सनातनचे १२४ वे (व्यष्टी) संत पू. सत्यनारायण रामअवतार तिवारी यांचा आज मार्गशीर्ष कृष्ण तृतीया (३०.१२.२०२३) या दिवशी ७४ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांची मुलगी होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांनी त्यांचा उलगडलेला साधनाप्रवास येथे दिला आहे.
पू. सत्यनारायण रामअवतार तिवारी यांना ७४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
पू. सत्यनारायण तिवारी यांचे बालपण अतिशय खडतर गेले; पण त्यांनी कधीही प्रामाणिकपणा सोडला नाही. त्यांच्या मनात समाजासाठी काही करायची तळमळ असल्यामुळे ते सतत इतरांना साहाय्य करण्यासाठी धडपडत असत. त्यांनी राजकारणात सक्रीय राहूनही प्रामाणिकपणे कार्य केले; पण ‘राजकारणात प्रामाणिकपणाचा काही लाभ नाही’, असे लक्षात आल्यावर त्यांनी खर्या अर्थाने साधनेला आरंभ केला. तसे ते आधी कुठल्या ना कुठल्या प्रकारे साधना करत होते; मात्र त्यांना सनातनच्या आश्रमात आल्यावर पुष्कळ शांती अनुभवता आली आणि त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील देवत्वाची अनुभूती आली. तेव्हापासून त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पुष्कळ श्रद्धा बसली आणि ते सतत त्यांच्या अनुसंधानात राहू लागले. त्यांच्यातील भाव आणि भक्ती यांमुळे ते लवकरच संतपदी विराजमान झाले.
१. जन्म
‘८.१२.१९४९ या दिवशी खामगाव (जि. बुलढाणा), महाराष्ट्र येथे पू. सत्यनारायण तिवारी यांचा (माझ्या वडिलांचा) जन्म झाला. त्यांना एक सख्खी बहीण (श्रीमती जमुनाबाई शुक्ला, वय ७७ वर्षे) असून ती विवाहित आहे. सध्या ती शेंदुर्णी (जि. जळगाव) येथे असते.
२. बालपणी केलेले कष्ट
लहानपणी पू. बाबांची कौटुंबिक परिस्थिती पुष्कळ हलाखीची होती. त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या समवेत भाजी विकणे, रिक्शा चालवणे, अशी विविध कष्टाची कामे केली. त्यांना समाजाकडून पुष्कळ कटू अनुभव आले. अनेक वेळा भूक लागली असतांना त्यांना जेवायला मिळत नव्हते. तेव्हा ते पाव पाण्यात बुडवून खायचे; पण काही वेळा पाव विकत घ्यायलाही त्यांच्याकडे पैसे नसायचे.
३. शिक्षण
कष्ट करून पैसे मिळवत त्यांनी कला शाखेत पदवीचे शिक्षण (B.A.) पूर्ण केले.
४. नोकरी आणि सक्रीय राजकारण करणे
शिक्षण झाल्यावर त्यांनी संभाजीनगर येथील सूतगिरणीत कामगार म्हणून नोकरी केली. ती बंद पडल्यावर त्यांनी संभाजीनगर येथील ‘देवगिरी टेक्सटाईल मिल’मध्ये लेखा विभागात कारकून म्हणून नोकरी केली. त्यांना सामाजिक कार्य आणि इतरांना साहाय्य करणे आवडत असल्यामुळे नोकरी करत असतांना ते राजकारणात सक्रीय झाले. राजकारण करतांना त्यांचे घराकडे लक्ष नसायचे. ते एक कुशल वक्ता होते. ते भाषणाची सिद्धता न करताही उत्स्फूर्तपणे उत्तम भाषण करायचे. त्यांनी २० – २२ वर्षे निरपेक्षभावाने राजकारणात प्रामाणिकपणे कार्य केले. त्यामुळे अनेक मंत्री त्यांना नावानिशी ओळखत असत; परंतु ‘राजकारणात प्रामाणिकपणाचे काही मूल्य नाही’, हे जाणल्यावर त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला आणि वर्ष २००७ पासून ते पूर्णपणे अध्यात्माकडे वळले.
