दैवी सत्संगात सांगितलेला भावजागृतीचा प्रयोग आणि साधकांनी केलेले आत्मनिवेदन !

‘९.१२.२०२२ या दिवशी दैवी सत्संगात ‘आपण जगदंबा स्वरूपिणी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चरणांत असलेल्या पैंजणांतील घुंगरू आहोत’, असा भावजागृतीचा प्रयोग सांगितला. त्या वेळी ‘सर्व जण निर्गुणातून देवीच्या चरणी समर्पित झाले आहेत’, असे मला जाणवत होते. त्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १८ वर्षे) हिने सांगितलेला भावजागृतीचा प्रयोग  

अ. ‘आपण भूवैकुंठात आहोत. आपण यज्ञस्थळी आलो आहोत. यज्ञपरिसरात येताच आपल्याला पुष्कळ प्रकाश दिसत आहे. आपल्या कानी दिव्य अशा वेदमंत्रोच्चारांचा ध्वनी पडत आहे.

आ. आपल्याला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या विलोभनीय, निखळ सौंदर्याचे आणि साक्षात् देवीतत्त्वाचे दर्शन होत आहे. आपण घेत असलेला प्रत्येक श्वास म्हणजे त्यांची आपल्यावर असलेली कृपा आहे.

इ. आपले लक्ष श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणांत असलेल्या पैंजणांतील घुंगरांकडे जात आहे. आपल्या मनात विचार येत आहे, ‘मलाही या घुंगरांप्रमाणे त्यांच्या श्रीचरणीच रहायचे आहे.’ ते घुंगरू त्यांच्या श्रीचरणांचा आश्रय घेत आहेत. ते घुंगरू इकडे-तिकडे न पहाता मातेच्या चरणांची भक्ती करत आहेत. ते घुंगरू मान वर करूनही पहात नाही.

ई. पैंजणांतील घुंगरांवरून आपल्याला भावार्थ उलगडत आहे, ‘नारायणस्वरूप गुरूंनी आपल्याला साधनेच्या पथावर आणले आहे. आपण सदैव आपल्या तिन्ही गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या) चरणांचा आश्रय घ्यायला हवा. आपण इकडे-तिकडे न पहाता, म्हणजे ‘या पथावर मार्गक्रमण करतांना आलेल्या अडचणी किंवा होत असलेला संघर्ष’ यांकडे लक्ष न देता ‘त्यात देवाने मला काय शिकवले ?’, याकडे लक्ष द्यायचे आहे. आपण मान वर करून न पहाता, म्हणजे स्वतःचा अहंकार जागृत होऊ न देता शरणागतभावात रहायचे आहे.

उ. आपल्या मनाची अवस्था जणू त्या पैंजणांतील घुंगरांप्रमाणे अंतर्मुख आणि भावविभोर झाली आहे. यज्ञ समाप्तीनंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ पैंजणांकडे पाहून ‘ही नक्षी किती सुरेख आहे !’, असे एकमेकींना सांगत आहेत. त्या त्याचा भावार्थ आपल्याला सांगत आहेत, ‘साधकांनो, साधनेच्या या पथावर तुम्ही योग्य दिशेने जात आहात. गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवून त्यांना अपेक्षित अशी साधना करा. ‘ही सुंदर नक्षी, म्हणजे तुमची साधना योग्य प्रकारे चालू आहे’, याचे प्रतीक आहे.’

कु. अपाला औंधकर

ऊ. त्यांचे बोलणे ऐकून आपली पुष्कळ भावजागृती झाली आहे. आपल्यात भाव निर्माण करणाराही तोच अंतर्यामी भगवंत आहे. ‘त्याच्या चरणी अर्पण तरी काय करणार ?’, असे आपल्याला वाटत आहे.

आपण परात्पर गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करूया.’

२. सत्संगात साधकांनी अनुभवलेली आंतरिक भावस्थिती भावजागृतीचा प्रयोग केल्यानंतर साधकांनी सत्संगात आत्मनिवेदन केले. 

२ अ. कु. सोहम् पोत्रेकर (आध्यात्मिक पातळी ५५ टक्के, वय १३ वर्षे) : ‘मला श्री भवानीदेवीचे दर्शन झाले. तिच्या मूर्तीतून पुष्कळ प्रमाणात प्रकाश बाहेर पडत होता. ‘वातावरणात पुष्कळ चांगला पालट झाला’, असे मला सूक्ष्मातून जाणवले.

२ आ. कु. वेदिका भागवत (आध्यात्मिक पातळी ५७ टक्के, वय १८ वर्षे) 

२ आ १. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासारखे बनण्यासाठी त्यांच्याप्रमाणे गुरुसेवेचा ध्यास असणे आवश्यक ! : खरेतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामध्ये एवढे सामर्थ्य आहे की, ‘त्यांनी संकल्प केला, तरीही हिंदु राष्ट्र येईल !’ त्यांच्यामुळे क्षणातही सर्वकाही पालटू शकते. माझ्या मनात ‘मला त्यांचे दर्शन घ्यायचे आहे’, असा विचार येत होता. तेव्हा त्यांनीच मला सूक्ष्मातून जाणीव करून दिली, ‘केवळ दर्शन घ्यायचे नाही, तर आमच्यासारखे बनण्यासाठी आमच्याप्रमाणे गुरुसेवेचा ध्यास मनी असायला हवा !’

