पाकिस्तानचे गृहमंत्री सरफराझ बुग्ती यांनी ३१ ऑक्टोबर हा अफगाणी नागरिकांना देश सोडून जाण्यासाठी समयमर्यादेचा शेवटचा दिवस म्हणून घोषित केला होता. अर्थातच अजूनही तिथे सहस्रोंच्या संख्येत रहात असलेल्या अफगाणी नागरिकांचा त्यासाठी संघर्ष चालू आहे. गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ सहस्रोंच्या संख्येने अफगाणी नागरिक पाकिस्तानमध्ये रहात असल्याने आता त्यांना तेथून जाणे किती कठीण असणार आहे, याची कल्पना करता येईल; परंतु ‘त्यांच्याकडून देशाला धोका आहे’, हे लक्षात आल्यावर ‘भिकेकंगाल स्थिती झालेल्या पाकसारख्या देशानेही या त्यांच्या दृष्टीने घुसखोर असलेल्यांना कशी तंबी दिली आहे’, हे लक्षात येते. पाकशी तुलना करता भारतात लाखोंच्या संख्येने मुसलमान घुसखोरांनी देश सर्वार्थाने पोखरून काढलेला असूनही त्यांना अशा प्रकारे तंबी आतापर्यंत कधी दिली गेलेली नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाया करण्यात वेळ जातो आणि भ्रष्ट यंत्रणेमुळे कित्येकदा त्या कारवायाही बारळगतात.
गेल्या वर्षी तालिबानने अफगाणिस्तान कह्यात घेतल्यावर तेथील स्थलांतरित झालेले नागरिक मोठ्या संख्येने पाकिस्तानात आले आहेत. जानेवारी २०२३ पासून पाकिस्तानात ३०० हून अधिक आतंकवादी आक्रमणे झाली. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य काढून घेतल्यावर तेथील अफगाणी आतंकवादी अधिकच चेकाळले आहेत. ते अलीकडे सरकत पाकमध्ये येत आहेत. पाकमध्ये या वर्षात २४ आत्मघातकी बाँबस्फोट झाले. ‘त्यांपैकी निम्म्याहून अधिक स्फोट अफगाणी नागरिकांनी घडवले आहेत’, असे पाकचे म्हणणे आहे. तिसरे एक कारण म्हणजे अफगाण-पाक सीमेवरील खैबर पख्तुनख्वा हा प्रांत आणि बलुचीस्तान येथे सुरक्षेसाठी असलेल्या पाक सैन्यावरही हे तालिबानी आतंकवादी आक्रमणे करत आहेत. त्याचप्रमाणे इतकी वर्षे अफगाणींना पोसणार्या पाकला आता उपरती झाली आहे की, आपण ‘भिकारी’ होण्यामागे या अफगाण घुसखोरांचाही हातभार लागला आहे. ही कारणे पाकच्या गृहमंत्र्यांनी त्यांना देश सोडून जाण्याचा आदेश देण्यास कारणीभूत आहेत.
जशास तसे !
पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी भारताची जी अपरिमित हानी केली आणि करत आहेत, त्याला सीमा नाही. यामध्ये काश्मीरमधील हिंदूंचा वंशविच्छेद, हिंदूंच्या हत्या, सर्व प्रकारच्या जिहादांना प्रोत्साहन, प्रशिक्षणासाठी पैसा पुरवणे, भारतातील मुसलमानांना भडकावणे, येथे दंगली करण्यासाठी ‘स्लिपर सेल’ निर्माण करणे, आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटनांच्या शाखा उघडणे आणि आतंकवादी वाढवून अस्थिरता निर्माण करणे, येथे केलेले बाँबस्फोट, बनावट चलन इत्यादी हानीची सूची विस्तारभयास्तव देणेही शक्य नाही. आता पाकला त्याच्यापेक्षाही कट्टर धर्मांध तालिबानी त्रास देत आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्याच्या देशात रहात असलेले अफगाणी घुसखोर त्याला शत्रू वाटत आहेत. हिंदु धर्मशास्त्रानुसार कर्माचे फळ मिळतेच किंवा ‘करावे तसे भरावे’, असेही एक वचन आहे. त्यामुळे भिकारी होऊन त्याच्या मरणाने तो मरणार आहे, हे तर उघड चित्र आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून केवळ शरीया कायदा मानणारे कट्टर तालिबानी त्याच्यावर आक्रमणे करत आहेत. त्यामुळेच मुसलमान असूनही अफगाणिस्तानचे नागरिक आता त्याला शत्रू वाटू लागले आहेत.
चीनचा पाठिंबाही न्यून !
इतके दिवस चीनच्या आर्थिक पाठिंब्याच्या जोरावर पाक पोट आणि छाती फुगवून सर्वत्र वावरत होता. आता पाकमधील दिवसेंदिवस वाढत चाललेली अस्थिरता आणि बेकारी पहाता चीनही त्याचे साहाय्य अल्प करण्याच्या किंवा यापुढे साहाय्य न करण्याच्या स्पष्ट मनस्थितीत आहे. ‘चीनच्या अल्प होत चाललेल्या आर्थिक पाठिंब्याला एक प्रकारे अस्थिरता निर्माण करण्यास कारणीभूत होणारे अफगाण नागरिक उत्तरदायी आहेत’, असेही आता पाकला वाटत आहे. तालिबानी आतंकवादी संघटना या पाकचा तथाकथित विकास करायला निघालेले चिनी अभियंते, कर्मचारी आदींना ठार मारत आहेत. त्यामुळेही चीनला अडचण होत आहे. एकीकडे पाकला मिळणारा चीनचा पाठिंबा अल्प झाल्यावर दुसरीकडे अफगाणी तालिबानी आतंकवाद्यांना अधिक मोकळे रान मिळणार आहे, असे चक्र फिरण्याची शक्यता आहे.
भारताने लाभ उठवावा !
सध्या सर्व बाजूंनी बुडत चाललेल्या पाकच्या या स्थितीचा भारताने लाभ उठवून ‘बुडत्याचा पाय अधिक खोलात’ नेला पाहिजे. आता स्वतः निर्माण केलेल्या भारतद्वेषाच्या गाळात बुडत असूनही जनतेला भुके ठेवून भारतविरोधासाठी क्षेपणास्त्रे, आतंकवादी कारवाया यांसाठी पैसा खर्च करणे चालूच आहे. पाकने भारताची कधीही न भरून येणारी अशी युद्धापेक्षाही केलेली भयंकर हानी वारंवार आठवून भारताने आंतरराष्ट्रीय राजकीय कूटनीती वापरून आता त्याचे अधिक खच्चीकरण केले पाहिजे. भारतातील मुसलमानांवरील तथाकथित अत्याचारांच्या विरोधात पाक जसे गळे काढतो, तसेच आता भारतानेही तेथील अफगाणी नागरिकांवरील अत्याचारांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व ठिकाणी दबाव टाकला पाहिजे. आक्रमण नाही, तर निदान अशा प्रकारे तरी त्याने पाकला अधिक गर्तेत ओढले पाहिजे; कारण शत्रू पूर्ण नेस्तनाबूत होत नाही, तोपर्यंत तो नांगी वर काढतच रहातो आणि पाककडून आपण सतत तेच अनुभवत आहोत. त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी त्याच्या दुःस्थितीचा लाभ भारताने उठवल्यास एका दगडात अनेक पक्षी मारले जातील, यात शंका नाही !
पाकमध्ये घुसखोरांमुळे झालेल्या स्थितीचा लाभ उठवून भारताने त्याला कोंडीत पकडणे आवश्यक !