लांजा येथे बजरंग दलाच्या वतीने ‘एक दिवा महाराजांसाठी’ उपक्रम साजरा

लांजा – छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करतांना ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ या संज्ञेनुसार गायीचेही रक्षण केले. कसायांच्या तावडीतून त्यांनी गायींचे रक्षण केले. गोहत्या होऊ नये, यासाठी कसायांना कठोर शासन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी गोरक्षणाचे महान कार्य केले. त्याचसमवेत सर्व जनतेला गाय किती महत्त्वाची आहे ? याचा आदर्श घालून दिला. हाच आदर्श समोर ठेवून वसुबारसच्या निमित्ताने श्रीराममंदिर लांजा येथे बजरंग दलाच्या वतीने ‘एक दिवा महाराजांसाठी’ हा उपक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी येथील बजरंगी, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते.

सर्वप्रथम ध्येयमंत्र घेण्यात आला. त्यानंतर  छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करून तेलाचा दिवा प्रज्वलित करण्यात आला. या प्रसंगी अधिवक्ता रूपेश गांगण यांनी ‘वसुबारस’ निमित्ताने विचार मांडले. प्रेरणा मंत्र म्हणून आणि प्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रत्येकाने गोरक्षणाचे कार्य हे धर्मरक्षणाचे कार्य समजून करावे !- अधिवक्ता रूपेश गांगण

आज वसुबारस आहे.आपण भक्तीभावाने गोमातेची पूजा करतो; पण आज वास्तव  वेगळे आहे. एकेकाळी भारतामध्ये शंभर कोटींपेक्षा अधिक गोधन होते. आज एक कोटीपेक्षा अल्प गोधन शिल्लक राहिले आहे. आपल्या शेतीप्रधान व्यवस्थेचा गोधन हा कणा आहे. आज गोतस्करी करून गोहत्या केली जात आहे. गोमांस विक्रीला आणले जात आहे. देशातून गोधनाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे. हे आपण थांबवू शकलो नाही, तर पुढच्या पिढीला गोधन कसे होते ? हे चित्राच्या माध्यमातून दाखवावे लागेल. प्रत्येकाने गोरक्षणाचे कार्य हे आपले धर्मरक्षणाचे कार्य आहे, असे समजून निकराने ते केले पाहिजे.