जागरूक अधिवक्ता ही उत्तम न्यायव्यवस्थेची शक्ती ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समिती आयोजित अधिवक्ता अधिवेशन !

खारघर (नवी मुंबई) – लोकशाहीची शक्ती म्हणजे जागरूक नागरिक, तर उत्तम न्यायव्यवस्थेची शक्ती म्हणजे जागरूक अधिवक्ता आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. समितीच्या वतीने खारघर येथे १८ फेब्रुवारीला आयोजित केलेल्या अधिवक्ता अधिवेशनामध्ये ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. या वेळी व्यासपिठावर सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता सुभाष झा, सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या वीणा थडाणी, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर उपस्थित होते.

अधिवेशनाचा प्रारंभ शंखनादानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला. अधिवेशनाचे प्रास्ताविक समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. या अधिवेशनामध्ये जिल्हा, उच्च आणि सर्वोच्च न्यायालय यांतील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील अनेक अधिवक्ते उपस्थित होते. याप्रसंगी सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी ‘राष्ट्र-धर्मकार्य साधना म्हणून कसे करावे ?’, याविषयी मार्गदर्शन केले.

अधिवेशनाला उपस्थित अधिवक्ते

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी मार्गदर्शन !

१. आपण जी हिंदु राष्ट्राची कल्पना करतो, तिचा केंद्रबिंदू ‘न्याय’ आहे. त्यामुळे यामध्ये समाजातील सर्व घटकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने न्यायव्यवस्था असेल. धर्मतेजसंपन्न अधिवक्तेच न्याय देऊ शकतील.

२. अव्यवस्थेला सुव्यवस्था करणे हीच हिंदु राष्ट्राची स्थापना असणार आहे.

हिंदूंना धर्मशिक्षणाची आवश्यकता ! – अधिवक्त्या वीणा थडाणी, सर्वोच्च न्यायालय

आपण आपल्या मुलांना ‘कॉन्व्हेंट’ शाळेत पाठवतो. अशा शाळांमध्ये ख्रिस्ती धर्माचे शिक्षण मुलांना दिले जाते; परंतु हिंदु शाळांमध्ये हिंदु धर्माचे शिक्षण दिले जात नाही. आज हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे.

‘भारताचे पुन्हा विभाजन होणार नाही’, या भ्रमात राहू नका ! – अधिवक्ता सुभाष झा, सर्वोच्च न्यायालय

वक्फ बोर्डाच्या माध्यमातून भूमी जिहाद चालू असून ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ‘अशा स्थितीत भारताचे पुन्हा विभाजन होऊ शकत नाही’, या भ्रमात कुणी राहू नये. तसे न होण्यासाठी आपण वेळीच जागृत होऊन संघटितपणे कार्य करणे आवश्यक आहे.

देशात मुसलमानांचे तुष्टीकरण होत आहे ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

देशामध्ये हिंदुविरोधी वातावरण निर्माण केले जात आहे. मुसलमानांचे तुष्टीकरण केले जात आहे. गांधींच्या हत्येच्या ७५ वर्षांनंतरही हिंदु विरोधासाठी या विषयाचा वापर केला जात आहे. गांधी हत्या झाली नसती, तर सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान झाले असते. गांधी हत्येचा लाभ जवाहरलाल नेहरू आणि ब्रिटन माऊंटबॅटन यांनी घेतला.

हिंदूंनी हलालप्रमाणित उत्पादने खरेदी न करण्याचा निश्चय करावा ! – अधिवक्त्या सिद्ध विद्या, उच्च न्यायालय

हलाल प्रमाणपत्र घेण्यासाठी व्यापार्‍यांना ५० सहस्र रुपये भरावे लागतात. हे प्रमाणपत्र बेकायदेशीरपणे दिले जात आहे. हा आर्थिक जिहाद असून त्याद्वारे संपूर्ण जगाचे इस्लामीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. ते रोखण्यासाठी हिंदूंनी ‘हलाल प्रमाणित उत्पादने खरेदी करणार नाही’, याचा निश्चय करायला हवा.

साम्यवादी विचारधारा विषारी ! – डॉ. अमित थडाणी, लेखक

‘अर्बन (शहरी) नक्षलवादी’ हे साम्यवादी विचारधारेचे आहेत. ही विचारधारा लोकशाहीत काही कामाची नाही. ती लोकशाहीला संपवून टाकणारी आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून साम्यवाद्यांनी आतापर्यंत १४ सहस्र लोकांना मारले आहे. त्यामुळे ही विचारधारा विषारी आहे.

धर्मरक्षण करणार्‍यांची फसवणूक टाळण्यासाठी संघटितपणे कार्य करणे आवश्यक ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

ईश्वरी अधिष्ठान ठेवून कार्य केल्याने यश मिळते, हे सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी मंदिरमुक्तीसाठी दिलेल्या लढ्यातून आपण पाहिले आहे. धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍यांना खोट्या तक्रारींमध्ये फसवले जाऊ नये, यासाठी संघटितपणे कार्य करणे आवश्यक आहे.

अन्य विशेष

महाराष्ट्रातील प्रस्तावित लव्ह जिहादविरोधी कायद्यात काय असायला हवे ? तसेच अवैध घुसखोर आणि त्यांच्याकडे मिळणारी भारतीय ओळखपत्रे हे रोखण्यासाठी करावयाचे प्रयत्न यांविषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अनेक अधिवक्त्यांनी मौलिक सूचना केल्या. या वेळी अधिवक्ता प्रशांत बिचुकले यांनी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांचे संघटन करतांना आलेले अनुभवकथन केले.

शिबिराविषयी अभिप्राय

अधिवक्ता मंगेश जेजुरीकर, पुणे : अधिवेशनाच्या माध्यमातून पुष्कळ ज्ञानार्जन झाले. माहिती आणि अनुभव यांची भविष्यातील वाटचालीसाठी उपयुक्त शिदोरी मिळाली. भविष्यात या अधिवेशनाचा मोठा परिणाम दिसून येईल.