Putin Jaishankar Meet : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाच्या भेटीचे निमंत्रण

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना यश मिळावे, यासाठी शुभेच्छाही दिल्या !

मॉस्को (रशिया) – जगभरात काही उलटसुलट गोष्टी चालल्या आहेत. अनेक गोष्टींमुळे परिस्थिती काहीशी बिकट आहे, याची मला कल्पना आहे. तरीही आशियातला खरा मित्र असलेल्या भारताशी आमचे संबंध चांगले आहेत आणि यापुढेही चांगले रहातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी रशिया दौर्‍याचे निमंत्रण देत आहे. जर ते रशियात आले, तर आम्हा सगळ्यांनाच आनंद होईल, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी पुतिन यांची मॉस्को येथे भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पुढे म्हटले की, भारतात पुढच्या वर्षी निवडणूक होणार आहे. आमचे मित्र नरेंद्र मोदी यांना मोठे यश मिळेल, अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. युक्रेनयुद्धाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला वारंवार सल्ले दिले. तसेच ‘तेथे काय परिस्थिती आहे ?’, ते त्यांनी दूरभाष करून जाणून घेतले. ‘शांततेच्या मार्गाने हा प्रश्‍न कसा सोडवायचा ?’, हा प्रयत्न नरेंद्र मोदी करत आहेत हे मला ठाऊक आहे, असेही पुतिन यांनी म्हटले.