‘कोल्हापूर प्रेस क्लब’च्या वार्षिक पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समिती गठित करू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत पुरस्कार मिळालेले विविध पत्रकार, तसेच मान्यवर

कोल्हापूर – कोणत्याही प्रश्नाला किंवा समस्येला वाचा फोडण्यासमवेतच समाजाला आरसा दाखवण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकार करतात. अशा या पत्रकारांनी मागणी केलेले प्रश्न मार्गी लावण्यात येतील, ‘पत्रकार सन्मान योजने’चा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर समिती गठित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ‘कोल्हापूर प्रेस क्लब’च्या वतीने आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, ‘प्रेस क्लब’चे अध्यक्ष शीतल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, कार्याध्यक्ष दिलीप भिसे, कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुखदेव गिरी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार, छायाचित्रकार आदी उपस्थित होते. या प्रसंगी ‘प्रेस क्लब’चे अध्यक्ष शीतल धनवडे, प्रशांत आयरेकर, सुखदेव गिरी यांनी स्वत:चे मनोगत व्यक्त केले, ‘प्रेस क्लब’चे सचिव बाबूराव रानगे यांनी आभार मानले. मुख्यमंत्री कक्षात काम करणारे आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूर्वी पत्रकारिता केलेले अमित हुक्केरीकर अन् प्रशांत साळोखे यांचा सन्मान करण्यात आला.

पत्रकार पुरस्काराचे मानकरी 

उत्कृष्ट पत्रकार : संतोष पाटील, ‘तरुण भारत संवाद’,

उत्कृष्ट छायाचित्रकार : बी.डी. चेचर – ‘सकाळ’,

उत्कृष्ट दूरचित्रवाहिनी पत्रकार : विजय केसरकर आणि नीलेश शेवाळे – ‘एबीपी माझा’

‘व्हाईट आर्मी’कडून मुख्यमंत्री महोदयांना ‘देवदूत’ पुरस्कार प्रदान ! 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजवर केलेल्या सामाजिक कामांसाठी आणि आपत्तीच्या कालावधीत केलेल्या साहाय्यासाठी ‘व्हाईट आर्मी’ या संस्थेने त्यांना ‘देवदूत’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. हा पुरस्कार ‘व्हाईट आर्मी’चे संस्थापक अशोक रोकडे यांच्या हस्ते देण्यात आला.