रामललाच्या मंत्राक्षता रत्नागिरी जिल्ह्यात येणार

अक्षतांचा मंगल कलश अनिरुद्ध भावे आणि नरेश पाटील यांनी अयोध्येत स्वीकारला.

गुहागर – संपूर्ण देशातील जनतेला राममंदिर दर्शनाचे निमंत्रण देण्यासाठी रामललासमोर मंत्रवलेल्या अक्षतांचे वितरण करण्यात आले. या वेळी कोकण प्रांतात वितरण करण्याचा मंगल कलश विश्व हिंदु परिषदेचे प्रांत सहमंत्री अनिरुद्ध भावे आणि समरसता प्रमुख नरेश पाटील यांनी अयोध्येत स्वीकारला.

२२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येमध्ये पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत यांच्यासह सहस्रो संतांच्या उपस्थितीत रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानंतर २४ जानेवारीपासून राममंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे. या निमित्ताने जगभरात पुन्हा दिवाळी साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रतिकात्मक चित्र

२२ जानेवारीला देशभरातील साडेपाच लाख मंदिरांमध्ये आणि जगभरातील रामभक्त परिवारांनी स्वत:च्या घरात विद्युत् रोषणाई करावी, दिवाळीप्रमाणे पणत्यांनी संपूर्ण परिसर सजवावा. मंदिरांमध्ये महाआरतीचे नियोजन करावे. घराघरांत उत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी १ ते १५ जानेवारी या काळात देशातील १० कोटी परिवारांना मंत्राक्षता देऊन प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे.

या मंत्राक्षता थेट अयोध्येतून संपूर्ण देशात वितरित करण्याचा कार्यक्रम ५ नोव्हेंबरला अयोध्येत झाला. त्यासाठी देशभरातून विश्व हिंदु परिषदेच्या विविध प्रांतांचे कार्यकर्ते अयोध्येत एकत्र आले होते. त्यांच्या उपस्थितीत रामललाच्या समोर संतांच्या मंत्रघोषात मंगलाक्षतांचे कलक्ष मंत्रांकित करण्यात आले.

डिसेंबर अखेरीस प्रत्येक तालुक्यात मंत्राक्षता पोचवल्या जातील, असे भावे यांनी सांगितले.