फोंडा (गोवा) येथील (कै.) श्रीमती पद्मा भाटकार (वय ९० वर्षे) यांची त्यांच्या मुलींना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे !

५.११.२०२३ या दिवशी फोंडा (गोवा) येथील (कै.) श्रीमती पद्मा भाटकार यांचे पहिले वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्त ‘त्यांच्या मुलींना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यात साधनेमुळे झालेले पालट, तसेच त्यांच्या शेवटच्या आजारपणात, निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे’ येथे दिली आहेत. ३.११.२०२३ या दिवशी आपण काही सूत्रे पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहू.

(भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/734252.html

(कै.) श्रीमती पद्मा भाटकार

५. आईचे शेवटचे आजारपण

५ अ. कमरेचा अस्थिभंग आणि ‘ब्राँकाइटिस’ होणे : ‘वर्ष २०१८ मध्ये आई पडली आणि तिच्या कमरेचा अस्थिभंग झाला. त्यानंतर तिला ‘ब्राँकाइटिस’ (फुप्फुसातील श्वासनलिकेचा विकार आणि तेथील इंद्रिये यांना सूज येणे) हा आजार चालू झाला. तो आजार औषधे, नियमित प्राणायाम आणि साधना, यांमुळे गुरूंच्या कृपेने नियंत्रणात होता.

५ आ. आईचा आजार वाढून तिला श्वास घेण्यास त्रास होणे आणि त्या वेळी गुरुदेवांनीच तिची काळजी घेतल्याची अनुभूती येणे : वर्ष २०२२ मध्ये पितृपक्षाच्या शेवटी आईचा आजार वाढला आणि तिला श्वास घेणे कठीण होऊ लागले. आधुनिक वैद्य घरी येऊन तिची तपासणी करत होते, तरीही काही निदान होत नव्हते. ४.१०.२०२२ या दिवशी सायंकाळी तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला; म्हणून ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ (रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण) लावला. तो लावूनही ५.१०.२०२२ या दिवशी सकाळी तिच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी न्यून असल्यामुळे आम्ही तिला रुग्णालयात भरती करण्याचा निर्णय घेतला. तिला ‘श्वास घ्यायला त्रास होतो का ?’, असे विचारल्यावर ती ‘नाही’, असे सांगत असे. त्या वेळी ‘पल्स ऑक्सिमीटर’वर (रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजण्याच्या यंत्रावर) ऑक्सिजनची पातळी ९३ टक्क्यांपेक्षाही अल्प होती. (निरोगी व्यक्तीच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी ९५ ते १०० टक्के असते.) यावरून ‘गुरुदेवच साधकांची काळजी घेतात’, हे आमच्या लक्षात आले.

५ इ. आईचा शारीरिक त्रास वाढणे; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले समवेत असल्याने मरणाची भीती वाटत नसल्याचे तिने सांगणे : रुग्णालयात २ – ३ दिवस उपचार घेतल्यावर आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यानंतर आईच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यानंतर मात्र ‘ऑक्सिजन’ देऊनही तिला श्वास घेण्यास परत त्रास होऊ लागला. तिला बसताही येईना. तेव्हा आम्ही तिला विचारले, ‘‘तुझ्या मनात काही भीती आहे का ? तुला कुणाला काही सांगायचे आहे का ?’’ त्यावर ती आम्हाला म्हणाली, ‘‘माझ्या मनात कुणाबद्दल कोणताही विचार नाही आणि चिंताही नाही. मला मरणाची भीती नाही. मला वाटते की, परम पूज्य माझ्या समवेत आहेत.’’

५ ई. आईला अतीदक्षता विभागात भरती केल्यावरही तिच्या मनात ‘नामजप, परम पूज्य, साधक आणि आश्रम’, यांविषयीचे विचार असणे : त्या रात्री आजार अधिक वाढल्यामुळे तिला तिच्या मनाविरुद्ध अतीदक्षता विभागात (आय.सी.यू. मध्ये) भरती करण्यात आले. तिथे ती शुद्धीत होती. केवळ तोंडावर मास्क (मुखपट्टी) असल्यामुळे तिला बोलणे कठीण जात होते. त्या स्थितीतही तिने विचारले, ‘‘आता मी कुठला नामजप करू ?’’

