प्रभु श्रीरामचंद्रांकडून त्याचा अंत झाला. दुर्योधनाला राजसिंहासनावर बसण्याची धुंदी होती, त्यामुळेच महाभारत झाले आणि कौरवांचा नाश झाला.
आजही आपली नशा भागवण्यासाठी मनुष्य कोणत्याही थराला जाऊन गुन्हेगारी किंवा कुवर्तनाकडे वळतांना दिसतो. यातूनच पुढे चोरी, लुटमार, महिलांचे दागिने ओढणे, बलात्कार, मारामार्या, हत्या या प्रकारची दुष्प्रवृत्ती वाढलेली आहे. मद्यामधील अल्कोहोल रक्तातून मेंदूपर्यंत पोचून मेंदूच्या कामात अडथळा आणते, माणसाच्या स्नायूंवरचा ताबा न्यून होणे आणि त्यामुळे अडखळत बोलणे, विचित्र हालचाली, भावनांची अतिशयोक्ती असे विविध परिणाम होतात. त्याचप्रमाणे मनावर चढलेली धुंदी मनुष्याची सारासार विवेकबुद्धी नष्ट करते. त्यामुळे मद, मोह, मत्सर, दंभ यांचा मानवी मनावरील प्रभाव वाढून व्यक्तीकडून विपरित वर्तन घडते. या दोन्ही प्रकारच्या धुंदी चढू द्यायच्या नसतील, तर मनुष्याने अध्यात्माची कास धरणे अत्यंत आवश्यक आहे. सुदृढ कुटुंबव्यवस्था आणि प्रत्येक प्रसंगी योग्य दिशादर्शन करू शकेल, अशी आध्यात्मिक परंपरा आम्हा भारतियांना लाभलेली आहे. धुंदी उतरवणारे आणि सन्मार्ग दाखवणारे अध्यात्म, तसेच प्रार्थनेची खरी शक्ती यांचे महत्त्व समाजमनावर नव्याने रुजवणे आवश्यक आहे, तरच आयुष्याचा खरा आनंद कशात आहे ? हे कळू शकेल !
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.