परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहात आहोत. २९ फेब्रुवारी या दिवशी या लेखमालेतील काही भाग पाहिला, आज पुढील भाग पाहूया.
(भाग १२)
भाग ११ वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकांना यमलोकाचे सूक्ष्म परीक्षण करण्यास सांगणे आणि त्या वेळी साधिकांना जाणवलेली सूत्रे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला वाईट शक्तींच्या त्रासाविषयी जसे नवीन नवीन ज्ञान दिले, तसे त्यांनी आम्हाला एखादी व्यक्ती मृत्यू पावली, तर ‘तिची मृत्यूनंतरची गती कशी असते ?’, याविषयीही सूक्ष्मातून जाणून घेण्यास सांगितले.
एकदा मी आणि सुश्री (कु.) कविता राठीवडेकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) फोंडा (गोवा) येथील ‘सुखसागर’ येथे सेवा करत असतांना गुरुदेवांनी आम्हाला बोलावले अन् यमलोकाचे सूक्ष्म परीक्षण करण्यास सांगितले. आम्ही दोघी देवाला प्रार्थना करून परीक्षण करण्यास बसलो. त्या वेळी पुढील सूत्रे आमच्या लक्षात आली.
अ. प्रथम आमचे डोके पुष्कळ जड झाले. आमच्या डोक्यात गरगरल्यासारखे होऊ लागले. यमलोकात मृत्यूविषयीची तमोगुणी स्पंदने असल्याने असे होत असल्याचे आमच्या लक्षात आले.
आ. काही कालावधीनंतर आम्हाला काहीतरी धुरकट दिसू लागले.
इ. तेथील वातावरणात श्वास गुदमरून टाकणारा एक प्रकारचा दाब होता. त्या वेळी आमच्या लक्षात आले की, मानवाचा श्वास थांबल्यावरच तो तेथे जातो; म्हणून असे जाणवत होते.
ई. काही वेळाने परात्पर गुरु डॉक्टर आम्ही बसलो होतो, तेथे आले आणि त्यांनी आम्हाला ‘डोळ्यांवर काळ्या कापडाची पट्टी बांधून परीक्षण करा’, असे सांगितले. डोळ्यांवर काळी पट्टी बांधल्यानंतर सर्व तमोगुणी स्पंदने या काळ्या कापडाच्या पट्टीकडे आकर्षित झाल्याने आम्हाला यमलोकातील तमोगुणी स्पंदनांशी लवकर एकरूप होता येऊ लागले.
उ. त्या वेळी सुश्री (कु.) कविता राठीवडेकर हिने तिला दिसलेल्या यमलोकाचे सुंदर पद्धतीने वर्णन केले. तिला प्रथम यमदेव दिसू लागला. काही वेळाने तिला यमदेवाच्या रेड्याचे एकच शिंग पुसटसे दिसू लागले. मलाही तेथील स्पंदने अगदी त्याच पद्धतीने अनुभवता आली.
ऊ. आम्ही फार काळ यमलोकाचे परीक्षण करू शकलो नाही; कारण आमच्या देहाला एवढा जडपणा आला होता की, आम्हाला पुष्कळ वेळ परीक्षण करणे अशक्य झाल्याने आम्ही परीक्षण थांबवले.
२. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधिकांना सप्तलोक आणि सप्तपाताळ यांचे परीक्षण करण्यास सांगणे
अशा प्रकारे गुरुदेवांनी आमच्याकडून सूक्ष्म लोक जाणण्याविषयी विविध प्रयोग करून घेतले. ते म्हणायचे, ‘‘हळूहळू आपल्याला सप्तलोक आणि सप्तपाताळ यांमध्ये असणार्या वातावरणाचे विस्ताराने वर्णन करता आले पाहिजे. मानवजात याविषयी अनभिज्ञ आहे.’’ सप्तपाताळांचे परीक्षण करतांना आम्हाला अधिक त्रास होत असे.
३. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘सूक्ष्म लोकांतील घटना, त्यांचा कार्यकारणभाव’ इत्यादींविषयीचे ज्ञान लिखाणाच्या माध्यमातून उलगडणे
परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातील जाणणार्या साधकांनी केलेल्या सूक्ष्म लोकांच्या अनेक परीक्षणांच्या लिखाणातून मानवजातीसमोर ‘त्या लोकांतील अनेक घटना, त्यांचा कार्यकारणभाव, त्यांचा वाईट शक्ती आणि दैवी शक्ती यांच्याशी असलेला संबंध’ उलगडून दाखवण्यास आरंभ केला. यांविषयीचे काही ग्रंथ निर्माण होतील, एवढे लिखाण सनातन संस्थेकडे संग्रहित आहे. योग्य काळ आला की, हेही ग्रंथ आपले नवीन रूप घेऊन समाजासमोर येतील. तेव्हा ही माहिती समाजाला सर्वस्वी नवीन असेल. ‘यातून अनेक जिज्ञासू निर्माण होतील आणि साधना करण्यास प्रवृत्त होतील’, यात शंका नाही.’
(क्रमशः
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (८.२.२०२२)
|