पोप फ्रान्सिस यांचा माजी सल्लागार कार्डिनल एंजेलो बिसीयू याच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पोप क्षमा मागणार का ?

ख्रिस्ती धर्मगुरूच्या घोटाळ्याच्या प्रकरणावर भारतातील कथित निधर्मीवादी आणि प्रसारमाध्यमे काही बोलणार का ?

व्हॅटिकन सिटी

नुकतीच एक धक्कादायक बातमी वाचण्यात आली. १६.१२.२०२३ या दिवशी सुप्रसिद्ध व्हॅटिकन सिटीमध्ये एक काळा इतिहास घडला. व्हॅटिकन न्यायालयाने एंजेलो बिसीयू (वय ७५ वर्षे) या शक्तीशाली समजल्या जाणार्‍या इटालियन वरिष्ठ धर्मगुरु, म्हणजेच कार्डिनल (कार्डिनल म्हणजे चर्चमधील वरिष्ठ धर्मगुरु) याला मालमत्तेचा आर्थिक घोटाळा केल्याच्या गुन्ह्यासाठी साडेपाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली ! त्यासमवेत बिसीयू याची त्या पदावरून कायमची हकालपट्टी आणि ८ सहस्र डॉलर्सचा (६ लाख ६४ सहस्र रुपये) दंड हेही शिक्षेत नमूद आहे. कार्डिनल बिसीयू हा पोप फ्रान्सिसचा माजी सल्लागार होता. इतकेच नव्हे, तर पोप या पदाचा दावेदारही मानला जात होता. बिसीयूवर आर्थिक घोटाळा, पदाचा अपलाभ आणि साक्षीदारांशी छेडछाड करण्याचा आरोप आहे. या प्रकरणात बिसीयू याच्या व्यतिरिक्त काही भांडवलदार, अधिवक्ते आणि व्हॅटिकन सरकारचे माजी कर्मचारी असे मिळून १० जण सहभागी आहेत. या सर्वांच्या नावावर साधारण ३४०० सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा आहे.

१. काय आहे प्रकरण ?

अधिवक्त्या (श्रीमती) श्रुति भट

‘राफेल मिंसिकोन’ या इटालियन गुंतवणूक व्यवस्थापकाच्या मालकीची लंडनमध्ये असलेली एक मालमत्ता त्याला विक्री करायची होती. व्हॅटिकन सरकार ही मालमत्ता विकत घेऊन तिचे एका भव्यदिव्य आणि आरामदायी संकुलात रूपांतर करून सदनिकांच्या माध्यमातून पैसे कमावण्यास इच्छुक  होते. त्यासाठी व्हॅटिकन सरकारने राफेलशी एक करार करण्याचे ठरवले. हा करार पूर्णत्वास नेण्यासाठी व्हॅटिकन सरकारने कार्डिनल बिसीयू याची नियुक्ती केली आणि त्याला कराराशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार दिले. याचाच बिसीयूने अपलाभ घेतला. ही मालमत्ता विकत घेण्यासाठी व्हॅटिकन चर्चने पैसा उभा करून बिसीयूला उपलब्ध करून दिला; परंतु त्या पैशांचा उपयोग त्याने मालमत्ता खरेदी करण्याऐवजी अन्य कारणांसाठी केला. या रकमेतून त्याने स्वतःच्या भावाच्या खासगी संस्थेला अनुदान दिले, तसेच त्याने आणखी काही मोठ्या रकमा परस्पर अन्य कारणांसाठी व्यय केला. काही इटालियन भांडवलदार आणि व्हॅटिकन राज्य सचिवालयातील काही माजी कर्मचारी यांच्याशी संगनमत करून त्याने लंडनमधील मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचा करारही केला; परंतु या करारामुळे व्हॅटिकन सरकारला काही लाभ तर झाला नाहीच, उलट मोठी हानी सोसावी लागली. तेव्हा कार्डिनलचा महाआर्थिक घोटाळा उघडकीस आला आणि त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. वर्ष २०२१ मध्ये हा खटला चालू झाला आणि १६ डिसेंबर २०२३ या दिवशी या ऐतिहासिक खटल्याचा निकाल लागला. गुन्ह्यातील सर्व आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली.

२. पोप या प्रकरणासाठी क्षमा मागणार का ?

या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद जगभर उमटले आहेत, यात मुळीच आश्चर्य नाही; कारण हा खटला ‘हायप्रोफाईल’ (उच्चस्तरीय) खटला आहे. ‘प्रत्यक्ष वरिष्ठ धर्मगुरु यात गुन्हेगार आहे’, ही मोठ्या खेदाची गोष्ट आहे. ज्या पोपचा आणि कार्डिनलचा डंका संपूर्ण जगात सतत वाजत असतो, त्या पदांची अब्रू या खटल्याच्या निमित्ताने जगाच्या वेशीवर टांगली गेली आहे. प्रश्न असा आहे की, पोप यासाठी क्षमा मागणार का ? प्रायश्चित्त घेणार का ?

३. ख्रिस्ती संस्कृती ही खरोखर ‘संस्कृती’ आहे का ?

या प्रकरणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भारतातील दिवंगत ख्रिस्ती धर्मगुरु (?) स्टॅन स्वामी याची आठवण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या प्रकरणात स्टॅन स्वामीला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली (यूएपीए) आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. आजारपणातच त्याचा मृत्यूही झाला होता.

प्रश्न असा आहे की, पैशांचा लोभी बिसीयू किंवा हिंसाचारी स्टॅन स्वामी या प्रवृत्तीच्या माणसांना (?) धर्मगुरु पदावर बसवणारी ख्रिस्ती संस्कृती ही खरोखर ‘संस्कृती’ आहे का ? कि ही त्या शब्दाची विटंबना आहे ?

– अधिवक्त्या (श्रीमती) श्रुति भट, अकोला. (१८.१२.२०२३)