सध्याच्या तरुणवर्गामध्ये घरच्या अन्नापेक्षा ‘जंक फूड’ची सवय अधिक दिसून येते. जिभेचे चोचले पुरवणारे हे पदार्थ महाग असले, तरी यांच्या जिभेवर तरळणार्या चवीमुळे आणि विज्ञापनांमुळे तरुणवर्ग या पदार्थांकडे मोठ्या प्रमाणात आकर्षिला जातो. मुंबई ठाण्यासह राज्यातील विविध शहरांमध्ये आणि नगरांमध्ये नाक्या नाक्यावर ‘मॅकडोनाल्ड’, ‘बर्गर किंग’, ‘के.एफ्.सी.’, ‘डोमिनोझ’, ‘पिझ्झा हट’ यांची वातानुकूलित दुकाने उभी राहिली आहेत. युवा आणि शाळेतील मुले येथे कायम गर्दी करतात. शाळेत घरचे अन्न, पालेभाज्या, कडधान्ये, फळे खाण्याचे महत्त्व सांगितले जाते. पालक सभांमधूनसुद्धा शिक्षक मुलांना घरगुती आहार देण्याचा सल्ला देतात; मात्र दुसरीकडे ‘जंक फूड’ची आवड काही न्यून होत नाही. कित्येकदा पालकच डबा बनवून देण्याचा कंटाळा करतात, काही वेळा नोकरीमुळेही त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे शाळांनी मुलांच्या डब्यात ‘जंक फूड’ आणण्यावर बंदी घातली आहे. असे असले, तरी शाळकरी मुले नाक्यावर जाऊन हे पदार्थ प्रतिदिन खात असतात.
‘मॅकडोनाल्ड’सारख्या नामांकित आस्थापनाकडून त्यांच्या दुकानांत ग्राहकांकडून अधिक पैसे घेऊन पदार्थामध्ये निकृष्ट दर्जाचे घटक वापरले जात असल्याचे महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाने नुकतेच उघड केले. नगर-पुणे मार्गावरील केडगाव येथील मॅकडोनाल्डच्या दुकानात बनावट चीज वापरले जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी तेथील पदार्थांचे नमुने चाचणीसाठी शासनाधीन केले, तसेच मुंबईतील १३ दुकानांमधील अन्नपदार्थही विभागाने चाचणीसाठी पाठवले. या १३ ही दुकानांमधील खाद्यपदार्थांमध्ये निकृष्ट दर्जाचे घटक वापरले गेल्याचे तपासाअंती सिद्ध झाले. चीजऐवजी पदार्थांमध्ये वनस्पती तेलाचा (डालडा) वापर करण्यात येत होता. पदार्थांमध्ये पनीरऐवजी ‘पनीर ऍनालॉग’चा वापर केला जात होता. चीजयुक्त पदार्थ देण्याच्या नावांवर ग्राहकांची खुलेआम फसवणूक केली जात होती. शहरी भागात मोक्याच्या ठिकाणी उभारल्या जात असलेल्या मॅकडोनाल्डच्या दुकानांमध्ये प्रतिदिन सहस्रो ग्राहक येतात. गेल्या कित्येक दिवसांपासून मॅकडोनाल्ड चीजच्या नावाखाली ग्राहकांना वनस्पती तेल देऊन ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत होते आणि त्याचा गल्ला भरत होते. अन्न आणि औषध प्रशासनाने मॅकडोनाल्डला केवळ समज दिली आहे. ‘चीज’ नावाचा उल्लेख असलेल्या पदार्थांची नावे तत्परतेने पालटण्याची सूचना दिली आहे. खरे तर ही पळवाट आहे. ‘अन्नामध्ये भेसळ करणे’ हा गंभीर गुन्हा असल्याने त्यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या अंतर्गत फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी होत आहे. सरकार याचा गांभीर्याने विचार करील, अशी आशा आहे.
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.