पाकव्याप्त काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्याची हत्या

घरातच सापडला शिरच्छेद केलेल्या स्थितीतील मृतदेह

ख्वाजा शाहिद उपाख्य मियां मुजाहिद

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – वर्ष २०१८ मध्ये जम्मूतील सैन्य तळावर आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार ख्वाजा शाहिद उपाख्य मियां मुजाहिद याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञातांनी हत्या केली. शाहिद याचा मृतदेह त्याच्या घरातच शिरच्छेद केलेल्या स्थितीत आढळून आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे अपहरण करण्यात आले होते. जम्मूतील सुंजवान येथील सैन्य तळावरील आक्रमणात ६ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले होते.

शाहिद लष्कर-ए-तोयबाचा कमांडर होता. तो पाकव्याप्त काश्मीरच्या नीलम खोर्‍यात रहात होता. काही दिवसांपूर्वी त्याचे अपहरण करण्यात आले होते. त्याचा शोध आय.एस्.आय.कडूनही घेण्यात येत होता; मात्र तो सापडला नव्हता.

आतापर्यंत १८ आतंकवाद्यांच्या झाल्या हत्या !

गेल्या २० मासांमध्ये भारताच्या विरोधात कारवाया करणारे १८ आतंकवादी पाकिस्तान, कॅनडा, ब्रिटन आदी देशांमध्ये आतापर्यंत मारले गेले आहेत. या हत्या अज्ञातांकडून केल्या जात आहेत. यामागे कोण आहे ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशा हत्या झालेल्यांपैकीच हरदीप सिंह निज्जर एक आहे. कॅनडाने भारतावर त्याच्या हत्येचा आरोप केला आहे. भारताने याविषयी पुरावे देण्याची मागणी केली आहे.