(म्हणे) ‘भारताने काश्मीरमधून कलम ३७० हटवणे संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाच्या विरोधात !’ – जनरल मुनीर, पाकचे सैन्यदलप्रमुख

  • पाकचे सैन्यदलप्रमुख जनरल मुनीर यांच्याकडून संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांकडे भारताच्या विरोधात तक्रार !

  • काश्मीर विवाद स्थानिक लोक आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे प्रस्ताव यांच्या आधारावरच सोडवणे आवश्यक !

डावीकडून जनरल मुनीर आणि एंटोनियो गुटेरेस

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख जनरल आसिम मुनीर हे अमेरिकी दौर्‍यावर असून त्यांनी नुकतीच संयुक्त राष्ट्रांचे महासचिव जनरल एंटोनियो गुटेरेस यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी काश्मीरचे सूत्र उपस्थित करून म्हटले की, दक्षिण आशियात शांती तेव्हाच स्थापित होईल, जेव्हा काश्मीर वादावर तेथील लोकांची मते आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव यांच्या आधारावर उपाय काढला जाईल.

सौजन्य आज टीव्ही ऑफीशियल 

जनरल मुनीर यांनी गुटेरेस यांच्याशी बोलतांना भारताने काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवल्यावरूनही विरोध दर्शवला. भारताचा हा निर्णय एकतर्फी आणि संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावांच्या विरोधात होता, असे ते म्हणाले. याआधी जनरल मुनीर यांनी अमेरिकी परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन आणि संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांचीही भेट घेतली. या वेळीही त्यांनी काश्मीरचे सूत्र उपस्थित केले होते.

जनरल मुनीर यांनी पॅलेस्टाईनवर होत असलेल्या आक्रमणावरही चिंता व्यक्त केली असून लवकरात लवकर युद्धबंदी घोषित करण्याची मागणीही केली.

संपादकीय भूमिका 

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ‘बाणेदार भारताने तेथील कलम ३७० हटवल्याने आणि आता तो पाकव्याप्त काश्मीरवरही नियंत्रण मिळवेल कि काय ?’, या धास्तीनेच पाकचे सैन्यदलप्रमुख अमेरिकेत विनवणी करत आहेत, हे लक्षात घ्या !