५. समाजातील कुणाही व्यक्तीचे निधन झाल्यावर त्याच्या अंत्यविधीसाठी साहाय्य करणे
समाजातील कुणाच्याही निधनाचे वृत्त कळताच बाबा लगेच तिथे जाऊन त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना साहाय्य करत असत. ‘लहान-मोठा’ किंवा ‘गरीब-श्रीमंत’, असे न पहाता बाबा प्रत्येक अंत्यसंस्कारासाठी निरपेक्षपणे साहाय्य करत. तेथून घरी आल्यावर ते आम्हाला आवर्जून सांगत, ‘‘जगात मृत्यूच सत्य आहे. कुणाचे काही खरे नाही. सर्वकाही देवाच्याच हातात आहे.’’
६. वडिलांचे (पू. सत्यनारायण तिवारी यांचे) झालेले सन्मान !
६ अ. वडील कामगारांचा नेता बनणे आणि ते कामही चांगले केल्यामुळे त्यांना ‘गुणवंत कामगार’ म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणे : पू. बाबांना अन्यायाविरुद्ध चीड होती. त्यामुळे नोकरी करतांना एखाद्या कामगारावर अन्याय झाल्यास ते पुढाकार घेऊन त्याला साहाय्य करत. त्यांच्यातील उत्तम नेतृत्व गुणामुळे कामगारांनी त्यांना त्यांचा नेता म्हणून निवडले. ते कामगारांच्या संघटनेचे (‘युनियन’चे) नेते झाले. हे कामही त्यांनी चोखपणे केल्याने त्यांना ‘गुणवंत कामगार’ म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला.
६ आ. वडिलांमधील प्रामाणिकपणामुळे त्यांना ‘ऑनररी मॅजिस्ट्रेट’ म्हणून अधिकार मिळणे : पू. बाबांचा समाजातील लोकांना साहाय्य करण्याचा स्वभाव असल्याने ते नेहमी समाजसाहाय्य करण्यात व्यस्त असायचे. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना शासनाकडून ‘ऑनररी मॅजिस्ट्रेट’ हा अधिकार देण्यात आला. त्यामुळे कुणाला छायांकित प्रतींवर सही-शिक्का हवा असल्यास पू. बाबांची स्वाक्षरी उपयोगी पडायची. जिल्ह्यात अन्य दोघांनाही हा अधिकार होता; पण ते एकेका स्वाक्षरीचे पैसे घ्यायचे; परंतु बाबांना पैशांचा लोभ नव्हता. त्यामुळे ते निरपेक्षपणे स्वाक्षरी-शिक्का देत असत. त्याचप्रमाणे व्यक्ती कुठल्याही वेळी स्वाक्षरी मागायला आली, तरी ते लगेच स्वाक्षरी करून देत असत.
७. वडिलांना आलेल्या अनुभूती
७ अ. ‘वडिलांनी मुलाला बरे वाटू दे’, यासाठी मारुतिरायाला नवस बोलल्यानंतर मुलगा बरा होणे : माझा भाऊ लहानपणी पुष्कळ रुग्णाईत होता. ताप डोक्यात जाऊन त्याला चक्कर (फीट) आली आणि त्याने डोळे पांढरे केले. बाबांना हे कळल्यावर त्यांनी लगेच जवळच्या मारुतिरायांच्या देवळात जाऊन प्रार्थना केली आणि ते नवस बोलले, ‘माझ्या मुलाला बरे कर. मी तुला चांदीचे डोळे वाहीन.’ त्यानंतर २ दिवसांत भाऊ बरा झाला.
७ आ. पत्नी ‘कोमा’त गेल्यावर श्री गणेशाची मूर्ती पाण्यात ठेवून साकडे घातल्यावर पत्नी शुद्धीवर येणे : वर्ष १९९५ मध्ये माझी आई ‘कोमा’त (बेशुद्धीची अवस्था) गेली होती. तेव्हा आधुनिक वैद्यांना ‘ती जिवंत रहाणार नाही आणि राहिली, तरी तिची स्मृती राहील कि नाही ?’, अशी शंका होती. तेव्हा अन्य कुणा नातेवाइकांना सांगण्याऐवजी बाबांनी श्री गणेशाची मूर्ती पाण्यात ठेवली आणि त्याला साकडे घातले, ‘तूच माझ्या पत्नीला या संकटातून बाहेर काढ.’ त्यानंतर २४ घंट्यांनंतर आई शुद्धीवर आली आणि तिची स्मृतीही चांगली राहिली.
