चुकीची प्रश्‍नपत्रिका दिल्याने विद्यार्थ्यांना साडे चार घंटे थांबावे लागले !

मुंबई विद्यापिठाच्या एम्.ए.च्या परीक्षेतील गलथान प्रकार !

मुंबई – मुंबई विद्यापिठाच्या पदव्युत्तर द्वितीय वर्ष एम्.ए.च्या तृतीय सत्राच्या परीक्षेत चुकीचे प्रश्‍न आल्याने विद्यार्थी संतप्त झाले होते. १ मार्च या दिवशी ‘भारताचे परराष्ट्र धोरण’ या विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत ‘भारताचे शेजारील राष्ट्रांशी धोरण’ या विषयाचे प्रश्‍न विचारण्यात आले होते. प्रत्यक्षात ‘भारताचे शेजारील राष्ट्रांशी धोरण’ या विषयाची परीक्षा २६ फेब्रुवारीला झाली होती. १ मार्च या दिवशी दुपारी २.३० ते सायंकाळी ५ पर्यंत परीक्षा होती; पण विद्यापिठाच्या चुकीमुळे दुपारी ४.३० वाजता विद्यार्थ्यांना सुधारित प्रश्‍नपत्रिका विद्यापिठाने दिली. सायंकाळी ७ पर्यंत परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना साडेचार घंटे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात थांबावे लागले.

सर्व अधिकारी आणि शिक्षक झोपेत प्रश्‍नपत्रिका बनवतात का ? – सुधाकर तांबोळी, मनसे

विद्यार्थी परिश्रम घेऊन अभ्यास करतात; पण सर्व अधिकारी आणि शिक्षक झोपेत प्रश्‍नपत्रिका बनवतात का ? कुलगुरूंनी परीक्षेच्या कामकाजात गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे.

संपादकीय भूमिका

४ दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षेतील प्रश्‍न पुन्हा नवीन प्रश्‍नपत्रिकेत कसे काय येतात ? शैक्षणिक क्षेत्रात असा हलगर्जीपणा करणार्‍यांना कठोर शिक्षाच करायला हवी !