हैदर शेखने अमली पदार्थ विक्रीतील पैसे ‘हवाला’द्वारे देहलीला पाठवले ! – पुणे पोलीस

पुणे येथे अमली पदार्थ सापडल्याचे प्रकरण !

अमली पदार्थ जप्तीची कारवाई करतांना पुणे पोलीस ( सौजन्य : etvbharat.com)

पुणे – ‘मॅफेड्रोन’ या अमली पदार्थ विक्री करणार्‍या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या हैदर शेख याने पुणे, राज्यांतील विविध शहरांत, तसेच देहलीमध्ये ‘मॅफेड्रोन’ विक्रीस पाठवल्याचे अन्वेषणामध्ये निष्पन्न झाले आहे. तसेच या विक्रीतून मिळालेले पैसे हवालाद्वारे देहलीला पाठवण्यात आल्याची माहिती हैदर याने दिली असल्याचे पुणे पोलिसांनी २ मार्च या दिवशी न्यायालयामध्ये सांगितली. ही माहिती गुन्हे शाखेच्या ‘युनिट १’चे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली.

पुणे पोलिसांनी आतापर्यंत ३ सहस्र ६७५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. हैदर याने अमली पदार्थ विक्रीतून मिळालेले पैसे देहलीतील वीरेन सिंग, संदीप धुनिया यांना हवालाद्वारे पाठवण्यात आल्याचा संशय आहे. तसेच या पैशांतून आरोपींनी मालमत्ता खरेदी केली का ? ‘मॅफेड्रोन’ सिद्ध करण्यासाठी त्यांना कुणी साहाय्य केले ? कच्चा माल (रासायनिक पदार्थ) कोठून आणले ? याचे अन्वेषण चालू आहे. त्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

३४० किलो कच्चा माल जप्त !

‘मॅफेड्रोन’ या अमली पदार्थ निर्मितीसाठी लागणारा ३४० किलो कच्चा माल गुन्हे शाखेच्या पथकाने २ मार्च या दिवशी विश्रांतवाडी येथून जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या कच्च्या मालामध्ये रासायनिक पदार्थांचा समावेश आहे. हा माल एका टेंपोमध्ये लपवून ठेवण्यात आला होता.