अतीदक्षता विभागात असतांनाही तिच्या मनात ‘परम पूज्य, ‘सनातन प्रभात’, साधक आणि आश्रम’, यांविषयी विचार होते. दुसर्‍या दिवशी तिने आम्हाला विचारले, ‘‘काल रात्री तुम्ही कुठे झोपलात ? जेवलात ना ? तुम्ही डोळ्यांतून पाणी काढू नका. मी असे जगण्यापेक्षा गेलेली बरी !’’

आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. लिंदा बोरकर

६. आईच्या निधनापूर्वी जाणवलेली सूत्रे

६ अ. ‘अतीदक्षता विभागातून बाहेर काढल्यावर तुझा प्राण जाऊ शकतो’, असे आईला सांगितल्यावरही तिने त्यासाठी सिद्ध असल्याचे सांगणे आणि त्यामागील श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितलेले कारण :

१६.१०.२०२२ या दिवशी सकाळी आमचा भाऊ अमेरिकेहून गोव्याला आला. तो आईशी बराच वेळ बोलू शकला. आईने त्याच्याकडे त्याच्या कुटुंबाविषयी विचारपूस केली. ‘तिला अतीदक्षता विभागातून बाहेर काढावे’, असे तिला वाटत होते. आम्ही तिला सांगितले, ‘‘अतीदक्षता विभागातून बाहेर काढले, तर तुझा प्राण जाऊ शकतो.’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘मी सिद्ध आहे.’’ नंतर याविषयी आम्ही श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘आईची आतून साधना चालू असल्यामुळे ती असे सांगू शकली; नाहीतर साधारण व्यक्ती देहाच्या आसक्तीमुळे ‘माझा प्राण जाऊ दे’, असे सांगू शकत नाही.’’ ‘तिला अतीदक्षता विभागात त्रास होतो’, हे समजल्यावर आम्ही तिला सर्वसामान्य कक्षात हालवले. तेथे तिला बरेच नातेवाईक भेटले. त्यानंतर रात्री तिला शांत झोप लागली.

६ आ. आईची स्थिती गंभीर होणे आणि त्या वेळी प.पू. भक्तराज महाराज यांची भजने अन् परात्पर गुरु डॉक्टरांच्या आवाजातील मार्गदर्शन भ्रमणभाषवर लावून तो तिच्या उशीजवळ ठेवणे : १७.१०.२०२२ या दिवशी आईची शारीरिक स्थिती गंभीर झाली होती. आम्ही भ्रमणभाषवर प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आवाजातील ‘शंकानिरसन’ या विषयावरील मार्गदर्शन भ्रमणभाषवर लावून तो आईच्या उशीच्या बाजूला ठेवला होता. आम्ही तिच्याशी अधूनमधून बोलत होतो.

६ इ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी आईला विभूती लावण्यास सांगणे : सायंकाळी ७.३० वाजता श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा भ्रमणभाष आला आणि त्या म्हणाल्या, ‘‘आईच्या गळ्यापासून डोक्यापर्यंत, तसेच आज्ञाचक्र आणि विशुद्धचक्र यांवर प्रत्येक १५ मिनिटांनी विभूती लावा. तुमच्याकडे विभूती नसेल, तर सूक्ष्मातून विभूती लावा.’’

६ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आईची आध्यात्मिक स्थिती चांगली असल्याचे सांगणे : त्यानंतर रात्री ९.५७ वाजता परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा भ्रमणभाष आल्यावर आम्ही त्यांना आईची स्थिती सांगितली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा जप ३ वेळा करा.’’ त्यानंतर त्यांनी आईच्या कानाजवळ भ्रमणभाष ठेवायला सांगितला. नंतर ते आम्हाला म्हणाले, ‘‘आईची आध्यात्मिक स्थिती चांगली आहे.’’ त्या वेळी आई बेशुद्ध स्थितीत असतांनाही गोड हसली. आम्ही आईला घरी घेऊन जाण्याची सिद्धता करू लागलो.

