घरगुती उपचार म्हणजे आपत्काळातील संजीवनी
१. वयोवृद्ध आईची शारीरिक क्षमता नाजूक असल्यामुळे दातांवर उपचार करता न येणे
‘माझी आई श्रीमती प्रभावती गजानन शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ८७ वर्षे) हिला मागील ३ वर्षांत ४ वेळा वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात ठेवावे लागले. एकदा डोक्याचे शस्त्रकर्म झाले. तिच्या हृदयाची क्षमता अल्प (२० टक्के) आहे, तसेच मूत्रपिंडांचीही क्षमता अल्प आहे. तिला मूळव्याध आहे आणि रक्तातील बर्याच घटकांचे प्रमाण कमी-अधिक असते. क्षमता अल्प असल्याने ती खोलीतच पडून असते. मागील काही मासांपासून तिचे दात पुष्कळ दुखत आणि हलत होते; परंतु शारीरिक स्थिती नाजूक असल्यामुळे त्यांवर वैद्यकीय उपचार करता येत नव्हते.
२. दंतवैद्यांनी आईचे दात काढण्यासाठी सुसज्ज यंत्रणा असलेल्या रुग्णालयात भरती करण्यास सुचवणे
आईची दातदुखी पुष्कळ वाढली आणि दात अधिक हलायला लागले. १५.६.२०२३ या दिवशी आम्ही आईला दात काढण्यासाठी दंतवैद्यांकडे घेऊन गेलो. आईच्या आजारपणाची धारिका आणि वयोमान अन् एकंदरीत तिची शारीरिक स्थिती पाहून ते म्हणाले, ‘‘यांचे दात काढायचे असल्यास त्यांना शस्त्रक्रियागृह (ऑपरेशन थिएटर), अतीदक्षता विभाग (आय.सी.यु. युनिट), भूलतज्ञ आणि दंतवैद्यक असलेल्या रुग्णालयात भरती करावे लागेल.’’
३. रुग्णालयातील यंत्र खराब असल्याने रुग्णालयात भरती करण्यात अडचण येणे
आईची दातदुखी वाढल्यामुळे तिला दिवसभर पुष्कळ त्रास व्हायचा; म्हणून आम्ही आईचे दात लवकर काढायचे ठरवले. दंतवैद्यांनी सुचवल्यानुसार आम्ही सर्व सुविधा असलेल्या रुग्णालयात चौकशी केली. त्यांच्याकडे सर्व सोयी होत्या. तेथील वैद्य आम्हाला म्हणाले, ‘‘दात काढण्याची यंत्रणा खराब झाली आहे. ती दुरुस्त होईपर्यंत थांबावे लागेल. यंत्र दुरुस्त झाल्यावर आम्ही कळवू. दात काढण्यासाठी अनुमाने १५ सहस्र रुपये आणि औषधांचा व्यय वेगळा करावा लागेल, तसेच काही अडचण आल्यास अधिक पैसे लागतील.’’ (अन्य वेळी दंतवैद्यांकडे दात काढण्यासाठी ५०० ते ७०० रुपये व्यय येतो.)
४. तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्याने हलणारे दात घट्ट होणे, काही दात पडणे आणि दातांचा त्रास बंद होणे
या कालावधीत मी सामाजिक माध्यमांमध्ये दातदुखीवर एक घरगुती उपाय पाहिला. त्याप्रमाणे मंडईतून तुरटी आणून पाण्यामध्ये तुरटीचा खडा ६ – ७ वेळा फिरवून आईला त्या पाण्याच्या गुळण्या सकाळ-संध्याकाळ करण्यास सांगितले. हळूहळू आईच्या दातांचे दुखणे अल्प होत गेले आणि १५ दिवसांनंतर ते पूर्णपणे थांबले, तसेच हालणारे दातही घट्ट झाले. त्यानंतर साधारणपणे २ मासांनंतर तिचे २ दात पडले; पण ते पडतांना किंवा पडल्यानंतर काहीही त्रास झाला नाही.
५. आधुनिक वैद्यांचे खर्चिक उपाय करण्यापेक्षा घरगुती उपाय केल्यामुळे त्रास आणि पैसा वाचणे
आज-काल काहीही आजार झाला की, लगेच आधुनिक वैद्यांकडे जावे लागते. उपचार करण्यापूर्वी पुष्कळ चाचण्या कराव्या लागतात आणि महागड्या गोळ्या अन् औषधे खावी लागतात. यासाठी पुष्कळ व्यय येतो. आईच्या दातदुखीवर घरगुती उपाय केल्याने दात काढण्यासाठी होणारा त्रास आणि पैसा वाचला.
६. आगामी आपत्काळात घरगुती औषधे संजीवनीचे कार्य करतील !
पूर्वी घरोघरी आजीबाईंचा बटवा (लहान कापडी पिशवी) असायचा. त्यात अनेक घरगुती औषधे असायची. ती अत्यंत गुणकारी असायची. ‘आगामी आपत्काळात जेव्हा आधुनिक वैद्य नसतील, तेव्हा अशा घरगुती औषधांचा चांगला उपयोग होऊ शकतो’, हे लक्षात घेऊन अशा घरगुती औषधांची माहिती घेऊन त्याची घरी साठवणूक केल्यास लाभ होऊ शकतो.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी आईचे कठोर प्रारब्ध पुष्कळ सुसह्य केले. ‘गुरु साधक आणि शिष्य यांची काळजी घेऊन त्यांचे प्रारब्ध सुसह्य करतात’, हे आम्हाला अनुभवता आले. याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी सुचवलेली शब्दसुमने कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण !
इदं न मम ।’
– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, देवद आश्रम, पनवेल.
(४.१०.२०२३)
‘हा अनुभव सरसकट सर्वांनाच येईल, असे नाही. वैद्यांचा समादेश आणि आवश्यकता यांनुसार दंतोपचार करू शकतो ! – संपादक |