सांगली – अलीकडे विद्यार्थी ‘मोबाईल’मध्ये (‘भ्रमणभाष’मध्ये) पुष्कळ गुंतली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ‘मोबाईल’ऐवजी मैदान जवळ केल्यास त्यांच्या आरोग्यासाठी ते अधिक चांगले होईल, असे प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. ते विश्रामबाग येथील शासनाच्या महासंस्कृती महोत्सवातर्गंत ‘हॅप्पी स्ट्रीट’ या कार्यक्रमात बोलत होते.
या ‘हॅप्पी स्ट्रीट’ उपक्रमामध्ये बालकांसमवेत पालकही त्यांचे वय विसरून सहभागी झाले होते. काचेच्या गोट्या, लगोर, घोडेस्वारी, योगासने, लेझीम, झांज, युद्धकलेची प्रात्यक्षिके, गायन, मिमिक्री त्याचसमवेत उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्तपणे कोणताही कलाप्रकार सादर करावा, याची मुभा या वेळी देण्यात आली होती. त्यालाही नागरिकांनी गायन आणि नृत्याच्या रूपाने प्रतिसाद दिला.