श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढण्यात पुणे येथील पंचांगकर्ते ज्योतिषी गौरव देशपांडे यांचा सहभाग !

पुणे – उत्तरप्रदेशातील अयोध्येत साकारत असलेल्या श्रीराममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी भारतातील मोजक्याच विद्वान ज्योतिषांनी मुहूर्त काढले आहेत. यामध्ये येथील पंचांगकर्ते ज्योतिषी गौरव देशपांडे यांचाही सहभाग असून त्यांनी काढलेल्या २२ जानेवारी २०२४ या दिवशीच्या मुहुर्तावरच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मंदिर पुनर्स्थापनेच्या कार्यात पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांचा वाटा असणे, ही पुणेकर आणि मराठीजन यांच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

गौरव देशपांडे याविषयी म्हणाले की,

१. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज २० एप्रिल २०२३ या दिवशी आळंदी येथे आले होते. तेथे त्यांनी मला बोलावून घेतले. माझा सत्कार करून ‘अयोध्येत साकारल्या जाणार्‍या श्रीराममंदिरातील रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सुयोग्य मुहूर्त आपण काढावा’, अशी इच्छा व्यक्त केली. ‘मुहूर्त २५ जानेवारीच्या आधीचा असावा’, अशी अटही त्यांनी घातली.

२. त्यांच्या विनंतीला मान देऊन मी २९ एप्रिलला ज्योतिष, मुहूर्त शास्त्र आणि धर्मशास्त्र यांच्या आधारे सोमवार, २२ जानेवारी हा दिवस आणि अयोध्येच्या अक्षांश-रेखांशानुसार मेष लग्नावरील विशिष्ट स्थिर नवमांश बघून मुहूर्त काढला.

३. २०२४ च्या आरंभीला १५ जानेवारी या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. याच दिवशी उत्तरायणाला प्रारंभ होत असून यामध्ये ‘सात्त्विक प्रकृती असलेल्या देवतांची स्थापना केली पाहिजे’, असे सांगण्यात आले आहे; मात्र २५ जानेवारीपर्यंत पौष महिना येत असल्याने या काळात श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करायची का ? हा प्रश्न होता. त्यानुसार अभ्यास केला असता बृहदैवज्ञ रंजन, विद्या माधवीय आणि मुहूर्त गणपति या दोन्ही ग्रंथांमध्ये ‘पौष मासात प्राणप्रतिष्ठा केली जाऊ शकते’, असा उल्लेख आहे. ‘या मासात प्राणप्रतिष्ठा केल्यास राज्यवृद्धी होते’, असेही म्हटले आहे.