संपादकीय : राष्ट्रीयत्वाला सुरुंग !

१३ डिसेंबर २००१ आणि १३ डिसेंबर २०२३
भारतासाठी ठरलेले काळे दिवस !

१३ डिसेंबर २००१ हा दिवस भारतासाठी काळा दिवस ठरला, त्याचप्रमाणे १३ डिसेंबर २०२३ या दिवसानेही भारताच्या जगत्कीर्तीला गालबोट लावले. नव्या संसद भवनात लोकसभेच्या ‘प्रेक्षक गॅलरी’त घुसून थेट सभागृहात उडी मारून काहींनी संसदेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला, तसेच पिवळ्या रंगाचा धूरही सोडला. १३ डिसेंबरला जरी ही घटना घडली असली, तरी प्रतिदिन या षड्यंत्रामागील एकेक घटना समोर येत आहेत. त्यातून ‘संसदेवरील हे आक्रमण किती विखारी आणि देशविघातक होते’, याची कल्पना येते. या आक्रमणामुळे भारताची अपकीर्ती तर झालीच आहे; पण त्याच्या जोडीला देशद्रोह्यांकडून भारताला, पर्यायाने हिंदूंना नष्ट करण्याचाच आटोकाट प्रयत्न केला जात असल्याचे प्रकर्षाने लक्षात येते. त्यामुळे ‘ही भारत आणि हिंदू यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे’, असेच म्हणावे लागेल.

शत्रूला वेळीच ओळखा !

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून ही ‘तुकडे तुकडे’ टोळी अस्तित्वात आली

वर्ष २०१६ मध्ये देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या माध्यमातून आतंकवादाचा प्रसार करण्यात आला. येथेच हिंदुद्वेषाचे बीज रोवण्यात आले अन् देशद्रोही विचारसरणीला खतपाणी घालण्यात आले. यातूनच देशविघातक विचारांना बळ मिळाल्याने सरकारच्या विरोधात समांतर यंत्रणा उभी झाली. याच विद्यापिठातून ‘तुकडे तुकडे’ टोळी अस्तित्वात आली. एकूणच या सर्व परिस्थितीमुळे ‘हे विद्यापीठ म्हणजे साम्यवाद्यांना देशद्रोह घडवण्यासाठी जणू आयते कोलीतच मिळाले’, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. या विद्यापिठाचे मूळ काँग्रेसींचे आहे; कारण माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीच हे विद्यापीठ साम्यवादांना आंदण म्हणून दिले होते. यावरूनच काँग्रेसी आणि साम्यवादी यांचे एकमेकांशी असलेले लागेबांधे दिसून आले. देशावरील हा आघात संपल्यावर वर्ष २०२१ मध्ये सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात देहली शहराच्या सीमेबाहेर अनेक मास मोठ्या प्रमाणात कृषी आंदोलन करून सरकार आणि पोलीस यांना वेठीस धरण्यात आले होते.

अनेक मास चाललेले मोठ्या प्रमाणातील कृषी आंदोलन

त्या वेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. त्यामुळे आंदोलनाने वेगळेच रूप धारण केले. या आंदोलनाला विदेशातील खलिस्तानवाद्यांकडून पैसा पुरवला जात असल्याचेही उघडकीस आले होते. समाजवादी, तथाकथित बुद्धीवादी यांच्याकडूनही या आंदोलनाचे समर्थने केले जात होते. अशा प्रकारे राजकीय स्वार्थ पहाणारी ही मंडळी ‘सरकारविरोधी’ म्हणून ओळखली गेली.

खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू

यानंतर काही कालावधीने घडले, ते नव्या संसदेतील आक्रमण ! यातील ५ आरोपींना १० लाख रुपयांचे कायदेशीर साहाय्य करण्याची घोषणा ‘सिख फॉर जस्टिस’ या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याने आता केली आहे. याच पन्नूने ५ डिसेंबर या दिवशी ‘१३ डिसेंबरला भारताच्या संसदेवरील आक्रमणाच्या स्मृतीदिनी पुन्हा आक्रमण करण्यात येईल’, अशी धमकी दिली होती. एखाद्या आतंकवाद्याने उघडपणे धमकी दिलेली असतांनाही सुरक्षायंत्रणांनी संसदेच्या रक्षणासाठी सतर्कता का बाळगली नाही ? याकडे दुर्लक्षून चालणार नाही; कारण या घटनेमुळे देशाच्या सुरक्षेचे धिंडवडे निघाले आहेत. देशाची अपकीर्ती झाल्याने सुरक्षा यंत्रणांनी याचे उत्तर देशवासियांना द्यायलाच हवे. हा गुरपतवंत सिंह पन्नू आहे अमेरिकेचा नागरिक ! तो तेथूनच भारतातील सूत्रे हालवू पहातो. भारतात खलिस्तानी राज्य निर्माण करू पहातो. संसदेवर आक्रमण करण्यासारखे कृत्य करणार्‍यांना पन्नूने लाखो रुपयांचे अर्थसाहाय्य करणे, ही काही साधीसुधी घटना नक्कीच नाही. यातून ‘खलिस्तानवाद कोणकोणत्या माध्यमांतून डोके वर काढू पहात आहे’, हे लक्षात येते. भारतात लुडबूड करून स्वत:चा डाव साध्य करू पहाणार्‍यांवर कारवाई होण्यासाठी भारतानेही अमेरिकेचा पाठपुरावा घ्यावा आणि पन्नू भारतात करत असलेला हस्तक्षेप थांबवण्यासाठी कणखर राष्ट्रनीती अवलंबावी ! हे सर्व न्यून म्हणून कि काय, अधिवक्ता असीम सरोदे यांनीही या सर्वांत उडी घेतली. सरोदे महाशयही हिंदुद्वेष्ट्यांच्या टोळीतील म्हणून नावाजलेले ! त्यामुळे त्यांची भूमिका अर्थातच आक्रमणाच्या समर्थनार्थ असणार, हे निश्चित ! प्रत्यक्षातही असेच झाले, आक्रमणकर्ता अमोल शिंदे याला न्यायालयीन साहाय्य करणार असल्याचे विधान सरोदे यांनी केले.

आरोपी अमोल शिंदे आणि अधिवक्ता असीम सरोदे

हिंदूसंघटन हेच उत्तर !

ही सर्व पार्श्वभूमी पहाता इतक्या वर्षांपासून सर्व देशद्रोही शक्ती एकमेकांच्या संपर्कात असल्याचेच यातून सिद्ध होते. या देशद्रोही शक्ती म्हणजे कोण ? तर साम्यवादी, तथाकथित बुद्धीवादी, खलिस्तानवादी, आतंकवादी आणि नक्षलवादी ! या सर्वांच्या विळख्यात हिंदूबहुल भारत देश पुरता अडकला आहे. एकमेकांच्या हातात हात घालून चालणार्‍या या सर्वांची एकी तोडणे महाकठीण काम आहे; कारण या सर्वांचे भक्कम पाठीराखे भारतातूनच नव्हे, तर विदेशातूनही भारताला नष्ट करण्यासाठी आकाशपाताळ एक करत आहेत. विदेशातून चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश ही राष्ट्रेही भारताला नष्ट करण्यासाठी टपून बसलेली आहेत. आता हिंदूंनी गाफील राहून चालणारच नाही. हिंदूंच्या, तसेच राष्ट्राच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. हिंदु आणि राष्ट्र द्वेष यांची बीजे खोलवर रुजलेली आहेत अन् त्यांची मुळे वेगाने फोफावत आहेत. या सगळ्यांच्या मुळाशी अर्थातच काँग्रेस आहे, हे विसरून चालणार नाही. देशविघातक शक्तींना खतपाणी घालणार्‍या काँग्रेसला देशातून हद्दपार करण्यावाचून आता पर्याय उरलेला नाही.

देशविघातक शक्तींमधील प्रत्येक जण ‘आम्ही एकत्र नाही, वेगवेगळे आहोत’, असे दाखवण्याचा प्रयत्न करतो; पण तसे नसून प्रत्येकच जण स्वतःची भूमिका आणि विचारसरणी रेटण्यासह अन्यांच्या विचारसरणीचेही उघडपणे समर्थन करत आहे, हे देशासाठी अधिक घातक आहे. या सर्व घटना पहाता हिंदूसंघटनातूनच राष्ट्ररक्षणाचे महत्कार्य घडून देशाची अखंडता टिकून राहू शकते, हे हिंदूंनी लक्षात घेऊन कृतीशीलतेचा मार्ग अवलंबावा !

हिंदूंनो, हिंदूसंघटनातूनच राष्ट्ररक्षणाचे महत्कार्य घडून देशाची अखंडता टिकेल, हे लक्षात घ्या !