‘कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटने’चे अध्यक्ष युवराज मोळे यांचे प्रतिपादन
कोल्हापूर, ६ नोव्हेंबर (वार्ता.) – महाराष्ट्र, कर्नाटकसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील सरकारीकरण झालेल्या रेणुकामाता मंदिर परिसरात असलेल्या ‘जोगणभावी कुंडा’ची दुरवस्था झालेली आहे. याची व्यवस्था एका खासगी ठेकेदाराकडे असून कुंडातील पाणी हिरवे झाले असून त्याला दुर्गंध येत आहे. कुंडाच्या पायर्याही अत्यंत अस्वच्छ आहेत. या वर्षीची सौंदत्ती यात्रा २४ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०२३ या कालावधीत होत आहे. तोपर्यंत ‘जोगणभावी कुंडा’तील पाणी आणि कुंड परिसर स्वच्छ न केल्यास लिंब नेसण्याच्या विधीवर (भाविकांनी कुंडात स्नान केल्यावर तेथे असलेल्या जोगती (जोगवा मागणारे) त्यांच्याकडील कडुलिंबाचा पाला भाविकांच्या कमरेला बांधतात आणि तोंडात देतात. त्याच स्थितीत देवीच्या मंदिराला ५ प्रदक्षिणा घातल्या जातात.) बहिष्कार टाकण्यात येईल, अशी चेतावणी ‘कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटने’चे अध्यक्ष श्री. युवराज मोळे यांनी ६ नोव्हेंबर या दिवशी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी उपाध्यक्ष तानाजी चव्हाण, सरचिटणीस गजानन विभूते, कार्याध्यक्ष अशोकराव जाधव, अच्युतराव साळोखे, केशव माने, जगप्रमुख शिवाजी आळतेकर, दत्ता पोवार, सतीश देवरे यांसह मोठ्या संख्येने भक्त-भाविक उपस्थित होते.
१. यात्रेच्या कालावधीत श्रद्धेचा आणि महत्त्वाचा विधी म्हणजे जोगणभावी कुंडातील तीर्थाचे स्नान आणि ओल्या अंगाने नेसण्यास येणारे लिंब होय. या विधीसाठी ठेकेदार प्रत्येक भाविकाकडून ५० रुपये घेतो आणि असे असतांना गेली कित्येक वर्षे या कुंडाची स्वच्छता होत नसल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
२. प्रतिवर्षी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या वतीने आम्ही कोल्हापूर येथे भाविकांना स्वखर्चाने यात्रेसाठी नेतो. प्रत्येक वर्षी आम्ही ठेकेदाराकडे या समस्येविषयी चर्चा करतो; मात्र त्यावर उपाययोजना निघत नाही.
३. कुंडातील पाणी स्वच्छ असावे, कुंडाच्या चारी दिशेच्या पायर्या स्वच्छ असाव्यात, कुंडाच्या शेजारी पुरुष आणि महिला यांना स्नानासाठी स्वतंत्र अन् बंदिस्त व्यवस्था असावी, शौचालयांची संख्या वाढवण्यात यावी, अशा आमच्या मागण्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास यापुढील काळात डोंगरावर येणार्या गाड्या कुंडाच्या ठिकाणी न थांबता त्यांच्या त्यांच्या भागात जातील.
संपादकीय भूमिका :
|