पर्यावरणीय स्थैर्य राखण्यासाठी भौतिक विकासावर अंकुश हवा !

भारताला प्रकल्पांचे वेड लागले आहे. महाराष्ट्र यात आधीपासून पुढे होता. त्यात आता अजून बर्‍यापैकी नैसर्गिक स्थितीत असलेल्या कोकणाचे भले करण्याचा विचार जोरात चालू आहे. आता सिंधुदुर्गात छुप्या विकासाचा जलविद्युत् प्रकल्प करत आहेत आणि ‘कोकाकोला’ या शीतपेय कारखान्याचे भूमीपूजन झाले. ‘प्रत्येक प्रकल्पाने भूमी, म्हणजे पृथ्वी छिन्न विच्छिन्न होते, तरी तिचे पूजन करतो’, असे म्हणायला माणसे धजावतात कशी ?

औद्योगिकीकरण

 १. मानवी वृत्ती आणि मानवाचा कल

अधिवक्ता गिरीश राऊत

प्रकल्प करायचा. त्यात लाखो झाडे नष्ट होत आहेत, तरी तो करायचा; कारण माणसे जगली पाहिजेत, म्हणजे झाडे माणसांना जगवत नाहीत, तर प्रकल्प जगवतो; कारण तो नोकरी देतो. नोकरी पैसे देते. मग त्या पैशातून जगता येते. म्हणजे काय होते ? जगण्यासाठी अन्न लागते. पैशातून अन्न घेता येते. जर अन्न घेण्यासाठीच नोकरी करायची, म्हणजे प्रकल्प करायचा, तर पृथ्वीकडून अन्नच सरळ का मिळवायचे नाही ? त्यासाठी मध्ये प्रकल्प आणि नोकरी कशाला हवी ?

यात स्पष्टपणे गोंधळ आहे. ही समजून उमजून केलेली क्लृप्ती आहे. नोकरी करणारा व्यक्ती अन्नासाठी वेतनातील फार अल्प हिस्सा व्यय करत आला. मोठा हिस्सा तर उद्योगात निर्माण झालेली आणि पूर्वी पृथ्वीवर नसलेली औद्योगिक उत्पादने विकत घेण्यासाठी तो व्यय करतो. ती घेतली नाही, तर माणूस मरणार नसतो. ‘कोविड’ महामारीच्या काळात उद्योग बंद होते; म्हणून कुणी मरण पावले नाही. पृथ्वी त्या वेळी मानवजातीला छान जगवत होती.

२. औद्योगिकीकरण हा शाप आहे, वरदान नाही !

मग जगण्यासाठी नोकरी देण्याचे खोटे ढोंग कशाला ? जगात उद्योग येण्याआधी शेती युगात माणसे सहस्रो वर्षे जगत होती. त्याआधी ७० लाख वर्षे आदिमानव काळ होता. उलट तेव्हा शुद्ध आणि मुबलक स्वरूपात हवा, पाणी अन् अन्न मिळत होते. मानवजात आणि जीवसृष्टीचे उच्चाटन घडवणारी तापमानवाढ अन् हवामान पालटाची समस्या तेव्हा निर्माण झाली नव्हती. ही समस्या औद्योगिक जीवनशैलीची देणगी आहे; म्हणून ‘औद्योगिकीकरण हा शाप आहे, वरदान नाही !’

३. पर्यावरणाच्या समस्यांविषयीचा भ्रम तोडणे आवश्यक !

नद्या अशुद्ध, प्रदूषित, खंडित होणे, मातीचा थर धुपून जाणे, जैव विविधता नष्ट होणे, अन्नोत्पादन घटत जाणे आणि उष्णतेच्या लाटा येणे यांसह सर्व समस्यांचे मूळ वर्ष १७५६ मध्ये आलेल्या स्वयंचलित यंत्रात आहे. धरणे, खाणी आणि त्यानंतर आलेले सिमेंट, वीज, मोटारीसह इतर वाहने, टीव्ही, धुलाई यंत्र, वातानुकूलित यंत्र, शीतकपाटे, संगणक, भ्रमणभाष संच अशा अनेक मानवनिर्मित कृत्रिम वस्तूंच्या जीवनशैलीत पर्यावरणाच्या समस्यांचे मूळ आहे; मात्र पृथ्वी जीवन देण्यासाठी आहे, नोकरी देण्यासाठी नाही. पृथ्वी आणि तिने दिलेल्या जीवनाला गृहित धरण्याची चूक केली जात आहे. भौतिक विकासाला पृथ्वीवर स्थान नाही. पृथ्वीने निर्माण केलेल्या गोष्टींच्या मर्यादेतच मानवाचे जीवन टिकवता येईल. तंत्रज्ञान वा आर्थिक बळाने नाही.

पृथ्वीच्या सरासरी तापमानात वाढ

४. भौतिक विकास करतांना मानवी जीवनाचा विचार हवा !

‘औद्योगिकीकरण चालू राहील’, असे धरले, तर विनाश अटळ आहे. सौर, पवन किंवा हायड्रोजन यांचा ऊर्जेसाठी वापर केला, तरी तो टळणार नाही. ऊर्जांवर नाही, तर आवश्यकतांवर विचार झाला पाहिजे. जीवन ही आवश्यकता आहे, जीवनशैली ही आवश्यकता नाही. ज्यांच्या निर्मितीसाठी ऊर्जा लागते, त्या कृत्रिम वस्तू वापरायच्याच नाहीत. माणसाने वस्तू निर्माण केल्या; पण जीवन निर्माण केले नाही. ते पृथ्वीने निर्माण केले. प्रकल्प करणे, म्हणजे आपल्याला अस्तित्व देणार्‍या पृथ्वीच्या विरोधात जाणे. १५ किलो वजनाची गार (बर्फ) पडू लागली, तरी शहाणपण येत नाही. २ वर्षांनी पृथ्वीच्या सरासरी तापमानात बर्‍यापैकी वाढ होईल, भौतिक विकासामुळे पर्यावरणीय स्थैर्य पूर्ण नष्ट होईल आणि मुंबईसह भारताच्या किनारपट्टीत अशा काही किलो वजनाच्या गारा पडू लागतील. मग औद्योगिकीकरण जगवत होते कि पृथ्वी ? ते समजेल. प्रत्येक दुर्घटना मृत्यूघंटा वाजवत आहे. विकासाचे ढोल थांबवले, तर या मृत्यूघंटेचा आवाज ऐकू येईल.

– अधिवक्ता गिरीश राऊत, निमंत्रक, भारतीय जीवन आणि पृथ्वीरक्षण चळवळ.