Indresh Kumar Appeal : २२ जानेवारील मशीद, दर्गे आणि मदरसे येथे ११ वेळा श्रीरामाचा जप करावा !

मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांचे आवाहन !

मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार

नवी देहली – मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे मार्गदर्शक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी २२ जानेवारी या दिवशी अयोध्येत श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी मुसलमानांच्या मशीद, दर्गा आणि मदरसे आदी  ठिकाणांमधून ११ वेळा ‘श्रीराम जयराम जय जय राम’चा जप करण्याचे आवाहन केले आहे. ते एका कार्यक्रमात ‘राम मंदिर, राष्ट्र मंदिर : एक साझा विरासत’ (राम मंदिर, राष्ट्र मंदिर : एक संयुक्त वारसा) या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी बोलत होते.

इंद्रेश कुमार म्हणाले की, देशातील ९९ टक्के मुसलमान आणि अहिंदू यांचा देशाशी नाते आहे. आपले पूर्वज एकच आहेत. या लोकांनी केवळ धर्म पालटला आहे, देश नाही. आमची ओळख एकच आहे. आमचा विदेशी लोकांशी काहीही संबंध नाही. मी गुरुद्वारा, चर्च आणि अन्य धार्मिक स्थळांना आवाहन करतो की, त्यांनी २२ जानेवारी या दिवशी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत श्रीरामजन्मभूमीवरील श्रीराममंदिराचे उद्घाटन दूरचित्रवाहिवरून सामूहिकरित्या पहावा आणि भारत, तसेच विश्‍वशांतीसाठी, बंधूभावासाठी प्रार्थना करा. यासाठी या प्रार्थनास्थळांना सजवण्यात यावे.

पुढच्या पिढी चारित्र्यसंपन्न निर्माण करण्यासाठी मर्यादा पुरुषोत्तम रामाची आवश्यकता आहे ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

या कार्यक्रमात केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान हेही उपस्थित होते. ते म्हणाले की, आपल्याला मर्यादा पुरुषोत्तम रामाची आवश्यकता आहे, जेणेकरून येणारी पिढी चारित्र्यसंपन्न निर्माण केली जाऊ शकेल. माझा जन्म कुणाच्या घरी झाला, याला महत्त्व नाही, तर मी काय करत आहे, हे महत्त्वाचे आहे.

(म्हणे) ‘मुसलमानांनी मशिदी सुरक्षित ठेवाव्यात !’ – असदुद्दीन ओवैसी

एम्.आय.एम्.चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी

एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी इंद्रेश कुमार यांच्या आवाहनावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना मुसलमानांना मशिदी सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे. ‘मुसलमानांच्या मशिदी, मदरसे आदी ठिकाणे उद्या कुणी कह्यात घेऊ शकतात’, अशा प्रकारच विधानेही खासदार आवैसी यांनी केले आहे.

संपादकीय भूमिका

श्रीराममंदिरासाठी केवळ ११ वेळा श्रीरामाचा जप करण्याचे आवाहन केल्यावर ओवैसी यांना मिरच्या झोंबल्या; पण जेव्हा हिंदू त्यांच्या मंदिरात सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली इफ्तारच्या मेजवान्या आयोजित करतात, मंदिर परिसरात नमाजपठणाला अनुमती देतात, तेव्हा ओवैसी मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !