५.११.२०२३ या दिवशी फोंडा (गोवा) येथील (कै.) श्रीमती पद्मा भाटकार यांचे पहिले वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्त ‘त्यांच्या मुलींना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यात साधनेमुळे झालेले पालट, तसेच त्यांच्या शेवटच्या आजारपणात, निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे’ येथे दिली आहेत.
(भाग १)
१. आईचे बालपण
‘आईचे आई-वडील धर्मनिष्ठ आणि सदाचरणी होते. त्यामुळे त्यांनी तिच्यावर धार्मिक संस्कार केले होते. आई १४ वर्षांची असतांना तिच्या आईचा मृत्यू झाला. तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले नाही. त्यामुळे त्यांना मुलीला सांभाळणे कठीण गेले असते; म्हणून तिला तिच्या आजोळी (तिच्या आईच्या आई-वडिलांकडे) वास्को (गोवा) येथे रहावे लागले. आजी-आजोबांच्या घरी श्री दामोदराचे मंदिर होते. त्या ठिकाणी ती निःस्वार्थपणे नियमित सेवा करत असे. ‘औदार्य, निःस्वार्थीपणा आणि गरजूंना साहाय्य करणे’, यांसारखे गुण तिने तिच्या आजीकडून घेतले. तिची आजी श्री दामोदरदेवाची पुष्कळ भक्ती करायची आणि हेच संस्कार तिने आईवरही केले.
२. आईची गुणवैशिष्ट्ये
२ अ. आई सात्त्विक होती, तसेच ती नेहमीच शांत, आनंदी, लहान मुलासारखी निरागस आणि हसतमुख असायची.
२ आ. आईमधील चिकाटी आणि बुद्धीमत्ता या गुणांमुळे ती कोणतेही काम आव्हान म्हणून स्वीकारून ते यशस्वीपणे पूर्ण करत असे.
२ इ. आदर्श वैवाहिक जीवन जगणे आणि मुलांवर चांगले संस्कार करणे : माझ्या आई-वडिलांचे वैवाहिक जीवन ५० वर्षांहून अधिक काळाचे होते आणि ते अतिशय आदर्श जीवन जगत होते. ते दोघे एकमेकांना पूरक होते. धर्मनिष्ठ असल्यामुळे त्यांनी आम्हा मुलांवर चांगले संस्कार केले, उदा. खोटे न बोलणे, दुसर्यांना त्रास न देणे, दुसर्यांना निरपेक्षपणे साहाय्य करणे, भौतिक संपत्तीमागे न धावणे इत्यादी.
अध्यात्मातील पहिले धडे आम्हाला आमच्या आईनेच दिले. लहानपणापासूनच तिने आम्हाला ‘ईश्वराकडे काहीही मागू नये’, असे सांगून निष्काम भक्ती करण्यास शिकवले. ‘हे ईश्वरा, तू सर्व जाणतोस. त्यामुळे माझ्यासाठी जे योग्य आहे, तेच तू कर’, अशी प्रार्थना ती करत असे. तिने आम्हाला सूर्यास्ताच्या वेळी हात-पाय धुऊन श्लोक म्हणण्यास शिकवले. ‘सकाळी उशिरा उठणे अशुभ असते’, असे सांगून तिने आम्हाला सकाळी लवकर उठण्याची सवय लावली. ती स्वतः अत्यल्प वेळ झोपत असे.
ती इतरांना जे सांगत असे, ते सर्व स्वतः आचरणात आणत असे. ‘दुसरा जरी आपल्याशी वाईट वागला, तरी आपण त्याच्याशी चांगलेच वागले पाहिजे’, हे तिने आम्हाला शिकवले. हे तिने तिच्याशी वाईट वागणार्या नातेवाइकांच्या संदर्भातही कृतीत आणले.
२ ई. मनमोकळेपणा : या गुणामुळे आम्ही तिच्यापासून काहीच लपवत नसू. त्यामुळे आमची मित्रमंडळी आम्हाला ‘तुमची आई तुमची मैत्रीणच आहे’, असे म्हणत असत.