२ इ. कु. अद्वैत पोत्रेकर (आध्यात्मिक पातळी ५९ टक्के, वय ११ वर्षे) : भावजागृतीच्या प्रयोगात अपालाताईने ‘जगदंबा’ असे म्हणता क्षणी माझ्या डोळ्यांसमोर ध्यानमंदिरातील श्री दुर्गादेवीची मूर्ती आली. मला तिचे दर्शन झाले. बाहेरचा कोणताच आवाज माझ्या कानापर्यंत पोचत नव्हता. मला केवळ अपालाताईचे बोलणे ऐकू येत होते.

२ ई. कु. सायली देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १६ वर्षे) 

२ ई १. ‘धूलीकण’ बनणे, नंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या पैंजणांतील घुंगरू बनणे आणि ‘देवाने साधिकेतील अहं न्यून करून श्रीसत्‌शक्ति  (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याशी एकरूप करून घेतले’, असे जाणवणे : भावजागृतीचा प्रयोग चालू झाल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘मला यज्ञस्थळाच्या परिसरात ‘मी’ म्हणून बसण्याऐवजी एक ‘धूलीकण’ बनून बसायचे आहे.’ भावजागृतीच्या प्रयोगात ‘आपल्याला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या चरणांतील पैंजणांतील घुंगरू बनायचे आहे’, असे सांगितले. तेव्हा तो धूलीकण उडून श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या पैंजणावर जाऊन बसला. ‘माझे प्रयत्न तिन्ही गुरूंना अपेक्षित असे झाल्यावरच मी त्यांच्या चरणांशी एकरूप होऊ शकते. देवाने मला ‘धूलीकण’ बनवून माझ्यातील अहं न्यून केला आणि धूलीकणातून माझे श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या पैंजणांतील घुंगरू बनले. देवाने माझ्यातील अहं नष्ट करून मला त्यांच्याशी एकरूप करून घेतले’, असे मला जाणवले. भावजागृतीचा प्रयोग चालू असतांना मला परात्पर गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या प्रती उत्कट भाव जाणवत होता.

२ उ. कु. वेदश्री भुकन (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ११ वर्षे) : माझ्या डोळ्यांसमोर प.पू. गुरुदेवांचे रूप अखंड येत होते. भावजागृतीचा प्रयोग चालू असतांना मला बाहेरील गाड्यांचा आवाज ऐकू येत नव्हता. माझे लक्ष भावजागृतीच्या प्रयोगाकडेच केंद्रित होत होते.

३. साधकांनी केलेले आत्मनिवेदन ऐकून कु. अपाला औंधकर आणि कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १३ वर्षे) यांनी अनुभवलेली स्थिती 

साधकांनी केलेले आत्मनिवेदन ऐकून आम्हाला ‘काय बोलावे ?’, ते सुचलेच नाही. आम्ही निर्गुण भावस्थिती अनुभवत होतो. आम्हाला सर्व दैवी बालकांचे परात्पर गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याशी असलेले घट्ट नाते सूक्ष्मातून अनुभवता येत होते. आम्हाला साधकांकडून पुष्कळ शिकायला मिळाले.

४. भावजागृतीच्या प्रयोगाला अनुसरून ‘साधकांनी कसे प्रयत्न करायला हवेत ?’, याविषयी कु. प्रार्थना पाठक हिने सांगितलेली सूत्रे  

अ. सर्व साधकांनी आज दिवसभरात प्रयत्न करण्यासाठी ध्येयरूपी भावभेट घेऊया. ‘आपण जगदंबास्वरूपिणी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणांतील पैंजणांमधील घुंगरू आहोत’, असा भाव अधिकाधिक वेळ ठेवूया.

आ. ‘आपण त्यांच्या पैंजणांतील घुंगरू आहोत’, असा भाव ठेवल्याने आपण आनंदी आणि शरणागतभावात राहू शकतो.

इ. काही पैंजणांतील घुंगरू काही कालावधीनंतर काळे पडतात; परंतु आपल्याला तसे व्हायचे नाही. साक्षात् जगदंबेच्या चरणांतील पैंजणांतील घुंगरू चमकायला हवेत. साधनेतील प्रयत्न सातत्याने करून आपण स्वतःला उजळवूया. आपण (घुंगरू) काळे पडलो, तर आपल्याला आपल्यामधील भाव वृद्धींगत करायचा आहे. आपण दैवी पैंजणांतील दैवी घुंगरू बनण्याचा प्रयत्न करूया.

ई. देवीमातेच्या चरणांतील पैंजणांतील घुंगरू बनून आपल्याला अखंड तिच्या चरणांचा आश्रय घ्यायचा आहे.

५. प्रार्थना आणि कृतज्ञता 

‘हे गुरुराया, आमच्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत. जे काही आहे, ते आपण दिलेले आहे. ‘सनातनच्या तिन्ही गुरूंच्या चरणी आम्हाला पुष्पाप्रमाणेच रहाता येऊ दे’, अशी मी आर्तभावाने प्रार्थना करते.’

– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १८ वर्षे), फोंडा, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक