Jammu Kashmir Terrorism : वर्ष २०२३ मध्ये जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी कारवायांत ६३ टक्क्यांची घट !

पोलीस महासंचालकांनी दिली माहिती !

जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक आर्.आर्. स्वेन माहिती देताना

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – वर्ष २०२३ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी कारवायांमध्ये मोठी घट झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक आर्.आर्. स्वेन यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०२३ मध्ये ४८ आतंकवादविरोधी कारवायांमध्ये ७६ आतंकवादी मारले गेले. यांपैकी ५५ जण विदेशी होते. वर्ष २०२२ च्या तुलनेत आतंकवादी घटनांमध्ये ६३ टक्के घट झाली. गेल्या वर्षी राज्यात १२५ आतंकवादी घटना घडल्या होत्या. यंदा ही संख्या ४६ वर आली आहे. महासंचालकांनी ३० डिसेंबर या दिवशी ही माहिती दिली.

पोलीस महासंचालक स्वेन यांनी सांगितलेली अशी आहे आकडेवारी !

१. वर्ष २०२३ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये २९१ आतंकवादी साथीदारांना अटक !

२. सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत २०१ ‘ओव्हरग्राउंड वर्कर्स’वर गुन्हा नोंद ! (जिहादी आतंकवाद्यांना पैसे पुरवणे, त्यांची निवासव्यवस्था पहाणे, येण्या-जाण्यासाठी साधन उपलब्ध करून देणे अशा प्रकारचे साहाय्य करणारे लोक म्हणजे ‘ओव्हरग्राउंड वर्कर्स’ !)

३. आतंकवादी भरतीतही ८० टक्के घट : वर्ष २०२२ मध्ये हा आकडा १३० होता, यंदा केवळ २२ !

४. जम्मू-काश्मीरमध्ये ३१ स्थानिक आतंकवाद्यांची ओळख पटली असून ही आतापर्यंतची नीचांकी संख्या !

५. राज्यात स्थानिक नागरिकांच्या हत्यांच्या घटनाही अल्प झाल्या असून गेल्या वर्षीच्या ३१ वरून ती संख्या आली १४ वर !

६. वर्ष २०२२ मध्ये १४ पोलीस हुतात्मा झाले होते, यंदा ही संख्या ४ असून ७१ टक्क्यांची घट !

७. आतंकवाद आणि फुटीरतावाद यांच्याशी संबंधित १७० कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या ९९ मालमत्ता जप्त !

८. पोलिसांकडून ८ सहस्र बनावट सोशल मीडिया खाती शोधली. त्यांतील बहुतेक देशाबाहेरून कार्यरत !

९. अनेकांची बँक खातीही गोठवण्यात आली !

१०. जम्मू विभागातील राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांत या वर्षी आतंकवादी कारवायांमध्ये वाढ ! दोन्ही जिल्ह्यांत १९ सैनिक आणि ७ नागरिक यांचा मृत्यू !

संपादकीय भूमिका

भारताच्या संरक्षणयंत्रणांनी केलेले हे कार्य गौरवास्पदच आहे. इस्रायल ज्याप्रमाणे हमासचा नायनाट करण्यासाठी गाझा पट्टीत आक्रमण करत आहे, तसे त्याच्या मित्रराष्ट्र भारताने आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून आतंकवाद्यांचे सर्व अड्डे नष्ट करावे, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते !