|
ओझर (जिल्हा पुणे), २ डिसेंबर (वार्ता.) – धर्म आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी संघर्ष करा. छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहेत. त्यांनी आपल्याला धर्मासाठी झुंजण्याची वृत्ती दिली. ८ लाखांचे सैन्य घेऊन महाराष्ट्रात शिरलेल्या औरंगजेबाला मराठ्यांनी मातीत मिळवले. ‘धर्माच्या करता आम्हांस जगती रामाने धाडीयले…’ यानुसार धर्माच्या रक्षणासाठीच आपला जन्म झाला आहे. मंत्र, देवता आणि सदगुरु यांची कृपा संपादन करून धर्माच्या रक्षणासाठी सिद्ध व्हा. शरीरात प्राण असेपर्यंत मठ-मंदिरे आणि सनातन धर्म रक्षणाचा प्रण घ्या, असे आवाहन नाशिक येथील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिराचे महंत श्री. सुधीरदासजी महाराज यांनी महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत केले. अष्टविनायकापैकी एक असलेले ओझर येथील ‘श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थान’च्या श्री विघ्नहर सांस्कृतिक भवन येथे २ डिसेंबरपासून आयोजित करण्यात आलेल्या २ दिवसीय राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्याय परिषदे’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंदिरांचेे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थान, लेण्याद्री गणपति मंदिर देवस्थान, श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत मंदिरांचे ५५० प्रतिनिधी, विश्वस्त आणि पुरोहित सहभागी झाले आहेत. यासह मंदिरांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी लढा देणारे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्तेही या वेळी उपस्थित होते.
महंत श्री. सुधीरदासजी महाराज पुढे म्हणाले, ‘‘वर्ष १७६० मध्ये अब्दाली या इस्लामी आक्रमकांनी भारतावर आक्रमण केले, तेव्हा नागा साधूंनी निकराचा लढा दिला. १० सहस्र नागा साधू या लढाईत मारले गेले. तेव्हापासून ‘नंगेसे खुदाभी डरता है’, ही म्हण रूढ झाली. धर्मासाठी लढण्याचा हा आपला इतिहास आहे. आपल्या संस्कृतीमध्ये धर्म आणि राज सत्ता पहायला मिळत. ब्रृहस्पती आणि इंद्र, श्रीराम अन् वशिष्ठ, श्रीकृष्ण आणि सांदिपनी, पांडव अन् धौम्य ऋषि, बळी आणि इंद्र, ही धर्म अन् राजसत्ता यांची उदाहरणे आहेत. या दोघांमुळे धर्मरक्षणाचे कार्य होते. सध्या मात्र राजसत्ता निरंकुश झाली आहे. महाराष्ट्रात मंदिरांचे सरकारीकरण करण्यात आले आहे. मंदिरांतील समस्यांविषयी राजकारण्यांना अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत. राजसत्ता ऐकत नसेल, तर आपल्याकडे निवडणुकीचा दंडुका आहे. देवळातील देवपण टिकण्यासाठी पुजार्यांचे दायित्व मोठे आहे. मंदिरातील पूजाविधी शास्त्रानुसार व्हायला हवा. धर्माचे स्थान देवतेपेक्षाही मोठे आहे. त्यामुळे मंदिरातील विधी धर्मशास्त्रानुसार व्हायला हवा.’’
दीपप्रज्वलन आणि वेदमंत्रपठण यांनी परिषदेला प्रारंभ !
संत आणि मंदिरांचे पुरोहित यांच्या उपस्थितीत श्री गणेशाचा जयघोष, शंखनाद आणि दीपप्रज्वलन करून मंगलमय वातावरणात या परिषदेला प्रारंभ झाला.
श्री लेण्याद्री गणपति देवस्थान ट्रस्टचे श्री. शंकर ताम्हाणे, श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थानचे कार्यकारी अध्यक्ष श्री. मधुकर अण्णा गवांदे, तुळजापूर येथील सिद्ध गरीबनाथ मठाचे योगी मावजीनाथ महाराज, महंत सुधीरदासजी महाराज, अमरावती येथील श्री महाकाली शक्तीपिठाचे पिठाधीश्वर श्री शक्तीजी महाराज, सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. पुरोहित श्री. विपुल मांडकेगुरुजी यांनी वेदमंत्रपठण केले. यानंतर व्यासपिठावरील मान्यवरांचा सत्कार आणि परिषदेला उपस्थित संतांचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्रही हलालमुक्त होईल !हलाल प्रमाणपत्रावर बंदी येण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी अभ्यासपूर्ण विषय देशभरात सर्वत्र मांडला. उत्तरप्रदेश शासनाने याची नोंद घेऊन तेथे संपूर्ण राज्यात हलाल प्रमाणपत्रावर बंदी घातली. महाराष्ट्रातही हलाल प्रमाणपत्राचा विषय सर्वांपर्यंत पोचवण्याचा अथक प्रयत्न केला आहे. येत्या काळात महाराष्ट्रही हलालमुक्त होईल, असा विश्वास महंत सुधीरदास यांनी या वेळी व्यक्त केला. |
राज्यस्तरीय मंदिर परिषदेच्या निमित्त सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संदेश !देवभक्तांनो, सरकारच्या नियंत्रणातून मंदिरांना मुक्त करणे, हे धर्मसंस्थापनेचे कार्य आहे, हे लक्षात घ्या !‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेला उपस्थित सर्व मंदिर प्रतिनिधींना माझा नमस्कार ! मंदिरात साक्षात् भगवंताचा वास असल्याने त्याला ‘देवस्थान’ म्हणतात. देवळातील नित्य पूजा, अभिषेक इत्यादी धार्मिक विधींच्या वेळी, तसेच आरतीच्या वेळी साक्षात् देवतेचे चैतन्य प्रक्षेपित होत असते. त्यामुळे मंदिरे ही हिंदूंसाठी सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारे चैतन्यस्रोत आहेत. अनेकांना मंदिरांत गेल्यानंतर मनःशांतीचा अनुभव होतो. यासाठी मंदिरांचे पावित्र्य जपले जाणे आवश्यक आहे. आजकाल ‘व्यवस्थापन’ आणि ‘धनाचा विनियोग’ आदी कारणे सांगून सरकार मंदिराचे अधिग्रहण करत आहे. सर्वच महत्त्वाच्या मंदिरांवर शासकीय प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आदींना ‘विश्वस्त’ म्हणून नेमण्यात आले आहे. खरे तर मशिदी किंवा चर्च यांवर सरकारी प्रशासक नेमल्याचे किंवा त्यांचे अधिग्रहण झाल्याच्या वार्ता कधीच ऐकू येत नाही. मंदिरांमध्ये सरकारी प्रतिनिधी आले की, प्रथा-परंपरा यांवर प्रतिबंध येतात. देवनिधीमध्ये भ्रष्टाचार होतो. अन्य पंथीय कर्मचारी ठेवले जातात. हे दुष्टचक्र थांबवायचे असेल, तर देवभक्त हिंदूंनी मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. देवभक्तांनो, सरकारच्या नियंत्रणातून धर्ममय मंदिरांना मुक्त करणे, हे धर्मसंस्थापनेचे कार्य आहे, हे लक्षात घ्या ! |