१. आध्यात्मिक त्रास चालू होणे आणि नामजपाचे उपाय केल्यावर झोप लागणे
‘१०.४.२०२३ या दिवशी संध्याकाळी माझी प्राणशक्ती अकस्मात् अल्प झाली. मला डोळे उघडता येईना आणि काहीच हालचाल करता येईना, तसेच माझ्या डोक्यात असह्य कळा येत होत्या. त्या वेळी मी खोलीत एकटीच होते. देवाने मला सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना नामजपादी उपाय विचारण्यासाठी आणि यजमानांना (श्री. रवी साळोखे यांना) साहाय्यासाठी बोलावण्यासाठी संपर्क करायला बळ दिले. मी सायंकाळी ५ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत उपाय करत होते. या कालावधीत ६० टक्के आध्यात्मिक पातळीची एक साधिका माझ्यासाठी जप करत होती. काही प्रमाणात त्रास न्यून झाल्यावर मी झोपू शकले.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी स्वप्नात येऊन आश्वस्त करून चैतन्य दिल्यामुळे त्रास न्यून होणे
त्या पहाटे माझ्या स्वप्नात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सद्गुरु राजेंद्रदादा आणि पू. (सौ.) अश्विनी पवार हे चौघे आले. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी माझे डोके त्यांच्या मांडीवर घेतले आणि माझ्या गालावरून आईच्या मायेने हात फिरवला. त्या मला म्हणाल्या, ‘तुला फार त्रास होतो आहे ना ! आमचे सर्वांचे तुझ्याकडे लक्ष आहे. तुला बळ देण्यासाठी सद्गुरु दादा आणि पू. अश्विनीताई इथेच आहेत. तुझे जसे प्रयत्न होत आहेत, तसेच चालू ठेव. काळजी करू नकोस. लवकरच सर्व ठीक होईल.’ त्याच वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ माझ्या यजमानांना म्हणाल्या, ‘तिला काही हवे-नको ते बघ. तिची काळजी घे.’ त्याच क्षणी मला जाग आली. पहाटेचे ४.४५ वाजले होते. मला अतिशय उत्साही आणि आनंदी वाटत होते. चारही संतांनी येऊन मला चैतन्य दिल्यामुळे माझा त्रास दूर झाला. आदल्या दिवशी इतका त्रास होऊनही मी दुसर्या दिवशी नेहमीप्रमाणे सेवेला जाऊ शकले.
माझी काहीच पात्रता नसतांना आणि माझ्याकडून अपेक्षित असे काहीच प्रयत्न होत नसतांना सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी माझ्यावर भरभरून कृपा केली. त्यांच्या या अपार प्रीतीसाठी मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ, सद्गुरु राजेंद्रदादा आणि पू. अश्विनीताई या सर्वांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. तुम्हा सर्वांना अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न तुम्हीच माझ्याकडून करवून घ्या, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. राधा रवींद्र साळोखे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.४.२०२३)
|