गाझावरील हमासचे नियंत्रण संपुष्टात ! – इस्रायलचा दावा

इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलंट

तेल अविव (इस्रायल) – हमासने गाझा पट्टीवरील नियंत्रण १६ वर्षांनंतर गमावले आहे. हमासचे आतंकवादी दक्षिण गाझाकडे धावत आहेत. नागरिक हमासच्या तळांना लुटत आहेत, असा दावा इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी केला. इस्रायलच्या सैन्याने हमासच्या संसदेवर नियंत्रण मिळवले आहे. याची छायाचित्रे प्रसारित करण्यात आली आहेत.

‘रॅन्टीसी चिल्ड्रन’ रुग्णालयाखाली हमासचे मुख्यालय (कमांड सेंटर) !

इस्रायलच्या सैन्याने भीती व्यक्त केली की, हमासने ओलिसांना ‘रॅन्टीसी चिल्ड्रन’ रुग्णालयाच्या खाली असलेल्या त्याच्या मुख्यालयात (कमांड सेंटरमध्ये) बंदी बनवले होते. सैन्याने येथून खुर्ची, दोरी, शस्त्रे, मोटारसायकल, रक्षकांसाठी सेवा सूची अशा अनेक वस्तू जप्त केल्या. येथे तात्पुरते शौचालय, स्वयंपाकघर आणि व्हेंटिलेशन पाईप्सदेखील होते. सैन्य येथे पोचण्यापूर्वीच येथून ओलिसांना दुसरीकडे नेण्यात आले होते. हे रुग्णालय जागतिक आरोग्य संघटनेच्या साहाय्याने चालवले जात आहे.

९१ बोगदे नष्ट !

इस्रायली सैन्याने असाही दावा केला की, गाझाच्या अल्-कुद्स रुग्णालयातून त्यांच्या सैनिकांवर आक्रमण करण्यात आले. गोळीबारासमवेतच ग्रेनेडही फेकण्यात आले. प्रत्युत्तरात हमासचे २१ आतंकवादी मारले गेले. सैन्याने गाझामध्ये आतापर्यंत ९१ बोगदे शोधून काढत ते स्फोटकांनी नष्ट केले आहेत.

अल्-शिफा रुग्णालय रिकामे करण्यास डॉक्टरांचा नकार !

गाझातील अल्-शिफा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी रुग्णालय रिकामे करण्यास नकार दिला आहे. इस्रायली संरक्षण दलाने रुग्णालय रिकामे करण्यास सांगितले होते. डॉक्टरांनी म्हटले आहे की, त्यांनी ही जागा सोडल्यास अनुमाने ७०० रुग्णांचा मृत्यू होईल.