India In UN: आतंकवाद्यांना आश्रय देणार्‍या देशांवर कारवाई करा !

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांची मागणी  

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रतिनिधी रुचिरा कंबोज

जिनेवा – सीमेपलीकडील आतंकवाद आणि हिंसाचार यांमुळे भारताची पुष्कळ हानी झाली आहे, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी येथे सांगितले. त्यांनी पाकिस्तान आणि चीन यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. (संयुक्त राष्ट्रांच्या सभेत चीन आणि पाकिस्तान यांचे नाव घेण्यास काय अडचण आहे ?, हे भारतियांना कळायला हवे ! – संपादक)  सीमेपलीकडून अवैध शस्त्रांस्त्रांची तस्करी करून आतंकवादी संघटनांच्या माध्यमातून देशात आतंकवाद पसरवला जात आहे. आतंकवाद्यांना आश्रय देणार्‍या अशा देशांवर कारवाई करण्यात यावी, असे आवाहनही कंबोज यांनी केले.

आतंकवाद्यांना होतो शस्त्रास्त्रांचा पुरवठा

कंबोज पुढे म्हणाल्या की, आतंकवादी संघटनांकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांस्त्रांवरून त्यांना कुणीतरी साहाय्य करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते कोणत्याही देशाच्या साहाय्याविना एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रे गोळा करू शकत नाहीत. काही देश आतंकवाद्यांना सुरक्षित आश्रय देत आहेत. या लोकांनी केवळ गंभीर गुन्हेच केलेले नाहीत, तर सीमेपलीकडील आतंकवादी कारवायांचे समर्थन करण्यासाठी बनावट आणि राष्ट्रविरोधी चलन, शस्त्रे, अमली पदार्थ इत्यादींचा पुरवठा करणे आणि विरोधी देशांच्या अर्थव्यवस्थेची हानी करणे चालू ठेवले आहे. त्यामुळे या परिषदेने आतंकवादी घटक आणि त्यांचे समर्थक यांच्याविषयी शून्य सहनशीलता बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले.

संपादकीय भूमिका

संयुक्त राष्ट्रांमध्ये अशी मागणी करून काहीही परिणाम होणार नाही. भारताने स्वतः आक्रमण धोरण अवलंबून अशांवर कारवाई करणे आवश्यक !