२ उ. सहनशीलता
१. वर्ष १९७० मध्ये श्री गणेशचतुर्थीच्या वेळी ‘प्रेशर कूकर’चा स्फोट झाल्यामुळे ती भाजली होती; परंतु घरी ५ दिवसांचा गणेशोत्सव असल्यामुळे ‘देवाच्या कार्यातील तो आध्यात्मिक अडथळा आहे’, असा विचार करून तिने स्वतःला होणार्या वेदनांकडे दुर्लक्ष केले आणि आनंदाने उत्सव साजरा केला.
२. वयाच्या ९० व्या वर्षीही ती तिचे दुखणे आणि वार्धक्यामुळे होणार्या वेदना यांकडे दुर्लक्ष करत असे. स्वतःच्या आरोग्याविषयी तिच्या मनात कृतज्ञताभाव होता. ‘ईश्वराच्या कृपाशीर्वादाने मी सुदृढ आहे’, असे ती नेहमी म्हणत असे.
२ ऊ. मायेतील गोष्टींविषयी आसक्ती नसणे : आईला तिच्या तरुणपणीही सोने आणि कपडे यांविषयी आसक्ती नव्हती. ती एखाद्या नातेवाइकाला आवश्यक असलेला सोन्याचा दागिना कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता देत असे.
२ ए. ‘ईश्वरेच्छा’ म्हणून कठीण परिस्थिती स्वीकारणे
१. आमच्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा तिने ‘ते त्यांच्या मार्गाने गेले’, असे म्हणून त्या प्रसंगाचा धैर्याने स्वीकार केला. ‘त्यांच्या मृत्यूनंतरच्या प्रवासामध्ये अडथळा येऊ नये’, असे तिला वाटत होते.
२. वर्ष १९९६ मध्ये तिच्या मुलीला, म्हणजे आमच्या बहिणीला कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्या वेळीही आईने ते स्वीकारले आणि देवावर श्रद्धा ठेवून बहिणीला रोगाशी लढण्यास साहाय्य केले. आई वयस्कर असूनही बहिणीला साहाय्य करण्यासाठी मुंबई येथे गेली. बहिणीच्या शस्त्रकर्मानंतर तिची प्रकृती सुधारेपर्यंत आईने तिची चांगल्या प्रकारे काळजी घेतली. आईने बहिणीचे घर सांभाळले आणि तिचे यजमान अन् मूल यांना धीर दिला. जानेवारी २०२२ मध्ये बहिणीचे निधन झाले. तेव्हा आई दुःखी असूनही तिने ‘ईश्वरेच्छा’ म्हणून तो प्रसंग स्वीकारला.
२ ऐ. घरबसल्या तळमळीने सेवा करणे : पूर्वी आई ‘पणजी येथे रहाणार्या काही साधकांना जेवण देणे, तसेच नातेवाईक अन् पाहुणे यांना सनातनच्या ग्रंथांचे वितरण करणे’, यांसारख्या सेवा करत असे. ती दैनिक ‘सनातन प्रभात’ नियमितपणे वाचत असे आणि त्यातील महत्त्वाची सूत्रे आम्हाला किंवा घरातील मोलकरणीला न चुकता सांगत असे. एखाद्या दिवशी आम्ही दैनिक ‘सनातन प्रभात’ घरी आणायला विसरलो, तर दुसर्या दिवशी ती २ दिवसांचे दैनिकाचे अंक वाचत असे. ती आम्हालाही त्यातील ठळक लेख वाचायला सांगत असे किंवा आम्हाला वेळ नसल्यास ती स्वतः ते वाचून दाखवत असे.
२ ओ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचा भाव
१. वर्ष १९९७ मध्ये एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्याकडे (डॉ. रूपाली भाटकार (श्रीमती भाटकार यांची धाकटी मुलगी) यांच्याकडे) आले होते. त्या वेळी आई त्यांच्यासाठी काही पदार्थ करून पाठवत असे. तिच्यातील भावामुळे परात्पर गुरु डॉक्टर तिने केलेले पदार्थ खात असत. एकदा गुढीपाडव्याच्या दिवशी तिने नारळाचे दूध आणि तांदुळाच्या शेवया बनवून परात्पर गुरु डॉक्टरांसाठी आश्रमात पाठवल्या. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या आवडीने खाल्ल्या.
