चंद्रपूर – ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार प्रखरपणे मांडणारे पत्रकार अश्विन अघोर यांचे अकाली निधन होणे धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या रूपाने एक प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार आपण गमावला आहे, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य, वने आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिवंगत पत्रकार अश्विन अघोर यांच्या निधनाविषयी दुःख व्यक्त केले आहे.
ते पुढे म्हणाले की, त्यांच्या स्वभावात वैदर्भीय दिलखुलासपणा आणि मिश्किलपणा ठासून भरला होता. जीवनात यश मिळवतांना अनेक संकटांना त्यांनी खिलाडूपणे हसतमुखाने तोंड दिले. अनेक वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांमधील यशस्वी कारकिर्दीनंतर आपल्या ‘घनघौर’ या लोकप्रिय यू ट्यूब चॅनेलवरून खर्या बातम्या आणि बातम्यांमागच्या सत्याचा शोध अव्याहतपणे मांडणार्या अश्विन यांच्या अकाली जाण्याने सिद्ध झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवत राहील. आपल्या लिखाणातून आणि व्हिडिओ वार्तापत्रातून मांडलेल्या विश्लेषणातून त्यांनी जनजागृतीचे मोठे कार्य सातत्याने केले. माध्यम क्षेत्रातील सद्य प्रलोभनांपासून दूर राहून वैचारिक पत्रकारितेचा एक आदर्श अश्विन अघोर यांनी उभा केला. राष्ट्रविरोधी नरेटिव्ह खोडून काढतांना नवीन पालटत्या तंत्रज्ञानाचा अतिशय चांगला उपयोग त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात करून घेतला. पर्यावरण आणि जैवविविधता यांचाही त्यांचा चांगला अभ्यास होता.