Russia Chinese Invasion : चीनला रशियाच्या पूर्व भागातील क्षेत्र करायचे आहे गिळंकृत !

  • रशियाच्या सैन्याच्या कागदपत्रांतून माहिती उघड

  • पूर्व भागातील तेल आणि वायू यांच्या मोठ्या साठ्यावर चीनचा डोळा !

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन व चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग

मॉस्को (रशिया) – रशियाच्या सैन्याची वर्ष २००८ ते २०१४ मधील युद्धाच्या संदर्भातील काही कागदपत्रे उघड झाली आहेत. यांद्वारे रशिया आणि चीन या दोन्ही देशांमधील अविश्‍वास समोर आला झाला आहे. रशियाकडे जरी सहस्रो अणूबाँब असले, तरी ‘चीन आक्रमण करून आमच्या पूर्व प्रदेशावर नियंत्रण मिळवू शकतो’, अशी भीती रशियाला वाटत आहे. चीनचा हा उद्देश रशियाला पूर्णपणे कळला आहे आणि म्हणूनच तो चीनच्या संभाव्य आक्रमणापासून बचाव करण्यासाठी युद्धनीती बनवत आहे. ‘फायनान्शिअल टाइम्स’ने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. रशियाचा हा भागात तेल आणि वायू यांचे साठे आहेत. यामुळे त्यावर चीनचा डोळा आहे.

१. या वृत्तानुसार काही कागदपत्रांवरून समोर आले आहे की, चीन कझाकिस्तानच्या माध्यमातून रशियाच्या सायबेरिया आणि युराल प्रदेशांवरही आक्रमण करू शकतो.

२. रशियाच्या सैन्याला चीनवर संशय आहे. युक्रेन युद्ध चालू झाले नव्हते, तेव्हा ही कागदपत्रे लिहिली गेली असली, तरी दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये बरेच पालट झाले आहेत.

३. रशियाच्या सैन्य कागदपत्रांत असे म्हटले आहे की, युद्ध झाल्यास चीन त्याच्या सीमेला लागून असलेल्या रशियाच्या पूर्व भागात स्थानिकांकडून निदर्शने घडवून आणू शकतो. यानंतर चीन गुप्तपणे रशियाच्या सीमेत तोडफोड करणार्‍यांना पाठवेल आणि रशियाच्या सैन्य तळांवर गुप्तपणे आक्रमण केले जाईल. यामुळे दोघांमधील तणाव शिगेला पोचेल, तेव्हा चीन सीमेवर त्याचे सैन्य तैनात करील आणि रशियावर ‘नरसंहार’ केल्याचा आरोप करील.

चीनच्या भीतीमुळे रशियाला हवे भारताचे साहाय्य !

रशियातील तज्ञ विल्यम अल्बर्की यांचे म्हणणे आहे की, चीन आणि रशिया यांच्या सैन्यांमधील सहकार्य अजूनही छायाचित्रे काढणे आणि संचलन यांपर्यंतच मर्यादित आहे. संयुक्त कारवाई, नियोजन किंवा आक्रमणांचा सराव यांसारख्या संवेदनशील क्षेत्रात सहकार्य करणे दोन्ही देशांचे सैन्य टाळत आहेत. युक्रेनमधील युद्धामुळे एकेकाळी रशियाचा प्रभावक्षेत्र असलेल्या मध्य आशियामध्ये चीन आता त्याची पकड भक्कम करत आहे. त्याच वेळी, या क्षेत्रावर स्वतःचा प्रभाव रहावा, यासाठी रशियाकडे पुरेसे पैसे आणि साधने नाहीत. चीनचा हा धोका लक्षात घेता भारताने रशियाच्या पूर्व प्रदेशात गुंतवणूक करून विकास करावा, अशी रशियाची इच्छा आहे. सध्या भारत तेथे ‘सॅटेलाइट सिटी’ (मोठ्या शहराजवळी लहान पालिका क्षेत्राला सॅटेलाईट सिटी म्हणतात) उभारणार आहे.

संपादकीय भूमिका

चीन आणि रशिया गेल्या काही वर्षांत जगाच्या दृष्टीने एकमेकांच्या अधिक जवळ येत असले, तरी वस्तूस्थिती फार वेगळी आहे, हेच यातून लक्षात येते ! रशियालाही न सोडणार्‍या चीनची यातून पुन्हा एकदा विस्तारवादी महत्त्वाकांक्षा उघड होते. अशा घटना उघड होणे भारताच्या हिताचेच !