९ देवी, ९ देवळे आणि ९ धार्मिक स्थळे असे ९ दिवस देवीच्या दर्शनाची राजापूरवासियांना मिळाली अनोखी संधी

राजापूर येथील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आणि एस.टी. महामंडळ ‘नवदुर्गा दर्शन’ सोहळ्याला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद

राजापूर, २७ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या वतीने नवरात्रीमध्ये ‘नवदुर्गा दर्शन सोहळा २०२३’ हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत ९ देवी, ९ देवळे आणि ९ धार्मिक स्थळे असे ९ दिवस देवीच्या दर्शनाची संधी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आली. भाविकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
या उपक्रमाच्या माध्यमातून ३ वर्षांच्या बालकापासून ते ८२ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वांनी देवीदर्शनाचा लाभ घेतला.

हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानने वृद्ध, ज्येष्ठ, प्रौढ, तरुण आणि लहान मुले यांच्या वयोमानानुसार त्यांना सोयीस्कर आसन क्रमांक देऊन या देवीदर्शन यात्रेचा शारीरिक अन् मानसिक त्रास भाविकांना होणार नाही याची काळजी घेतली. बसचालकांनीही अत्यंत कुशलतेने वाहन चालवत भाविकांचा प्रवास सुखकर केला. या उपक्रमामुळे तालुक्यातील सात्त्विकतेचे प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. भाविकांना देवस्थानची महती आणि माहिती सांगण्यासह चित्रफितीच्या माध्यमातूनही हा अभिनव उपक्रम अनेक भाविकांपर्यत पोचवण्यात आला.भाविकांनी पुढील वर्षीही हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या वतीने हा देवी दर्शनाचा योग जुळवून आणावा, असा आग्रह धरला.

नवदुर्गा सोहळ्यासह अन्य तीर्थक्षेत्र, समुद्रकिनारा पर्यटन, पावसाळी पर्यटन, ग्रामीण डोंगरी पर्यटन, गडकोट मोहिमा इत्यादी उपक्रम राबवण्यात येतील, अशी ग्वाही हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर आणि सारे शिलेदार यांनी दिली.

आगारप्रमुख श्रीमती शुभांगी पाटील, संपूर्ण अधिकारी वर्ग, चालक-वाहक, तसेच कर्मचारी वर्गावर विभागीय कार्यालयाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून देवी स्थानांचे दर्शन आणि देवीची ओटी भरायला मिळाल्यामुळे समस्त महिलांनी उपक्रमाविषयी कौतुक केले. सर्व मंदिरांतील पुजारी, व्यवस्थापक आणि विश्वस्त यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. भविष्यात उपक्रमासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन देत, देवीच्या चरणी गार्‍हाणे घातले.

सनातन प्रभात: हे पण वाचा

राजापूर येथे शारदीय नवरात्रौत्सवात नवदुर्गा दर्शन यात्रा