बँकॉक (थायलंड) येथे ३ दिवसांच्या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’चे उद्घाटन !
बँकॉक (थायलंड) – आम्ही ‘धन विजय’ आणि ‘असुर विजय’ अनुभवला आहे. पैसा जिंकणे म्हणजे वस्तूंमधून मिळणारा आनंद; पण यात हेतू योग्य नाही. हे आत्मकेंद्रित असल्यासारखे आहे. भारताने ब्रिटिशांचा २५० वर्षांचा संपत्तीचा विजय पाहिला. ‘असुर विजय’ म्हणजे इतर धर्मांप्रती आक्रमकतेची भावना असणे. मुसलमानांनी ५२० वर्षे राज्य केले. यामुळे आमच्या भूमीवर नासधूस झाली. आम्ही म्हणजे हिंदू ‘धर्म विजया’वर विश्वास ठेवतो. यावर आमचा धर्म अवलंबून आहे. ही प्रक्रिया धर्माच्या नियमांवर आधारित आहे आणि परिणामी धर्म आपल्यासाठी कर्तव्य बनतो, असे मार्गदर्शन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. ते येथे २४ नोव्हेंबरपासून चालू झालेल्या तिसर्या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’च्या उद्घाटन सत्रात बोलत होते.
प्रत्येक ४ वर्षांनी ‘वर्ल्ड हिंदु फाऊंडेशनच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात येते. ही परिषद २६ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. यात जगभरातून संत, हिंदु विचारवंत, संघटनांचे प्रमुख, पदाधिकारी सहभागी झाले आहेत. सरसंघचालक पुढे म्हणाले की, आमच्या धर्मानुसार जग एक कुटुंब आहे. आपण सर्वांना ‘आर्य’, म्हणजेच ‘एक संस्कृती’ बनवू. शिस्तीचे पालन करण्यासाठी भारतातील सर्व संप्रदायांना शुद्ध करणे आवश्यक आहे. हिंदूंच्या परंपरांमध्ये काही मतभेद असू शकतात; पण त्या परंपरा धर्माचे उत्तम उदाहरण दर्शवतात.
श्रीराममंदिराचा प्रतिध्वनी संपूर्ण जगात ऐकू यावा ! – वर्ल्ड हिंदु फाऊंडेशनचे प्रमुख स्वामी विज्ञानानंद
‘वर्ल्ड हिंदु फाऊंडेशन’चे प्रमुख आणि ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’चे मुख्य संयोजक स्वामी विज्ञानानंद म्हणाले की, आम्ही अयोध्येतून प्रसाद मागवला आहे. अयोध्येत बांधण्यात येणार्या श्रीराममंदिराची प्रतिकृती येथे (बँकॉक) बनवली जात आहे. श्री रामललाच्या जन्मभूमीचे छायाचित्रही आम्ही अयोध्येतून आणू. श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठपनेपूर्वीच श्रीराममंदिराचा प्रतिध्वनी संपूर्ण जगात ऐकू यावा.
‘धर्म विजयाचा आधार ’ या विचारांवर परिषदेची संकल्पना !
तिसर्या वर्ल्ड हिंदु काँग्रेस परिषदेची संकल्पना ‘धर्म विजयाचा आधार’ अशी आहे. यामध्ये हिंदूंच्या कर्तृत्वासमवेत जगातील अनेक क्षेत्रांत हिंदूंवर होत असलेले अत्याचार,भेदभाव आणि त्यांना सामोरे जाण्याचे मार्ग, यांवरही चर्चा होणार आहे. वर्ष २०१४ मध्ये पहिली वर्ल्ड हिंदु काँग्रेस देहली येथे आयोजित करण्यात आली होती आणि दुसरी परिषद अमेरिकेतील शिकागो येथे वर्ष २०१८ मध्ये आयोजित करण्यात आली होती. कोरोना कालावधीमुळे तिसर्या परिषदेस विलंब झाल्याने ती आता आयोजित करण्यात आली.
प.पू. सरसंघचालकांनी मांडलेली सूत्रे
प्रत्येक हिंदूपर्यंत आपल्याला पोचायचे आहे !
आपल्याला प्रत्येक हिंदूपर्यंत पोचावे लागेल, त्याच्याशी संपर्क साधावा लागेल. सर्व हिंदू एकत्र येऊन जगभरातील हिंदूंशी संपर्क साधतील. हिंदू अधिकाधिक संख्येने एकमेकांशी जोडले जात असून जगाशी संपर्क साधण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.
भारत आनंद आणि समाधान यांचा मार्ग दाखवील !
‘भारत आनंद आणि समाधान यांचा मार्ग दाखवील’, हे कोरोना महामारीनंतर संपूर्ण जगाने मान्य केले आहे आणि सर्वसंमतीने यावर विचारही करत आहे. आजचे जग डगमगत आहे, चाचपडत आहे. गेली २ सहस्र वर्षे त्यांनी आनंद आणि शांतता यांसाठी भौतिकवाद, साम्यवाद आणि भांडवलशाही यांचे प्रयोग केले. त्यांनी अनेक धर्मांशी संबंधित प्रयोगही केले. त्यांना भौतिक समृद्धी मिळाली; मात्र समाधान मिळाले नाही. आता कोरोना महामारीनंतर त्यांनी यावर पुनर्विचार करायला प्रारंभ केला आहे. आता त्यांना भारतच मार्ग दाखवेल, यावर त्यांचे एकमत झाल्यासारखे वाटत आहे.
जगाला आध्यात्मिक स्तरावर नेणे हे हिंदूंचे राष्ट्रीय कर्तव्य ! – सरसंघचालक
प.पू. सरसंघचालक म्हणाले की, जगाला सुसंस्कृत करून आपण जो ‘धर्म विजय’ साध्य करू, तो कुणाच्याही विरोधात नसेल. तो विजय सर्वांचा असेल. आपल्याला स्थूल जगतापासून आरंभ करायचा आहे आणि आध्यात्मिक स्तरावर जायचे आहे. हे आपले राष्ट्रीय कार्य आहे. आपल्याला हे सुनिश्चित करायचे आहे की, हे सर्व आपण आपल्या या जीवनकाळात करू शकू !
सनातन धर्माचे वैभव मिळवण्यासाठी धर्माचरण करूया ! – प.पू. माता अमृतानंदमयी
या वेळी जगभरातून आलेल्या हिंदुत्वनिष्ठांना संबोधित करतांना प.पू. माता अमृतानंदमयी म्हणाल्या, ‘‘विश्वातील प्रत्येक अणूमध्ये आपल्या महान ऋषिमुनींनी रचलेल्या वेद, पुराण आणि स्तोत्र यांची सात्त्विक शक्ती आहे. आपल्या धर्माचे पालन करून मिळालेली शांती, प्रेम आणि समृद्धी याने जगाची भरभराट व्हायला हवी. या जगातील सर्व काही परमात्म्याचे वरदान आहे. सनातन धर्माचे वैभव मिळवण्यासाठी धर्माचरण करूया !’’
हिंदूंची जागतिक स्तरावर आवाज आणि संवाद यांची यंत्रणा नाही ! – बोधीनाथ वेलांशस्वामी
अमेरिकेतील प्रसिद्ध नियतकालिक ‘हिंदुइजम टुडे’चे संपादक बोधीनाथ वेलांशस्वामी या वेळी म्हणाले, ‘‘हिंदूंची जागतिक स्तरावर आवाज आणि संवाद यांची यंत्रणा (नेटवर्क) नाही. जगाच्या इतर भागांमध्ये जे घडत आहे, त्यापासून जगभरातील हिंदू वंचित राहिला आहे. ‘हिंदुइजम टुडे’ नियतकालिक जगभरातील हिंदूंना जोडण्याचे माध्यम आहे. भारतातील नियतकालिके त्यांच्या गुरूंचे तत्त्वज्ञान, तत्त्वे आणि वंशपरंपरा यांवर लक्ष केंद्रित करतात.
स्वामीजी पुढे म्हणाले की, आमचे नियतकालिक अराजकीय आणि समकालीन शैलीची माहिती प्रदान करते. हे हिंदु संस्कृती, स्त्री-पुरुष आणि तरुण यांचा आवाज ठरले आहे. जगाचा आवाज बनणे आणि पुनर्जन्म, कर्म आणि कर्तव्य यांवर विश्वास ठेवणार्या सनातन धर्मियांची यंत्रणा उपलब्ध करून देणे, हा या नियतकालिकाचा मुख्य उद्देश आहे. हे नियतकालिक वेद, पुराण आणि स्तोत्रे यांमधील उच्चकोटीच्या ज्ञानाचा प्रसार करते.
हिंदु जनजागृती समितीचाही सहभाग !वर्ल्ड हिंदु काँग्रेसमध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि समितीचे देहली समन्वयक श्री. श्रीराम लुकतुके सहभागी झाले आहेत. |