संपादकीय : ‘ट्रुडो युगा’चा अस्त !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पदाचे त्यागपत्र दिले आहे. लोकशाही स्वीकारल्यानंतर गेल्या साधारण १६० वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेल्या नेत्यांमध्ये एक असे ट्रुडो यांचे नाव घेता येईल. वर्ष २०१५ मध्ये पंतप्रधानपदी आरूढ झाले, तेव्हा ट्रुडो यांना ‘द गोल्डन बॉय’ म्हणून गौरवण्यात येत असे; परंतु त्यांच्या काही निर्णयांमुळे कॅनडियन नागरिकांमधील त्यांची लोकप्रियता ६५ टक्क्यांपासून (सप्टेंबर २०१६) २२ टक्के येथपर्यंत (आज) न्यून झाली आहे.

भारत-कॅनडा या उभय देशांतील संबंधांत तणाव निर्माण होण्यामागे ट्रुडो यांच्या अपरिपक्व धोरणांना उत्तरदायी धरले जाते. ट्रुडो यांच्यावर ‘कॅनडाचे राहुल गांधी’ म्हणून सामाजिक माध्यमांतील एक मोठा वर्ग टीका करतो. गेल्या दशकभराच्या कार्यकाळातील काही प्रसंग त्यांच्यावर केल्या जाणार्‍या या टीकेचे मर्म विशद करतात. डिसेंबर २०१७ मध्ये ट्रुडो यांनी देशाच्या सर्वाेच्च घटनात्मक पदावर असतांना कॅनडाच्या नैतिक आयुक्तांनी (‘इथिक्स कमिश्नर’ यांनी) ‘ट्रुडो यांनी कोणतीही कल्पना न देता ‘आगाखान फाऊंडेशन’ या संस्थेकडून भेटवस्तू आणि विमानप्रवास या सुविधा घेतल्या’, असा ठपका ठेवला. वर्ष २०१८ मधील त्यांची अधिकृत भारत भेटही वादाचा विषय ठरली. त्या वेळी त्यांनी पंजाब सरकारमधील एका मंत्र्याला ठार मारण्याचा कट केल्याचा दोषी ठरलेला खलिस्तानी जस्पाल अटवाल याची भेट घेतली होती, तसेच मुत्सद्देगिरीला बगल देऊन भारताची सांस्कृतिक वेशभूषा धारण करून छायाचित्रे काढल्याचा आरोपही ट्रुडो यांच्यावर झाला. कॅनडात वर्ष १८६७ ते १९९६ या कालावधीत सरकारकडून चालवण्यात आलेल्या निवासी शाळांमध्ये मूलनिवासी मुलांवर अनन्वित अत्याचार झाले. ख्रिस्ती धर्मात धर्मांतरापासून सहस्रावधी मुलांना ठार मारण्यापर्यंत सरकारी शाळांनी मजल मारली. या घटनांचा निषेध करण्यासाठी सरकारी स्तरावर वर्ष २०२१ मध्ये प्रथमच साजर्‍या झालेल्या ‘राष्ट्रीय सत्य आणि सलोखा दिवसा’च्या दिवशी ट्रुडो सुटी साजरी करत होते. कोरोना महामारीच्या काळात सहस्रावधी ट्रकचालकांनी आयोजित केलेल्या आंदोलनांना आणीबाणी घोषित करून चिरडण्याचा निर्णयही ट्रुडो यांनीच घेतला होता. एवढेच नव्हे, तर कॅनडाची अर्थव्यवस्था अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून जात असतांना त्याला नीट न हाताळण्यामागे ट्रुडो यांच्या चुकीच्या धोरणांनाच उत्तरदायी धरण्यात आले. भूराजकीय महत्त्व वाढत चाललेल्या आणि एक उदयोन्मुख विकसित अर्थव्यवस्था असलेल्या भारतावर ‘भारताने कॅनडाचा नागरिक हरदीपसिंह निज्जर याची हत्या केली’, अशा प्रकारे निराधार आरोपही स्वत: ट्रुडो यांनी केला. यामुळे त्यांची जागतिक स्तरावर नाचक्की झाली. एकूणच सामाजिक, राजकीय, आर्थिक, परराष्ट्र धोरण आदी प्रत्येक क्षेत्रात ट्रुडो हे अनुत्तीर्ण झाले आहेत. ‘कॅनडाचे युवराज’ अशा प्रकारे त्यांना मिळालेल्या ‘बहुमाना’मागील ही कारणमीमांसा ! आता कॅनडाचा पुढील पंतप्रधान कोण असेल ?, हे सध्याचा सत्ताधारी ‘लिबरल पक्ष’ ठरवीलच; परंतु काँग्रेसचे राहुल गांधी हे भारताचे पंतप्रधान झाल्यास भारताचे भविष्य कसे असेल, ते सध्याचे कॅनडाचे वर्तमान विशद करते, हे निश्चित !

अकार्यक्षम व्यक्ती देशाच्या सर्वाेच्चपदी विराजमान झाल्यास काय होते, हे कळण्यासाठी ट्रुडो यांचा सत्ताकाळ उत्कृष्ट उदाहरण !