देशातील सर्व अन्वेषण यंत्रणा जोडल्या जाणार !
नवी देहली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘भारतपोल’ या संकेतस्थळाचे उद्घाटन केले. पूर्वी सीबीआय ही एकमेव अन्वेषण यंत्रणा ‘इंटरपोल’(आंतरराष्ट्रीय पोलीस यंत्रणा) समवेत काम करण्यासाठी मान्यताप्राप्त होती; परंतु आता ‘भारतपोल’च्या माध्यमातून प्रत्येक भारतीय अन्वेषण यंत्रणा आणि सर्व राज्यांचे पोलीस इंटरपोलशी सहजपणे संपर्क साधू शकतील.
सीबीआयनेच ‘भारतपोल’ची निर्मिती केली आहे. इंटरपोलच्या धर्तीवर ‘भारतपोल’ सिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय अन्वेषण यंत्रणांना सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांसह इतर गुन्ह्यांमध्ये आंतरराष्ट्रीय पोलिसांकडून तातडीने साहाय्य मिळणार आहे. या पोलद्वारे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांची आणि गुन्ह्यांची माहिती इंटरपोलकडून घेऊ शकतील. इंटरपोलखेरीज इतर देशांच्या अन्वेषण यंत्रणांनाही जोडता येईल.
‘भारतपोल’ काय करणार ?
देशात गुन्हे करून परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना परत आणून त्यांना शिक्षा करणे, हे आजही सुरक्षायंत्रणांसमोर आव्हान आहे. यासाठी भारतीय यंत्रणा इंटरपोलसह इतर परदेशी सुरक्षा संस्थांचे साहाय्य घेतात. आता भारतपोलच्या माध्यमातून इंटरपोल आणि इतर देशांतून गुन्हेगारांचा डाटा तत्काळ उपलब्ध होणार आहे. सध्या सीबीआय इंटरपोलच्या अधिकार्यांशी पत्रे, ईमेल आणि फॅक्सद्वारे माहिती देत होती. आता ‘भारतपोल’च्या साहाय्याने सीबीआय केंद्र आणि राज्य स्तरावरील इंटरपोल अधिकार्यांशी थेट संपर्क साधू शकणार आहे. संकेतस्थळावरच माहिती दिली केली जाईल. ईमेल किंवा फॅक्स यांची आवश्यकता भासणार नाही. आता देशातील सर्व यंत्रणा सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, ऑनलाईन कट्टरतावाद, अमली पदार्थांची तस्करी, मानवी तस्करी यासारख्या गुन्ह्यांवर एकत्रितपणे गुन्हेगारांचा माग काढू शकतील.