हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूंत, तसेच प्रवासात किंवा संकटकाळातही धोतराचे होणारे विविध लाभ

‘सनातन संस्थे’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी आचारधर्माचे आचरण करण्याचे महत्त्व सनातनची नियतकालिके, ग्रंथ आणि संकेतस्थळे यांद्वारे सांगणे आरंभले. त्या वेळेपासून मी प्रतिदिन धोतर नेसण्याचे प्रयत्न चालू केले. तेव्हा सनातन हिंदु धर्मातील खरे वैज्ञानिक असलेल्या ऋषिमुनींनी स्वतः आचरण करून अभ्यासांती सर्वांना ‘साधना म्हणून आचारधर्माचे पालन करण्यास का सांगितले आहे आणि तसे आचरण केल्याने आपल्याला कसे लाभ होतात’, हे मला प्रत्यक्ष अनुभवता आले. त्यामुळे माझ्याकडून ऋषिमुनी आणि कलियुगामधील विज्ञानयुगातही आचारधर्माचे पालन करण्यास प्रोत्साहित करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. या काळात गुरुकृपेने धोतराच्या लाभांच्या अनुषंगाने शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. हिवाळ्यात धोतरांच्या साहाय्याने थंडीपासून कसे रक्षण करावे ?

श्री. गिरिधर वझे

१ अ. झोपण्यासाठी ऊबदार अंथरुण-पांघरुण सिद्ध करणे

 १ अ १. अंथरुण : एक सुती धोतर घेऊन त्याची दुहेरी घडी करावी आणि धोतर उपलब्धतेनुसार चटईवर, गोधडीवर किंवा गादीवर अंथरावे.

१ अ २. पांघरुण : एक सुती धोतर घेऊन त्याची दुहेरी घडी करावी आणि त्या स्थितीत धोतराच्या बाहेरून आवश्यकतेनुसार शाल, चादर किंवा गोधडी लावावी. नंतर ‘धोतराचा आतील भाग अंगाकडे राहील’, अशा प्रकारे ते पांघरावे.

वरीलप्रमाणे अंथरुण-पांघरुण म्हणून सुती धोतर वापरल्याने ऊबदारपणा वाढून आपले थंडीपासून रक्षण होण्यास साहाय्य होते.

१ आ. कान, नाक आणि घसा यांचे रक्षण करण्यासाठी धोतराचा वापर करणे : वरीलप्रमाणे सुती धोतर घेऊन त्याची आवश्यकतेनुसार १० ते १५ सें.मी. रुंदीची घडी करावी. हे घडी केलेले धोतर दोन्ही कानांभोवती किंवा दोन्ही कान, नाक आणि घसा यांच्याभोवती फेट्यासारखे किंवा ‘मफलर’सारखे गुंडाळल्याने धोतराच्या ऊबदारपणामुळे कान, नाक आणि घसा यांचे थंडीपासून रक्षण होते.

२. उन्हाळ्यात धोतराच्या साहाय्याने कडक उन्हापासून कसे रक्षण करावे ?

पांढर्‍या रंगाच्या धोतरातून सूर्यप्रकाश परावर्तित होतो. त्यामुळे उन्हात कामे करतांना आवश्यकतेनुसार डोके, कान आणि नाक यांभोवती धोतर गुंडाळल्याने आपले उन्हापासून रक्षण होण्यास साहाय्य होते. सर्वाधिक उकाड्याच्या काळातही धोतर पाण्याद्वारे आवश्यक तेवढे ओलसर करून ते अंगावर पांघरल्याने कडक उन्हाच्या झळा जाणवण्याचे प्रमाण न्यून होते.

३. पावसाळ्यात धोतराचा वापर करणे लाभदायी !

पावसाळ्याच्या काळात वातावरणात दमटपणा अधिक असतो आणि सूर्यप्रकाशाचे प्रमाण अल्प असते. त्यामुळे अन्य वस्त्रे किंवा चादर इत्यादी अंथरुण-पांघरुणांच्या तुलनेत धोतर अल्प जागेत वाळवता येते. त्यामुळे वरीलप्रमाणे धोतराचा उपयोग करणे पावसाळ्यातही लाभदायी असते.

४. रुमाल, धोतर यांसारखे पातळ कपडे कसे धुवावे ?

रुमाल, धोतर यांसारखे पातळ कपडे साबणाचा चुरा घातलेल्या पाण्यात काही वेळ भिजत घालावे. नंतर ते हातांद्वारे चोळून किंवा प्लास्टिकच्या घासणीने (स्क्रबरने) घासून धुता येतात. (रूमाल, धोतर यांसारखे पातळ कपडे धुण्यासाठी ‘ब्रश’ वापरल्याने कपड्यांचे आयुष्य घटते.) मग हे कपडे चांगल्या पाण्यामध्ये २ – ३ वेळा हाताने खळबळून लवकर वाळण्यासाठी दोन्ही हातांमध्ये धरून पिळावे आणि उपलब्ध जागेनुसार (धोतराच्या १ – २ घड्या करून) ते वाळत घालू शकतो.

५. धोतराच्या  गुणवैशिष्ठ्यiमुळे  नेहमीच होणारे विविध लाभ

अ. सुती धोतर पांढर्‍या रंगाचे असल्याने ते अन्य वस्त्रांपेक्षा अधिक सात्त्विक असते.

आ. वरील उपयोगांसाठी कुणाला जुने धोतर उपलब्ध झाले नाही, तरी पेठेत (बाजारात) अल्प गुणवत्तेचे आणि १०० टक्के सुती नसलेले धोतर अल्प मूल्यात उपलब्ध होते. असे धोतर नेसण्यासाठी विशेष लाभदायी नसले, तरी वरील उद्देशाने उपयोगी असते.

इ. अंथरुण-पांघरुणासाठी वापरलेली धोतरे ८ किंवा १५ दिवसांनी मळली किंवा त्यांना घामाचा दुर्गंध येत असेल, तर ती अत्यल्प श्रमामध्ये धुता येतात, तसेच ती अल्प जागेत अन् अन्य अंथरुण-पांघरुणाच्या तुलनेत अत्यल्प वेळेत वाळतात.

ई. प्रवासात किंवा संकट काळात अत्यल्प साहित्य ठेवण्यासाठी जागा उपलब्ध असते. त्या वेळी वरीलप्रमाणे २ धोतरे आणि शाल घेतली, तरी त्यांचे वजन अन्य अंथरुण-पांघरुणाच्या तुलनेत अल्प असते आणि ती अल्प जागेत (लहान पिशवीतही) ठेवता येतात.

वरील उद्देश साध्य करण्यासाठी पूर्वी वापरलेले जुने धोतर किंवा पातळ (सुती साडी) हेसुद्धा उपयुक्त असते.’

– श्री. गिरिधर भार्गव वझे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१.२०२३