राष्ट्रघातकी करबुडवेगिरी !

काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्याकडे ३५० कोटी रुपये एवढी रक्कम रोख सापडली. याविषयी खुलासा करतांना त्यांनी ही रक्कम त्यांच्या व्यवसायाचे उत्पन्न असल्याचे सांगितले. अशीच काही प्रकरणे गेल्या काही वर्षांपासून अधूनमधून पुढे येत आहेत. तेवढ्यापुरता त्यांचा गाजावाजा होतो आणि नंतर प्रकरण शांत होते. त्या रकमेचे काय झाले ? अपराधी कोण ? त्याला शिक्षा झाली का ? या सगळ्या गोष्टी जनतेपुढे क्वचित्च येतांना दिसतात.

काँग्रेसचे खासदार धीरज साहू

१. उत्पन्न लपवून ठेवणे

या प्रकरणांमधून ठळकपणे दिसून येते ते, म्हणजेही रक्कम शासनाच्या दृष्टीस येऊ नये, यासाठी लपवलेली असते. थोडक्यात आयकर विभागापासून लपवून ठेवण्यात येते. ‘यामागील मानसिकतेचा विचार करायला हवा,म्हणजे असे अपराध का घडतात ?’, हे लक्षात येईल. काही प्रकरणांत अशी रक्कम सापडते, तेव्हा तो भ्रष्टमार्गाने कमावलेला, म्हणजे काळा पैसा असतो. तो कुणाच्याही निदर्शनास येऊ नये; म्हणून अशा प्रकारे लपवून ठेवलेला आढळतो.

२. करबुडवेगिरी

श्री. धैवत वाघमारे

साहू यांच्या प्रकरणात त्यांनी केलेल्या खुलाशाप्रमाणे तो त्यांच्या व्यवसायातून त्यांना मिळालेला पैसा आहे. येथे प्रश्न पडतो, ‘वैध मार्गाने मिळवलेला पैसा असा धोकादायक स्थितीत कसा ठेवलेला असू शकतो ?’ आज सर्वसामान्य व्यवसाय करणार्‍या व्यक्तीचेही अधिकोषात ‘चालू खाते’ (करंट अकाऊंट) असते. त्यात तो प्रतिदिनची मिळकत जमा करत असतो. मग एवढा मोठा व्यवसाय असतांना ती रक्कम अशी घरात दडवून ठेवण्यामागे कारण काय ?

यामागील महत्त्वाचे कारण, म्हणजे शासनाला कर न देणे. शासनाला कर न देता व्यवसाय करणारे अनेक महाभाग आज देशात आहेत. सर्वांनी कर भरावा; म्हणून शासन आटोकाट प्रयत्न करत असतांनाही स्वतःचे उत्पन्न बुडू नये; म्हणून शासनाला कर देणे टाळले जाते. कर भरतांना अनेक गोष्टींचा उलगडा करावा लागतो. या गोष्टी शासनाला कळल्या, तर स्वतःकडील मालमत्ता बेहिशोबी आणि अवैध आहे, हे उघड होईल आणि उत्पन्नाचे अवैध मार्ग बंद होतील, ही भीती याला कारणीभूत आहे.

३. कर न भरणे देशासाठी अहितकारक !

जनतेला शासनाकडून अनेक सुविधांची अपेक्षा असते; परंतु कर भरण्याची तिची सिद्धता नसते. शासनाने ‘वस्तू आणि सेवा कर’ लागू केल्यानंतर ही गोष्ट ठळकपणे समोर आली. छोट्यातील छोट्या फेरीवाल्याचीही प्रतिदिनची प्राप्ती काही सहस्र रुपयांमध्ये असते. एवढे उत्पन्न असतांना कुणीही स्वतःहून कर भरण्यासाठी पुढे येत नाहीत, हे देशाच्या दृष्टीने अहितकारक आहे.

४. राष्ट्राच्या भरभराटीसाठी जनता आणि राजा दोघांचेही योगदान महत्त्वाचे !

प्राचीन भारतीय अर्थशास्त्रानुसार प्रत्येकाने त्याच्या उत्पन्नातील एक षष्ठांश कर राजाला द्यायला हवा. त्यातून तो प्रजेसाठी कल्याणकारी योजना राबवू शकतो. ‘जनतेने प्रामाणिकपणे कर भरावा आणि राजानेही जनतेवर अनावश्यक कर लादू नयेत’, असे मनु सांगतो. ‘राजा आणि जनता यांच्या परस्पर सहकार्यानेच राष्ट्राची उन्नती शक्य आहे’, असे मनूचे म्हणणे आहे. केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार राष्ट्रघातकी असतो. इतिहासात आणि अर्वाचीन काळातही विविध प्रकरणांत स्वार्थामुळे देशाची हानी कशी होते, याचे पुष्कळ पुरावे सापडतात. निःस्वार्थी जनता आणि प्रजापालक राजा असेल, तरच देशाची भरभराट शक्य आहे. हे केवळ हिंदु राष्ट्रातच शक्य असल्याने हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटिबद्ध व्हावे.’

– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१२.२०२३)