श्री क्षेत्र गिरनार येथील श्री दत्त मंदिरावर आक्रमण करणार्‍यांवर त्‍वरित कारवाई करा !

आझाद मैदान (मुंबई) येथे धरणे आंदोलनाद्वारे श्री दत्तभक्‍तांची मागणी !

मुंबई – गुजरातमधील श्री क्षेत्र गिरनार (जुनागढ) येथे श्री दत्तांचे पवित्र स्‍थान आहे. या स्‍थानावर १ ऑक्‍टोबर या दिवशी दिगंबर जैन समाजातील अनुमाने २०० ते ३०० जणांनी आक्रमण केले. श्री दत्त मंदिरातील दत्तपादुका आणि दत्तमूर्ती यांच्‍यावर हे आक्रमण केले. तेथील पुजार्‍यांना धमकावण्‍याचा प्रकार घडला. तेथे कर्तव्‍यावर असलेल्‍या एस्.आर्.पी.एफ्.च्‍या (राज्‍य राखीव पोलीस दलाच्‍या) पोलिसांना धक्‍काबुक्‍की केली. ही घटना २ समाजांमध्‍ये तेढ निर्माण करणारी असून त्‍यांच्‍यावर त्‍वरित कारवाई करावी, या मागणीसाठी श्री दत्तभक्‍तांनी ३१ ऑक्‍टोबर या दिवशी आझाद मैदानावर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. त्‍या वेळी आक्रमणकर्त्‍यांवर त्‍वरित कारवाई करण्‍याचे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍यासाठीचे निवेदन सादर करण्‍यात आले.

या धरणे आंदोलनाच्‍या वेळी काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष नानासाहेब पटोले यांनी दत्तभक्‍तांच्‍या भावना समजून घेतल्‍या. तसेच ‘याविषयी विधानसभेमध्‍ये प्रश्‍न उपस्‍थित करू’, असे आश्‍वासन देऊन आपला पाठिंबा व्‍यक्‍त केला. या धरणे आंदोलनाचे संयोजन सर्वश्री महेश जयगुडे, गणेश दिवेकर, रूपेश शिंदे आणि राहुल खुडे यांनी केले होते.

संपादकीय भूमिका :

दत्तमूर्ती आणि दत्तपादुका यांच्‍यावर आक्रमण करणार्‍यांना शिक्षा कधी होणार ?