आधुनिक वैद्या रूपाली भाटकार

७. रात्री १०.४० वाजता आईने शांतपणे प्राण सोडला.

८. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी आईच्या निधनाच्या संदर्भात सांगितलेली सूत्रे

त्याच दिवशी रात्री आम्हाला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा भ्रमणभाष आला. आम्ही त्यांना सांगितले, ‘‘परम पूज्य आईशी बोलत असतांना आई हसली होती.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘गुरुदेवांनी तिला सूक्ष्मातून दर्शन दिले असेल. परम पूज्यांची तुमच्या संपूर्ण कुटुंबावर पुष्कळ कृपा आहे. तुम्ही आईची परिपूर्ण सेवा केल्यावर आणि तिचे प्रारब्ध संपल्यानंतर ती निघून गेली. तिचे भोग संपले आहेत. आता ती केवळ आध्यात्मिक प्रगती करणार आहे. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुमची साधना चालू ठेवा.’’

९. आईच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे

९ अ. गुरुकृपेने आईचे पार्थिव लगेच घरी आणता येणे : रुग्णाचा मृत्यू झाल्यावर पार्थिव २ घंट्यांपेक्षा अधिक वेळ रुग्णालयात ठेवता येत नाही. ते शवगृहात ठेवावे लागते. त्यानंतर पार्थिव घरी घेऊन जाण्यासाठी प्रक्रिया करण्यास बराच वेळ लागतो. गुरुकृपेने आम्हाला ऐन वेळी रुग्णवाहिका मिळाली आणि आम्ही आईचे पार्थिव घरी नेऊ शकलो.

९ आ. १८.१०.२०२३ या दिवशी तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. तेव्हा तेथील वातावरण शांत होते.

९ इ. आमचे एक नातेवाईक प.पू. राऊळ महाराज यांचे भक्त आहेत. आईच्या पार्थिवासमोर उभे राहून ते म्हणाले, ‘‘त्यांचा प्रवास छान झाला. त्यांना बघून माझा भाव जागृत झाला.’’

१०. प.पू. गुरुदेवांनी आई-वडिलांची शेवटपर्यंत काळजी घेतल्याचे जाणवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होणे

‘सोमवार’ हा आईचा कुलदेव श्री नागेश महारुद्र याचा वार असतो. आईचे निधन त्याच दिवशी कालाष्टमीला झाले. त्याच दिवशी दिवसभर नागेशाच्या मंदिरात आमच्या कुटुंबियांचा महारुद्र विधी चालू होता. विधी संपून घरी परतल्यानंतर आईचे निधन झाले. काही वर्षांपूर्वी प.पू. गुरुदेव आम्हाला म्हणाले होते, ‘‘तुमचे आई-वडील दोघेही साधक आहेत. मी त्यांची काळजी घेणार आहे. तुम्ही केवळ साधना करा.’’ खरोखरच आमच्या आई-वडिलांचे ‘कालाष्टमी’ या तिथीला निधन झाले. ‘प.पू. गुरुदेवांनी त्यांची काळजी घेतली’, याबद्दल आमच्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

११. आईच्या पार्थिवाचे छायाचित्र पाहिल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काढलेले उद्गार !

आईच्या निधनानंतर काही दिवसांनी परात्पर गुरु डॉक्टरांनी आईच्या पार्थिवाचे छायाचित्र बघितले आणि म्हणाले, ‘‘त्या निर्मळ होत्या. त्यांचा चेहरा शांत आणि लहान मुलासारखा वाटतो.’’

परम पूज्यांनी आमचे आई-वडील आणि पूर्ण कुटुंब यांच्यावर पुष्कळ कृपा केली आहे. त्यांच्या कोमल चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’

(समाप्त)

– डॉ. (सौ.) लिंदा बोरकर आणि डॉ. रूपाली भाटकार ((कै.) श्रीमती पद्मा भाटकार यांच्या मुली), फोंडा, गोवा. (१२.६.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक