Diwali In Canada US Britain : कॅनडा, अमेरिका आणि ब्रिटन या देशांत राष्ट्रप्रमुखांकडून दिवाळी साजरी

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक

नवी देहली – भारतात दिवाळी साजरी केली जाणार असतांना गेल्या काही वर्षांपासून विदेशातही मोठ्या प्रमाणावर दिवाळी साजरी होऊ लागली आहे. ८ नोव्हेंबर या दिवशी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांच्या ‘१०, डाउनिंग स्ट्रीट’ येथील निवासस्थानी पत्नी अक्षता यांच्यासमवेत दिवाळी साजरी केली. या वेळी त्यांनी अनेक हिंदु मान्यवरांना आमंत्रित केले होते. ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाने सामाजिक माध्यमांतून म्हटले, ‘अंधारावर प्रकाशाच्या विजयाच्या निमित्ताने पंतप्रधान सुनक हिंदु समाजातील लोकांसमवेत दिवाळी साजरी करत आहेत. सुनक यांनी संपूर्ण ब्रिटन आणि जगाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.’

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी साजरी केली दिवाळी !

याप्रमाणेच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीही भारतासमवेत असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर दिवाळी साजरी केली. राजधानी ओटावा येथील पार्लमेंट हिल येथे ट्रुडो यांनी दीपप्रज्वलन केले. याची छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित करत ट्रुडो यांनी म्हटले, ‘काही दिवसांत संपूर्ण जग दिवाळीचा सण साजरा करेल. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा हा सण आहे. नव्या आशेचा हा सण आहे. ज्यांनी आमच्यासमवेत  दिवाळी साजरी केली, त्या सर्वांचे मी आभार मानतो. मला आशा आहे की, हा सण तुम्हा सर्वांच्या आयुष्यात नवीन प्रकाश आणि आशा आणेल.’

कॅनडाच्या टपाल कार्यालयाकडून टपाल तिकिटाचे अनावरण

कॅनडाच्या टपाल कार्यालयाने दिवाळीनिमित्त टपाल तिकीट प्रकाशित केले आहे. गेल्या ५ वर्षांपासून टपाल कार्यालयाकडून अशा प्रकारे तिकीट प्रकाशित करण्यात येत आहे.

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या घरी साजरी झाली दिवाळी !

भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनीही त्यांच्या अधिकृत घरी दिवाळी साजरी केली. हॅरिस यांनी पाहुण्यांसमवेत या सणाच्या महत्त्वावर चर्चा केली. त्या म्हणाल्या, ‘आम्ही दिवाळी अशा वेळी साजरी करत आहोत, जेव्हा जगात खूप काही घडत आहे. जग एका कठीण आणि अंधःकारमय काळातून जात आहे. दिवे लावून साजरा करण्याचा हा सण आहे. हा सण आपल्याला अंधार आणि प्रकाश यांतील भेद शिकवतो.’

अटलांटा (अमेरिका) शहराच्या महापौरांकडून दिवाळी साजरी !

अटलांटा (अमेरिका) येथे आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी महोत्सवामध्ये शहराचे महापौर आंद्रे डिकेंस सहभागी झाले होते. या वेळी डिकेंस म्हणाले की, आम्ही दिवाळी साजरी करून आनंदी आहोत.