चिखली, चिकोळणा आणि बोगमाळो भागांतील पाणीही प्रदूषित : लोकांमध्ये भीती
पणजी : दाबोळी आणि परिसरातील अनेक विहिरी पेट्रोलियम घटकांनी दूषित झाल्याने विहिरींतील पाण्याचा रंग पालटला आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. पेट्रोलियम किंवा नाफ्था वाहून नेणार्या वाहिन्यांपैकी एका वाहिनीची गळती होत असल्याची भीती दाबोळीतील लोकांनी व्यक्त केली आहे. या गळतीमुळे ज्वलनशील द्रवपदार्थ भूमीत झिरपत असून ते भूजल दूषित करत आहेत. दाबोळीसह चिखली, चिकोळणा आणि बोगमाळो भागांतील विहिरींचे पाणीही अशाच प्रकारे प्रदूषित झाले आहे.
माटवेच्या पंच निलिमा नाईक यांनी विहिरीतून आणलेले पाणी दिव्याच्या ज्योतीच्या संपर्कात आल्यावर आग कशी लागली ? ते उदाहरणादाखल सांगितले. त्या म्हणाल्या की, परिसरातील ६ विहिरी, तसेच आसपासचे नाले दूषित असल्याचे दिसून आले. या क्षेत्रात पेट्रोलियम पदार्थ वाहून देणार्या वाहिन्या (पाईप) आहेत. ‘या पाईप्समधून होणारा तेलपुरवठा त्वरित थांबवावा’, अशी विनंती तेल आस्थापनांना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नाईक यांनी परिसरातील लोकांना विहिरी आणि बोअरवेल यांचे पाणी वापरणे बंद करण्याचे आवाहन केले आहे. विहिरीतील पाणी दूषित होणे अत्यंत गंभीर असल्याने स्थानिक जैवविविधता मंडळ, आरोग्य विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, तसेच इतर प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विहिरीच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.