Boycott Loksabha Elections : शिरगाव (गोवा) – शाळेची नवीन इमारत बांधा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालू !

शिरगाव येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या पालक-शिक्षक संघाची चेतावणी !

शाळेच्या इमारतीच्या प्रश्नावर शिरगावातील पालक आक्रमक, लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

डिचोली, २३ नोव्हेंबर (वार्ता.) : सरकारी प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या प्रश्नावरून शिरगाव येथील पालक आक्रमक बनले आहेत. या शाळेसाठी विनाविलंब नवीन इमारत बांधण्याची मागणी शाळेच्या पालक-शिक्षक संघाने केली आहे. वेळप्रसंगी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासंबंधी विचार करण्यात येणार असल्याची चेतावणी पालक-शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष प्रेमदास सावंत यांनी शिरगाव येथे २३ नोव्हेंबर या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. या वेळी पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गावकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा लक्ष्मी कवठणकर यांच्यासह सुमारे १५ पालक उपस्थित होते.

शिरगाव येथील सरकारी शाळेची इमारत मोडकळीस आलेली आहे. चालू शैक्षणिक वर्षारंभीच पावसाळ्यात शाळेत गळती चालू झाली. परिणामी शाळेतील वर्ग तेथील देवस्थानच्या मालकीच्या एका बंद घरात स्थलांतरित करण्यात आले. सध्या विद्यार्थ्यांची संख्या पहाता वर्ग स्थलांतरित करण्यात आलेली जागाही अपुरी पडत आहे. यामुळे शाळेतील मुलांची मोठी गैरसोय होत आहे.

 (सौजन्य : Prudent Media Goa)

शाळेसाठी नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव ! – आमदार प्रेमेंद्र शेट

शाळेसाठी नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे आणि यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. प्रस्तावाला संमती देण्यासंबंधीचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. वास्तविक इमारतीला गळती लागली, तेव्हा छपराची दुरुस्ती करण्याचा विचार होता; मात्र पालकांच्या मागणीमुळेच नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव विचारात घेण्यात आला. शाळेच्या सूत्रावरून कुणीही चुकीची माहिती पसरवू नये, असे आवाहन स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट यांनी केले आहे.

संपादकीय भूमिका

पालक-शिक्षक संघाला अशी भूमिका घ्यावी लागणे अपेक्षित नाही !