फोंडा (गोवा) – मुंबई येथील नाट्यप्रशिक्षक आणि अभिनेते श्री. देव फौजदार यांनी २४ डिसेंबर २०२३ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्राला सदिच्छा भेट दिली. त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ. बेला बारोट-फौजदार आणि २ विद्यार्थीही उपस्थित होते. सौ. शुभांगी शेळके (एम्.ए. नाट्यकला आणि लोककला) यांनी त्यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कार्याची ओळख करून दिली.
सौ. शुभांगी शेळके आणि विश्वविद्यालयाचे श्री. आशिष सावंत यांनी त्यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनविषयक कार्याची माहिती संगणकीय प्रणालीद्वारे दाखवली. संशोधनविषयक कार्य पाहिल्यावर श्री. देव फौजदार म्हणाले, ‘‘सनातन संस्कृती आणि परंपरा यांना दिलेला वैज्ञानिक आधार पाहिल्यावर मन आनंदाने भरून गेले. ‘आपण कायम विद्यार्थीदशेत (शिकण्याच्या स्थितीत) रहायला हवे’, हे लक्षात आले.’’
श्री. देव फौजदार यांची ओळख
श्री. देव फौजदार हे नाट्यप्रशिक्षक आणि अभिनेता असून मुंबई येथे स्वतःची नाट्यप्रशिक्षण संस्था (स्टुडिओ आणि थिएटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) आहे. तेथे ते अभिनय शिकवतात. त्यांनी भारतभ्रमण करून अनेक नाट्य कार्यशाळा घेतल्या आहेत. ते नाट्याच्या प्रशिक्षणासमवेत कला आणि पंचतत्त्व यांना जोडण्यासाठी विविध प्रयोग करतात. त्यामुळेच ते महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील सूक्ष्म अभ्यास जाणून घेण्यासाठी उत्सुक होते.
वैशिष्ट्यपूर्ण
१. श्री. आशिष सावंत यांनी त्यांना संशोधनविषयक कार्य सांगतांना ‘नामजप आणि साधना केल्याने व्यक्तीच्या प्रभावळीतील (ऑरामधील) नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन, सकारात्मक ऊर्जा वृद्धींगत होते’, असे सांगितले. हे ऐकून श्री. देव फौजदार आणि यांच्या विद्यार्थ्यांनी लगेच प्रभावळ मोजणारे ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) उपकरण पहाण्याची जिज्ञासा व्यक्त केली. ‘उपकरण कसे काम करते ?’, हे त्यांनी जाणून घेतले.
‘नामजप करण्यापूर्वी आणि सनातन संस्थेच्या रामनाथी आश्रमातील श्री सिद्धिविनायक गणपतीच्या समोर बसून ५ मिनिटे नामजप केल्यावर स्वत:च्या प्रभावळीत काय परिणाम होतो ?’, याविषयीचा अभ्यास त्यांनी ‘यू.ए.एस्.’ उपकरणाच्या माध्यमातून जिज्ञासेने केला. नामजप करण्यापूर्वीच्या तुलनेत नामजप केल्यावर त्यांच्या स्वत:च्या सकारात्मक उर्जेच्या प्रभावळीत वाढ झाल्याचे त्यांना दिसून आले. यातून साधना आणि नामजप यांचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले.
२. श्री. देव फौजदार यांचे विद्यार्थी श्री. तेजस यादव आणि श्री. कुलदीप मालवीय यांनाही सनातन संस्थेचा आश्रम पुष्कळ आवडला. श्री. कुलदीप मालवीय म्हणाले, ‘‘मला संपूर्ण आश्रम पहातांना सकारात्मकता, थंडपणा आणि सकारात्मक ऊर्जा यांचा अनुभव आला.’’
अभिनेते देव फौजदार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट !या वेळी त्यांनी सनातन संस्थेच्या रामनाथी येथील आश्रमालाही भेट दिली. सनातनचे साधक श्री. वैभव माणगावकर यांनी त्यांना आश्रमात चालणार्या राष्ट्र-धर्म कार्याविषयी माहिती सांगितली. आश्रम पाहिल्यावर व्यक्त केलेल्या अभिप्रायात श्री. देव फौजदार म्हणाले, ‘‘मी आश्रमातील सर्व संत आणि साधक यांना सहृदय नमन करतो. सामान्यतः आपण स्वतःला बाह्य रूपानेच जाणतो. सूक्ष्मरूपाने स्वतःला जाणायला हवे आणि याद्वारे जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होणे आवश्यक आहे.’’ या वेळी सौ. बेला बारोट-फौजदार यांना आश्रम पाहिल्यावर शांतीची अनुभूती आली. ‘सनातन संस्था सांगत असलेली साधना प्रत्येक जीवाच्या उद्धारासाठी महत्त्वपूर्ण असल्याने समाजातील प्रत्येक व्यक्तीकडे ती पोचायला हवी’, असे त्या म्हणाल्या. |