८. कुलाचार न केल्यामुळे घरी होत असलेले त्रास
८ अ. घरी कधी श्राद्धविधी न केल्यामुळे कुटुंबियांना पूर्वजांचे अनेक तीव्र त्रास सहन करावे लागणे : पू. बाबांना समजू लागले, तेव्हापासून आमच्याकडे कधीच श्राद्धविधी केले नव्हते. त्यामुळे आम्हाला पूर्वजांचे पुष्कळ त्रास होते.
१. माझे आजोबा रुग्णाईत असतांना त्यांना ४ पावलेही चालणे कठीण होते. अशा स्थितीत ते आम्ही ज्या इमारतीत रहात होतो, तेथील २ जिने चढून वरच्या आगाशीत (गच्चीत) गेले आणि तेथील कठड्यावर बसले असतांना तेथून खाली पडून त्यांचे अपघाती निधन झाले.
२. माझ्या वडिलांची आई भ्रमिष्ट होऊन घरातून निघून गेली आणि हरवली. ‘तिचे पुढे काय झाले ?’, ते कळले नाही.
३. आमच्या घरात सतत वाद आणि भांडणे चालू असायची. कुणाचेही कुणाशी पटत नव्हते.
वर्ष १९९९ मध्ये मी ‘सनातन संस्थे’च्या माध्यमातून साधना करू लागल्यावर ५ – ६ वर्षांनी श्राद्धविधींचे महत्त्व कळल्यावर पू. बाबांनी श्राद्ध करायला आरंभ केला. नंतर आम्ही आजीसाठी करायला सांगितलेले विधीही केले.
९. वडिलांवर आलेली जीवघेणी संकटे आणि देवाचे लाभलेले साहाय्य !
९ अ. संभाजीनगर येथे झालेल्या दंगलीच्या वेळी धर्मांधाने वडिलांना चाकू मारणे; पण भगवंताच्या कृपेने चाकू खिशाला लागून वडिलांना दुखापत न होणे : एकदा संभाजीनगर जिल्ह्यात दंगल झाली होती. तेव्हा बाबांच्या आस्थापनाने त्यांना गाडीने मुख्य मार्गावर सोडले. तेथून घरापर्यंत येतांना मध्येच धर्मांधांची वस्ती होती. बाबांना येतांना पाहून तेथील दोघांनी एकमेकांना खुणावले. त्यांच्यातील एक जण हातात चाकू घेऊन बाबांच्या दिशेने धावत आला आणि त्याने बाबांवर वार केला. नंतर ते दोघे पळून गेले; पण चाकू बाबांच्या खिशाला लागून खिसा फाटला आणि बाबांना काही न होता ते वाचले. नंतर बाबा झपझप चालत घरी आले. घरी आल्यानंतर बाबांना २ दिवस तो क्षण सतत डोळ्यांसमोर दिसत होता. त्यांना २ दिवस झोप लागली नाही. त्यांनी मृत्यू पुष्कळ जवळून पाहिला होता. या प्रसंगात ‘देवानेच मला वाचवले’, असे जाणवून त्यांना भगवंताविषयी कृतज्ञता वाटली.
९ आ. पित्ताशयात खडे झाल्याने असह्य वेदना होऊन शस्त्रकर्म करून खडे काढावे लागणे : एकदा बाबांना पोटदुखीचा प्रचंड त्रास होत होता. वेदना असह्य होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती केले. त्यांच्या पित्ताशयात पित्ताचे असंख्य खडे झाल्याचे निदान झाले. ते शस्त्रकर्म करून काढावे लागले. तेव्हा त्यांना ‘आपला काळच समोर उभा आहे’, असे वाटत होते; पण देवाने त्यांना जीवदान दिले. त्यानंतर ते माझ्या समवेत काही दिवस गोवा येथे रहायला आले.
(क्रमशः)
– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी, नागेशी, गोवा. (१.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |