US – CANADA Merger : ट्रुडो यांच्या त्यागपत्रानंतर लगेचच डॉनल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ठेवला कॅनडाला अमेरिकेत विलीन करण्याचा प्रस्ताव

अमेरिका आता अनुदान देऊ शकत नसल्यानेच ट्रुडो यांनी त्यागपत्र दिल्याचा ट्रम्प यांचा दावा

डॉनल्ड ट्रम्प आणि ट्रुडो

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिका यापुढे कॅनडासमवेत आणखी व्यापार तूट सहन करू शकत नाही आणि आणखी अनुदान देऊ शकत नाही. कॅनडाला त्याच्या अस्तित्वासाठी अनुदानाची नितांत आवश्यकता आहे. पंतप्रधान ट्रुडो यांना हे ठाऊक होते; म्हणून त्यांनी त्यागपत्र दिले. जर कॅनडा अमेरिकेमध्ये विलीन झाला, तर तेथे कोणतेही शुल्क लागणार नाही, तसेच कर मोठ्या प्रमाणात अल्प होतील. तसेच रशिया आणि चीन यांच्या धोक्यांपासून कॅनडा पूर्णपणे सुरक्षित होईल, असा प्रस्ताव अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष (प्रेसिडेंट-इलेक्ट) डॉनल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कॅनडासमोर ठेवला आहे. ट्रुडो यांनी त्यागपत्र दिल्यावर ट्रम्प यांनी लगेचच हा प्रस्ताव ठेवल्याने जागतिक स्तरावर चर्चा चालू झाली आहे.

ट्रुडो यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये फ्लोरिडा (अमेरिका) येथे ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्या वेळीही ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेतील ५१ वे राज्य बनवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. नंतर ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमांतून एकदा ट्रुडो यांना ‘कॅनडाचे राज्यपाल’ (अमेरिकेत राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो) म्हटले होते.