|
न्यूयॉर्क (अमेरिका) – जागतिक स्तरावर प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असूनही वर्ष २०२३ च्या चौथ्या तिमाहीत भारताचे वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन, म्हणजेच जीडीपी मात्र अपेक्षित ६.८ टक्क्यांपेक्षा पुष्कळ अधिक राहिले. त्याने ८.४ टक्क्यांचा टप्पा गाठला, अशी माहिती अमेरिकेतील आर्थिक विषयांवर अभ्यास करणारे प्रसिद्ध आस्थापन ‘मूडीज’ने दिली. यामुळे वर्ष २०२३ चा एकूण जीडीपी ७.७ टक्के राहिला. यामुळेच वर्ष २०२४ मधील अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अनुमान हा आधी वर्तवलेल्या ६.१ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांवर गेला असल्याचे ‘मूडीज’ने सांगितले.
‘मूडीज’ने म्हटले की,
१. जागतिक आव्हाने अल्प झाल्याचा लाभ भारतीय अर्थव्यवस्थेला झाल्याने भारत वर्ष २०२४ मध्ये ६-७ टक्के वास्तविक जीडीपी सहज नोंदवू शकेल.
२. ‘जी-२० अर्थव्यवस्थां’मध्ये, म्हणजे जगातील सर्वांत श्रीमंत २० देशांमध्ये वर्ष २०२४ मध्येही भारत सर्वांत वेगाने वाढणारा देश रहाण्याचा अनुमान आहे.
३. वर्ष २०२५ साठी जीडीपी वाढीचा अंदाज ६.४ टक्के असेल.
४. सशक्त वस्तू आणि सेवा कर (जी.एस्.टी.) संकलन, वाहनांच्या विक्रीतील वाढ, ग्राहकांची सकारात्मक भावना आदी सूत्रे सूचित करतात की, शहरी उपभोगाची मागणी ही कोणत्याही संकटाला समर्थपणे तोंड देऊ शकते.