मुसलमानांनी ज्ञानवापी आणि शाही ईदगाह मशीद हिंदूंना सोपवावी ! – के.के. महंमद

पुरातत्व शास्त्रज्ञ के.के. महंमद

थिरुवनंतपूरम् (केरळ) – मुसलमानांनी वाराणसीतील ज्ञानवापी आणि मथुरेतील शाही ईदगाह मशीद हिंदूंना सोपवावी, असे आवाहन श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या उत्खनानानंतर महत्त्वाचे निष्कर्ष काढणारे पुरातत्व शास्त्रज्ञ के.के. महंमद यांनी मुसलमानांना केले आहे. ते एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

१. के.के. महंमद पुढे म्हणाले की, ज्ञानवापी आणि ईदगाह हिंदूंच्या स्वाधीन करणे, हा या समस्येवर एकमेव उपाय आहे. सर्व धर्मगुरूंनी संघटित होऊन या वास्तू हिंदूंच्या हातात द्याव्यात. काशी, मथुरा आणि अयोध्या हिंदूंसाठी खूप विशेष आहेत. त्या भगवान शिव, भगवान श्रीकृष्ण आणि प्रभु श्रीराम यांच्या जीवनाशी संबंधित आहेत. येथे बांधलेल्या मशिदींविषयी मुसलमानांच्या भावना नाहीत.

२. केरळच्या कोळीकोड येथे रहाणारे ७१ वर्षीय महंमद म्हणाले की, बाबरी ढाच्याच्या निष्कर्षांविषयी कथन केल्याने आजही मला जिवे मारण्याच्या धमक्या येतात. केरळ येथे बंदी घातलेली ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ही संघटना आधी पुष्कळ सक्रीय होती.

कोण आहेत के.के. महंमद ?

के.के. महंमद वर्ष २०१२ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या उत्तर विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून निवृत्त झाले. वर्ष १९७६ मध्ये बाबरी ढाच्याचे उत्खनन करणार्‍या बी.बी. लाल यांच्या पथकाचा ते भाग होते. महंमद यांना २२ जानेवारीच्या श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण होते; परंतु ते शारीरिक त्रासांमुळे जाऊ शकले नाहीत.