तिच्यासाठी कुणी विदेशातून ‘शुगरफ्री चॉकलेट’ इत्यादी आणले, तर तिला प्रथम परम पूज्यांची आठवण होत असे आणि ती आम्हाला त्यांच्यासाठी ते पदार्थ आठवणीने न्यायला सांगत असे. ती जेव्हा एखादा गोड पदार्थ बनवायची, उदा. रताळ्याची करंजी, तेव्हा ती सर्वप्रथम परात्पर गुरु डॉक्टरांना नैवेद्य दाखवत असे.
२. ती प्रतिदिन उठल्यावर परम पूज्यांना भावपूर्ण प्रार्थना करत असे. जेव्हा तिची प्रकृती खालावली, तेव्हा ती पलंगावर परम पूज्यांच्या छायाचित्राच्या दिशेने वळून नामजप आणि प्रार्थना करत असे. ते छायाचित्र तिच्या भावामुळे लालसर झाले होते. गुरुदेवांनी त्याचे सूक्ष्म परीक्षण केल्यावर त्याची सकारात्मक प्रभावळ पुष्कळ असल्याचे लक्षात आले.
३. तिला मृत्यूची भीती नव्हती. ती म्हणायची, ‘‘परम पूज्य माझी सगळी काळजी घेणार आहेत.’’
४. परम पूज्यांचा आवाज ऐकल्यावर किंवा त्यांना ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात बघितल्यावर तिचा भाव जागृत होऊन तिच्या डोळ्यांतून भावाश्रू येत असत.
५. एकदा तिची परम पूज्यांशी भेट झाली. तेव्हा ती केवळ त्यांच्या चरणांकडे बघून बोलत होती.
३. आईला आलेल्या अनुभूती
३ अ. आईची श्री दामोदर या देवावर पुष्कळ श्रद्धा होती. तिच्या जीवनात जेव्हा अडचणी आल्या, तेव्हा श्री दामोदरदेवाने तिच्या स्वप्नात येऊन तिला आश्वस्त केले.
३ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधिकेच्या रुग्णाईत आईला भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यावर तिच्या प्रकृतीत सुधारणा होणे आणि त्यांची भेट झाल्यावर तिला रुग्णालयातून घरी पाठवणे : वर्ष २००० मध्ये आईला फुप्फुसाचा आजार (न्यूमोनिया) झाला आणि तिला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि लगेचच तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. नंतर परात्पर गुरु डॉक्टरांनी तिची भेट घेतली आणि दुसर्याच दिवशी तिला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले.
४. साधनेमुळे आईमध्ये झालेले पालट
अ. प्रेमभावात वाढ होणे
आ. त्वचा मऊ होणे
इ. आईकडे पाहून शांत वाटणे
ई. क्षमाशीलतेत वाढ होणे’
– डॉ. (सौ.) लिंदा बोरकर आणि डॉ. रूपाली भाटकार ((कै.) श्रीमती पद्मा भाटकार यांच्या मुली), फोंडा, गोवा. (१२.६.२०२३)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आईचे केलेले कौतुक !‘मार्च २००० मध्ये परात्पर गुरु डॉक्टर घरी जेवायला आले होते. त्या वेळी आईचे कौतुक करतांना त्यांनी आईच्या सुनेला सांगितले, ‘‘आता तुम्हाला देवळात जाण्याची आवश्यकता नाही; कारण तुमच्या सासूबाईंनी घरालाच देऊळ बनवले आहे.’’ – डॉ. (सौ.) लिंदा बोरकर आणि डॉ. रूपाली भाटकार ((कै.) श्रीमती पद्मा भाटकार यांच्या मुली), फोंडा, गोवा. (१२.६.२०२३) |
|