Gaza Ceasefire : संयुक्त राष्ट्रांमध्ये गाझामध्ये युद्धबंदीचा ठराव संमत : भारताचे समर्थन

न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने गाझामध्ये युद्धबंदीचा ठराव संमत केला. भारताने ठरावाच्या बाजूने मतदान केले आहे. १९३ सदस्य देशांपैकी १५३  देशांनी युद्धबंदीच्या बाजूने मतदान केले. अमेरिका आणि इस्रायल यांच्यासह १० देशांनी युद्धबंदीच्या विरोधात मतदान केले. २३ देशांनी मतदानात भाग घेतला नाही.

इस्रायलने भूमिका पालटली नाही, तर परिणाम चांगला होणार नाही ! – अमेरिका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

गाझामध्ये सततच्या आक्रमणांमुळे इस्रायलला मिळणारे जागतिक समर्थन अल्प होऊ लागले आहे. इस्रायलने आता भूमिका पालटली पाहिजे. असे केले नाही, तर भविष्यात त्याचा परिणाम चांगला होणार नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे.

ज्या लोकांनी क्रूरता दाखवली आहे, त्यांना संपवले जाईल ! – इस्रायल

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून म्हटले आहे की, आपण युद्ध कसे संपवू शकतो ? नागरिक आणि सैनिक यांनी अपार बलीदान दिले आहे. ज्या लोकांनी क्रूरता दाखवली आहे, त्यांना संपवले जाईल. १९९० च्या दशकात आम्ही ओस्लो करार (इस्रायल आणि पॅलेस्टाईन येथे शांतता नांदण्यासाठी केलेला करार) करून चूक केली. आता आम्ही त्याची पुनरावृत्ती करू इच्छित नाही. काही सूत्रांवर अमेरिकेशी करार करू शकत नाही. असे असूनही तिने केलेल्या साहाय्यासाठी आम्ही तिचे आभारी आहोत. आम्ही पुष्कळ विचार करून भूमीवरून कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता आणि आता हमासला नष्ट झाल्यावरच कारवाई संपेल. ओलिसांच्या सुटकेसाठी काही गोष्टी चालू आहेत. त्याविषयी योग्य वेळी सांगितले जाईल.